ओव्याचे आरोग्यदायी फायदे 

डॉ.राहुल रमेश चौधरी

0

(डॉ.राहुल रमेश चौधरी)आजूबाजूला फिरताना सहजच ओव्याची अनेक लहान लहान २ ते ३ फूटापर्यंत वाढलेली ओव्याची झुडुपे सहजच दिसतात.ओव्याच्या झाडाची पाने जाड असतात तसेच गोलाकार व मऊ असतात.फुले ही पांढरी व झुपक्यांनी येतात व त्यात जे बी असते ते म्हणजे ओवा.ओव्याच्या पानांची भजी व चटणी देखील करून खातात.ओव्याच्या पानांचे औषधी गुणधर्म भरपूर आहेत.ओव्याची इंदूर-हैद्राबाद मध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड होते.बोडी ओवा,किरमाणी ओवा,खुरासाणी ओवा असे विविध प्रकार ओव्याचे मिळतात.

वात वाढवणाऱ्या भाज्यांत ओवा टाकल्यास बाधत नाही.ओव्यात तेल असते.ओव्याचे फूल हे उग्र असते.ग्वाल्हेर-धारवाड येथे फूल मोठ्या प्रमाणात मिळते.अश्या या ओव्याची आपण औषधी गुणधर्मासह माहीती करून घेवूयात.सर्वप्रथम ओवा,मग त्याची पाने व मूळ याची माहीती आपण पाहूयात.

१.सतत खोकला येवून देखील जर कफ पातळ होवून सुटत नसेल तर ओवा व भेंडीचे पाणी दिल्यास कफ पडून आराम मिळतो.
२.अनेक लहान मुलांमध्ये जंत होण्याची प्रवृत्ती असते यात चेहऱ्यावर पांढरे डाग पडणे,वारंवार ताप,सर्दी,खोकला येणे,ताप आल्याप्रमाणे अंग गरम होणे,नाक व गुदद्वारास कंड सुटणे अश्या तक्रारींमध्ये ओवा व शेवग्याचे पाणी सोबत द्यावे याने फायदा होतो.
३.सांधेदुखी व आमवातात ओव्याच्या पानांचा रस चोळून नंतर ओव्याच्या पुरचुंडीने शेकावे.
४.पोटात वात धरणे,पोट फुगणे,ढेकर न निघणे,छातीत अस्वस्थ वाटणे,घाबरलेपणा वाटणे,मलाचा विंबध होणे अश्या परिस्थितीत ओव्याचा अर्क देणे तसेच ओवा, तूप,कोमट वा गरम पाणी घेणे याने उत्तम लाभ मिळतो.
५.मांसाहार,जडान्न,तेलकट,साखरेचे पाक युक्त पदार्थ खाल्ल्यास वारंवार तोंडाला कोरड पडते,पचन होत नाही अश्या वेळी ओवा अर्क किंवा ओवा बडिशेप वेलची खावे.
६.चिंच,आंबट गोड सुकी बोरे,कोकम साल,डाळींब दाणे,काळे मीठ,धने,जिरे,ओवा ,सुंठ याची गोळी ओवा अर्कासह घ्यावी याने पचन सुधारते,तहान कमी होते,सुस्ती येणे कमी होते,आतंड्याची क्षमता वाढते,पोटात गॅस होत नाही,मलप्रवृती बांधून होते.

७.हाडांशी संबधीत तक्रारी या ओवा व भेंडीचे पाणी याने कमी होतात.
.मासिक पाळी च्या काळात कंबर,मांड्या,पोटऱ्या दुखतात अश्या वेळेला ओवा व जिरे याचा काढा मध टाकून सकाळी रात्री मासिक पाळी संपेपर्यंत करावा.
९.ओवा चिलमीत भरून धूर ओढल्यास दम्याचा जोर किंवा श्वासाचा जोर कमी होतो.
१०.ओव्यात मिरे मोहरीतील उष्णता,काडेचिरायता चा कडूपणा,हिंगाचा ताप व आचकी दूर करण्याचे गुणधर्म असतात.
११.ओवा वाटून त्याची पुरचुंडी हुंगल्यास  सर्दी नाहीशी होते.१२.आमवात सांधे जखडतात यात ओव्याच्या तेलाने मसाज करून ओव्याच्या पुरचुंडीने शेकावे.
१३.ओवा पाण्यात वाटून थंडगार पडलेले शरीर गरम होण्यास मदत होते.हात पाय गरम होण्यास मदत होते.
१४.ओवा व तीळ एकत्र करून वाटावे व ती पुड पाण्यासह घेतल्यास सतत लघवी होण्याचा त्रास कमी होतो.
१५.ओवा खाल्ल्याने बाळंतीण स्त्रीस भूक लागते,दूध हलके होते,बाळाला गॅस होत नाहीत.,कंबरदुखी बरी होते,गर्भाशय शुध्द होते.
१६.ओवा,सैंधव,मीठ एकत्र खाल्ल्यास पोटात आलेला वाताचा गोळा शांत होतो.१७.ओवा व गुळ एकत्र खाल्ल्याने अंगावर येणाऱ्या गांधी कमी होत्तात
१८.ओवा,चुन्याची निवळी याच्या वापराने स्रीयांमधील अंगावरून पांढरे जाण्याचे थांबते.
१९.ओव्याच्या पानांचा रस थोडा थोडा पिल्यास जंतूसंसर्गाने झालेले जुलाब थांबण्यास मदत होते व शौचाला बांधून होते.
२०.ओव्याचे फूल तूप व मधासह घेतल्यास कफाचा खोकला बरा होतो.
२१.जिभेवर पांढरा साका जमणे,अन्नाची चव न लागणे,तोंडात लाळ सुटणॆ,चिकटपणा निर्माण होणे अश्या तक्रारीत ओव्याची पाने चावून खावीत याने सर्व तक्रारी दूर होतात.
२२.नाक बंद होणे,नाक चोंदणे,डोके जड पडणे,भुवईच्या आजूबाजूला जडपणा वाटणे,सूज येणे,अशी लक्षणे असल्यास ओव्याच्या पानांचा रस नाकात सोडावा व कपाळावर चोळावा याने उत्तम फायदा होतो.
२३.बोटांच्या बेचक्यात खरूज होते त्यातून स्त्राव ,खाज तयार होणे अश्या ठिकाणी पाने वाटून त्याची चटणी बांधावी याने तक्रारी कमी होतात.
२४.डोळे जड पडणॆ,पांढरा चिपडे मळ तयार होणे,डोळे थोड्या हालचालीने दुखणे अश्या वेळेला ओव्याची पाने पापणीवर बांधल्यास उत्तम लाभ होतो.
२५.जेवल्यावर लगेच सुस्ती येणे,छातीत जडपणा जाणवणे,दुपारी जेवणाच्या वासाचा ढेकर येणे,अश्या वेळी ओव्याची पाने,सोबत आले,कोथिंबीर,याची चटणी खाल्ल्यास उत्तम लाभ होतो.
२६.लघवी चिकट ,बुळबुळीत झाल्यास ओव्याचे मूळाचा गंध खडीसाखर व धन्यातून घेतल्यास योग्य फायदा होतो.
२७.पाय मुरगलला,ठेच,मुक्कामार लागल्यास ,सूज असल्यास मूळाचा गंध पोटातून घ्यावा.
२८.ओवा पाचक,जेवणात चव निर्माण करणारा,भूक वाढवणारा आहे,तसेच ताप,कफ,वेदना,जंत याचा नाश करणारा असून जखमा जंतूनाश करणेतसेच व्रण भरायला मदत करणार आहे,अपचन-आव-जुलाब-सर्दि यावर उत्तम गुणकारी आहे.
२९.कोणतीही जखम किंवा व्रण सडल्यास त्यास प्रतिबंध करणारा ओवा असून,जर ओव्याच्या काढ्याने जखमा,व्रण धुवून काढल्यास उत्तम जंतूघ्न,व्रणरोपक असा लाभ मिळतो.
३०.ओव्याचे फूल आतड्यांमधील कृमी जंतू ला पायबंद घालते.
३१.बांळतीण स्त्री ने ओवा खाल्ल्यास पचनक्रिया सूधारून उत्तम दूध सुटते.
३२.तसेच गर्भाशयाच्या शुध्दीकरीता व जंतूघ्न होण्याकरीता योनिमार्गात ओव्याची पुरचुंडी ठेवावी व त्याची धुरी द्यावी.
३३.ओव्याचे तेल संधिवातावर लावल्यास उपयोग होतो.तसेच गर्भाशयावर त्याचा मासिक स्त्राव साफ होण्यास चांगली मदत होते.
निषेध
१.ओवा उष्ण,तीक्ष्ण असल्याने पित्तप्रकृतीच्या व्यक्तीने घेवू नये.
२.तोंड येणे,हातापायाची आग होणे,अश्या तक्रारी असल्यास ओवा वापरू नये.
३.शरद व ग्रीष्म ऋतुत ओवा वापरू नये.
४.ओवा वापरताना आग,जळजळ झाल्यास वापर बंद करावा.

(विशेष सूचना – वरील सर्व उपाय वैद्य सल्ल्याने करावे.)
यावर काहीही शंका असल्यास खालील मोबाईलनंबर वर संपर्क साधावा.
डॉ.राहुल रमेश चौधरी
एम्.डी.(आयु.),मुंबई
एम.ए.(संस्कृत),पुणेसहाय्यक प्राध्यापक ,
श्री सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यलय व रुग्णालय,नाशिक
मोबाईल-९०९६११५९३०

Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.