महिलांनो पतीचे घर सोडताय ? जरा थांबा !

2
मीनाक्षी कृष्णाजी जगदाळे 
समुपदेशन ला आलेल्या अनेक प्रकरणांमधून काही ठळक बाबी प्रकर्षाने जाणवत असतात.पती पत्नींना प्रापंचिक आयुष्यात काही ठराविक समस्या परत परत येत असल्याचे समजते. याचाच अर्थ वैवाहिक आयुष्यातील काही ठराविक अडचणींवर पती तसेच पत्नी कडून वेळीच सकारात्मक मार्ग काढला गेला नाही आणि त्यामुळे त्यांच्या समस्या जास्तच वाढल्या असे जाणवते.

त्याचप्रमाणे काही ठिकाणी महिलांकडून रागाच्या भरात किंवा कोणताही पुनर्विचार न करता, कसलेही नियोजन न करता काही चुकीचे अथवा घाई घाई निर्णय घेतले जात असल्याचे जाणवते.यातील प्रामुख्याने त्रासदायक ठरणारा निर्णय म्हणजे पतीचे हक्काचे घर सोडून माहेरी अथवा अन्यत्र राहायला सुरुवात करणे.

समुपदेशन मार्फत येणाऱ्या अनेक प्रकारच्या अनुभवावरून, काही निवडक प्रकरणांवर आपण लिखाण करून जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत असतो,  जेणेकरून त्या प्रकरणातील संबंधित व्यक्तीने जो काही त्रास काढला, पती असो अथवा पत्नी त्यांचेकडून  जी काही चूक झाली, अथवा जिथे कुठे योग्य मार्गदर्शन न लाभल्यामुळे त्यांना वैवाहिक आयुष्यात मनस्ताप झाला तोच त्रास निदान इतर कोणाला होऊ नये हा त्यामागील हेतू असतो. वैवाहिक आयुष्य आणि त्यातील सर्व प्रकारच्या समस्या आणि समुपदेशन मार्फत त्यावर निघालेले निष्कर्ष तसेच पुढील उपाययोजना या संकल्पनेवर आधारित आपण लेखन करीत असतो.

या लेखातून आपण वैवाहिक आयुष्यातील त्रासाला कंटाळून नवऱ्याचे घर मुलाबाळांसहित सोडून माहेरी अथवा अन्यत्र स्थलांतरित होणाऱ्या महिला आणि त्यांना त्यामुळे भविष्यात होणारा त्रास, त्यांच्या समोर  येणारी आव्हाने,  मुलांची होणारी आर्थिक मानसिक आबाळ यावर प्रकाश झोत टाकणार आहोत.

ज्यावेळी महिला मुलाबाळांसोबत पतीचे घर सोडायचा निर्णय घेते तेव्हा खरंच तिच्या कडील सर्व सहनशक्ती संपुष्ठात आलेली असते. वैवाहिक आयुष्यातील समस्या सोडविण्यासाठी तिने वापरलेले सर्व पर्याय बिनकामी ठरलेले असतात आणि परिस्थिती काही सुधारायला मागत नसते. तिची सहनशक्ती पूर्ण संपलेली असते आणि कोणताही आशेचा किरण दिसत नसल्याने ती प्रचंड त्रासलेली असते. अश्यावेळी ती हतबल होऊन घराबाहेर पडते खरी पण कदाचित तिथेच ती चुकते का??  बऱ्याचदा माहेरील मंडळी येऊन,  सासरी वादविवाद घालून, सासरच्या मंडळींचा अपमान करून पत्नी ला माहेरी घेऊन जाणे असे प्रकार देखील घडतात.  अनेकदा सासरच्यांना माहिती देखील नसते परंतु घरातील भांडण तंटा पत्नीमार्फत  फोन द्वारे माहेरी समजलेला असतो आणि अचानक माहेरचे येऊन स्वतः च्या मुलीला घेऊन जातात. अथवा माहेरी बोलावून घेतात.  अश्या वेळेस अपमान, राग, तिरस्कार, वैताग, दुःख यासर्व भावना पती पत्नी मध्ये पुरेपूर भरलेल्या असतात.  वास्तविक या ठिकाणी,  अश्या कसोटीच्या वेळी, दोन्ही बाजूने प्रचंड सामंजस्य दाखविणे अपेक्षित असते पण दुर्देवाने कोणीच माघार घ्यायला तयार नसते.

अनेक ठिकाणी महिला सासरी राहत असताना आणि तेथील परिस्थिती ला वैतागलेल्या असताना त्यांना काही आप्त, मैत्रिणी असा सल्ला देतात  की पहिले नवऱ्यापासून लांब व्हा मग कायद्याने लढा, कायद्याने तुमचे हक्क आणि अधिकार मिळवा.  अनेकदा पत्नी फक्त थोडया कालावधी साठी माहेरी राहू, सगळ्यांचा राग शांत होईल मग  नवरा घ्यायला येईल या अपेक्षेने सासर पासून लांब जाऊन राहण्याचा निर्णय घेतात.  खूपदा सासरी वादविवाद किंवा भांडणांमध्ये पती अथवा सासरच्यांकडून पत्नी ला घरातून निघून जा,  इथं राहायचं नाही,  तुला काय बोलायच ते कोर्टात बोल,  तुला काय कारवाई करायची ती कर,  चालती हो असे बोलले जाते आणि महिला या गोष्टीला खूप मोठा अपमान समजून घर सोडतात. अनेकदा सासरचे वरिष्ठ मंडळी पती पत्नीच्या भांडणांमुळे स्वतः ची तब्बेत तणावामुळे  बिघडवून घेतात. अश्या वेळी पत्नी वर  दबाव निर्माण होतो आणि काही बरे वाईट झाले तर आपल्यालाच जबाबदार धरतील यामुळे ती तेथून निघणे पसंद करते. काहीठिकाणी  पती कडून पत्नी ला भीती घातली जाते की आम्हाला तुला नांदवायचं नाही, तू जर जबरदस्ती, आमच्या इच्छे विरुद्ध इथेच राहिलीस तर मी स्वतः च काहीही करून घेईल. कारण कोणतेही असो, महिला कमावती असो वा नसो महिलांना पतीचे घर सोडताना पुढील सर्व संभाव्य अडचणींची,  त्रासाची पूर्ण कल्पना असणे अत्यावश्यक आहे.

आपल्या लांब राहण्याने नवऱ्याला धडा मिळेल, आपली किंमत समजेल, आपण जसं सगळा  व्यवस्थित संसार सांभाळत होतो तस त्याला जमणार नाही मग तो वठणीवर येईल.  याही पेक्षा नवऱ्याला आपली कमतरता जाणवेल, स्वतः ची चूक समजेल, मुलांची आठवण येईल, आपली आठवण येईल आणि तो आपल्याला  शरण येऊन परत घेऊन जाईल अश्या समजुतीने महिला पतीचे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतात.  वास्तविक पाहता अत्यंत कमी प्रकरणात वर नमूद केल्यानुसार घडते अन्यथा त्यातून अनेकदा समस्याच वाढताना दिसतात. विरहाने प्रेम वाढते असे जरी आपण समजत असलो तरी प्रत्यक्षात तसें होताना दिसत नाहीये.  पत्नी ने हक्काचे नवऱ्याचे घर सोडल्यावर तिला किती, कसा आणि काय त्रास होऊ शकतो, तो दूर कसा होऊ शकतो, ती चुकली पण आपणही तिला घरा बाहेर अश्या पद्धतीने जाऊ देणे योग्य आहे का  याचा विचार करण्यापेक्षा ती आता एकटी कशी जगेल, कोणीतरी असणार तिचा असं शिकवणारा , कोणाच्या भरवश्यावर तीन असा निर्णय घेतला, बघू  तो जो कोणी आहे तो आता तिला  जन्मभर पोसेल का, आई वडील काय जन्माला पुरणार का,  तिला कोण  नातेवाईक कितीकाळ आर्थिक मदत करतात बघू, तिला स्वतः ला अर्थार्जन करता येते का समजेल आता. कष्ट करून पैसे कमविणे काय असत समजेल आता. इथे नवऱ्याच्या जीवावर जगत होती आता समजू दे बाहेर च जग कस असत यावर चर्चा केली जाते आणि स्त्री ची सत्व परीक्षा घेण्यासाठी सगळेच सज्ज होतात.

काही कालावधी साठी अश्या महिलेला तिच्या मुलांना तिच्याशी संबंधित लोकांकडून सांभाळून घेतले जाते, आर्थिक मदत देखील केली जाते, राहण्याची सोय करून दिली जाते. छोटी मोठी नौकरी, व्यवसाय यासाठी सहकार्य केलें जाते.  ती स्वतः आधीपासून कमावती असेल तर थोडाफार हातभार आपल्या स्वतंत्र संसाराला स्वतः हि लावू शकते आणि इतरांवर बोज बनणे टाळण्याचा प्रयत्न करते.  तरीही पूर्ण पणे स्वतंत्र  राहून स्वतः च्या हिमतीवर सगळ्याच जबाबदाऱ्या पार पाडणे अनेक महिलांना शक्य होत नाही. उत्पन्नाचं तितकस खात्रीशीर नियमित साधन त्यांना उपलब्ध नसते.  स्वतःला, मुलांना आतापर्यंत ज्या लाईफ स्टाईल ची सवय होती तिच्यात बराच फरक पडतो.  ज्या घरातून आपण स्वतः च्या हिमतीवर निघून आलोय तिथेच परत अश्या प्रसंगी हात पसरणे, माघार घेणे स्त्रीला अवमानास्पद वाटते.

अश्या वेळी पती आणि सासरकडील माणसे देखील ती इथे नांदत होती तोपर्यंत आमची जबाबदारी होती. मुलांचं, तीच तर आम्ही करतच होतो की सगळं, आता तीच गेलीये सोडून तर आम्ही का करावं?  तिने माघार घेऊन इथे येऊन राहायला हवं, स्वतःच्या चुका मान्य करून सुधारायला हवं,  मुलांना बापा पासून तोडलं तिने, मूल पण तिच्यासोबत गेली, मुलांनी आमचा विचार केला नाही, त्यांना काहीच वाटलं नाही. अश्या प्रतिक्रिया सासरचे देत असतात.  आम्ही आजही तयार आहोत त्यांना आणायला पण सर्व कायदेशीर लिखापढी करूनच अशी भूमिका काही जण घेतात अथवा काही ठिकाणी तिला आता सहजासहजी घरात घ्यायचं नाही तिची हौस होउदे असा पवित्रा घेतात. तिला तिची लायकी कळू देत हा पवित्रा काही सासरचे घेतात. अनेक जण पत्नी ने घर सोडल्यावर ताबडतोब वकिली सल्ला मसलत करून ठेवतात आणि स्वतः ची बाजू कायदेशीर सुरक्षित कशी होईल यावर उपाययोजना सुरु करतात.

घरातून बाहेर पडलेल्या महिलेला कालांतराने मुलांचा खर्च, शाळा कॉलेज फी, आजारपण, स्वतः चा खर्च डोईजड होऊ लागतो,  दैनंदिन जीवनात अनेक अडचणी जाणवू लागतात, आर्थिक झळ जाणवू लागते,  ज्यांना ती इतके दिवस  जवळचे समजत होतो ते लोक आता अश्या स्त्री ला टाळू लागतात. इतर ठिकाणांवरून आर्थिक मदत नाकारली जाऊ लागते आणि आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखी गत होऊ लागते.

तोपर्यंत नवरा बायको मधील अंतर वाढत गेलेले असते,संवाद बंद झालेला असतो. या  परिस्थिती मध्ये पती कडून आर्थिक फायदा व्हायलाच पाहिजे, त्याची ती जबाबदारी आहे या अनुषंगाने पत्नी ला खावटी, पोटगी यासारख्या शब्दांशी मैत्री करावी लागते आणि शेवट नाईलाजाने का होईना महिलांकडून कायदेशीर मार्ग स्वीकारला जातो. वर वर पाहता कायद्याने आपले आणि मुलांचे आर्थिक हक्क मिळवणे महिलांना खूप सोपं वाटते.  पतीचे उत्पन्न, पतीची स्थावर मालमत्ता याचा अंदाज बांधून लवकरच आपल्याला लाखो रुपयांचे घबाड कायदा मिळवून देईल या आशेवर महिला वैवाहिक आयुष्य नम्र पणे, वेळप्रसंगी माघार घेऊन सावरण्यापेक्षा पतीवर अधिकाधिक केस टाकून, त्याला आणि त्यांच्या घरच्यांना अधिकाधिक कायदेशीर भीती दाखवून मोठी रक्कम हस्तगत करण्याची धडपड सुरु करतात.  बहुतांश वेळी मुलांना पुढे करून, त्यांचा हत्यार म्हणून वापर या महिला करू लागतात. काहीअंशी ते बरोबर जरी असलं तरी  पतीची हिच समजूत असते की पत्नी  मुलांसाठी हवेत म्हणून इमोशनल ब्लॅकमेल करून माझ्या कडून पैसे उकळणे आणि स्वतः स्वतः च आयुष्य मनाप्रमाणे जगणे, स्वैराचार करणे, मजा मारणे यासाठीच आर्थिक मदत मागत आहे.

महिलांना देखील मुलांच्या बहाण्याने का होईना पती आपल्याला आर्थिक लाभापासून वंचित ठेवणार नाही याची खात्री असते. पतीच्या घरातून बाहेर पडल्यावर, राग आणि तणाव जसजसा कमी होऊ लागतो,  कोर्ट कचेरी चा अनुभव जसजसा येऊ लागतो,  अनेक कायदेशीर सल्लागार बदलून, विविध ठिकाणी मार्गदर्शन घेऊन देखील जेव्हा नुसताच कालावधी पुढे जात राहतो आणि अजूनही हातात काहीच पडलेले नसते तेव्हा महिला अगतिक होताना दिसतात,  महिला अश्यावेळी नैराश्य ग्रस्त होऊन अधिकाधीक चुकीचेच निर्णय त्यांच्या कडून घेतले जातात.

आपला लग्नानंतर थाटलेला संसार, संसार उपयोगी वस्तू, भांडी कुंडी,  डाग दागिने, आई वडिलांनी लग्नाला केलेला खर्च याचा लेखाजोखा मांडून ते सर्व परत मिळण्यासाठी देखील महिला धडपडू लागतात.  अनेक ठिकाणी मुलीच्या माहेरच्यांनी महिलांच्या बाळंतपणासाठी, त्या दरम्यान दिल्या गेलेल्या दवाखाना, औषध उपचार यासाठी केलेला खर्च सुद्धा आता पतीने परत करावा अशी मागणी महिला करतात.  मधी आधी माहेरच्यांनी पतीला काही आर्थिक मदत केली असेल त्याचा देखील हिशोब मांडला जातो आणि वैवाहिक आयुष्य हे व्यावहारिक आयुष्य असे समीकरण जुळून येते.

पतीचे घर सोडून आपण चूक केली का?  प्रापंचिक आयुष्यातील छोटया छोटया समस्या सासरीच राहून सोडवता आल्या असत्या का ?  आपल्या हट्टापायी आपण आपल्या मुलांना पण त्यांच्या हक्क आणि अधिकारांपासून,वडिलांच्या प्रेमापासून  वंचित ठेवतो आहोत का?  या प्रश्नांवर आत्मपरीक्षण करण्यापेक्षा महिला स्वतः ची कमकुवत वैचारिक शक्ती वापरताना दिसतात.  पतीमार्फत आपल्याला हवे तसें आर्थिक लाभ अद्याप मिळाले नाहीत,जसजसा कालावधी जातोय तसतसं अडचणीत वाढ होते आहे यातून महिला अजून उद्वीग्न होतात.आता आपला हेतू साध्य करण्यासाठी,आपण टाकलेल्या केसेस अधिकाधिक स्ट्रॉंग करणेसाठी,लवकरात लवकर जास्तीतजास्त आर्थिक लाभ तसेच फारकत मिळणेसाठी खोट्या आरोपांचा सहारा देखील घेतला जातो. वास्तविक ज्या भांडणामुळे,वादामुळे आपण घर सोडण्याचा निर्णय घेतला होता ते खरंच तितके गंभीर होते का?  लग्न झाल्यापासून ते घर सोडण्यापर्यंत जर आपल्याला इतका प्रचंड त्रास त्या ठिकाणी होता तर आपण तिथेच  आपल्या मुलांसोबत इतके वर्ष कस नांदू शकलो?  आपण आज पतीवर ज्या केस टाकतो आहोत त्यात सत्यता किती आहे?  जर ती व्यक्ती इतकीच वाईट होती तर तिच्यासोबत आपण काही काळ का होईना संसार कसा केला ?यावर विचार केला जात नाही.  एकत्र राहत असताना काही चांगल्या घटना, सुख, समाधान, शांती, हौस मौज, आनंद, मान सन्मान याचा देखील आपण उपभोग घेतला आहे हे महिला सपशेल विसरून जातात. वेळप्रसंगी मुलांवर देखील दबाव टाकून त्यांना खोट्या आरोपांचे साक्षीदार बनवायला महिला तयार होतात.

या स्वरूपाचे सर्व प्रयत्न करून देखील महिलांच्या  हाताला  म्हणावा तसा आर्थिक फायदा काही लागत नाही. ज्या पद्धतीने महिलांनी अनेक माध्यमातून कायदेशीर सल्ले घेतलेले असतात तसेच पतीने देखील स्वतः ची बाजू स्ट्रॉंग करण्यासाठी, कमीतकमी रकमेतून आर्थिक तडजोड करण्यासाठी आणि फारकत मिळणेसाठी मार्गदर्शन घेतलेले असते.  पत्नी ने घर सोडल्यापासून तिच्या हित चिंतकांच्या मदतीने केलेल्या विविध उपद्व्यापांमुळे सांसारिक आयुष्य पुन्हा पूर्ववत होण्याच्या शक्यता देखील नगण्य झालेली असते.  अश्यावेळी पत्नी  कितीही असहाय झाली,  माफी मागून,  सर्व तक्रारी मागे घेऊन  पुनःश्च सासरी यायला तयार झाली तरी ते सहजासहजी शक्य होत नाही. सगळ्याच ठिकाणी नवरा आणि त्याच्या घरचे पुनःश्च अश्या पद्धतीने वागलेल्या स्त्री ची पत्नी म्हणून जोखीम घेणे टाळतात. पती स्वतः च्या इभ्रतीला लागलेला धक्का, त्याच्या घरच्यांना झालेला मनस्ताप विसरून पत्नी ला स्विकारेलच याची कोणतीही शाश्वती नसते.  दोघांच्या या अहंकारामुळे बऱ्यापैकी सुरु असलेला संसार पूर्णच विस्कटून जातो.

मुलांना त्यांच्या आई वडिलांमध्ये का आणि काय सुरु आहे, कोण चूक कोण बरोबर आहे याचा अनेकदा मागमूस देखील नसतो,  मुलांना आई वडील दोघेही सारखेच प्रिय असतात. आपण कोणाजवळ राहावे?  आई आणि बाप यामध्ये कोणाला निवडावे? या गोंधळात मुलांचं मानसिक खच्चीकरण होते. मुलांसाठी दोघेही एकत्र असणे आवश्यक असते, मुलांना आई वडील दोघांच्याही एकत्रित  प्रेमाची आवश्यकता असते.  मूल कोणा एकाकडून बोलली की दुसऱ्याला वाटते मुलांचे कान भरलेत, मुलांना आपल्याविरुद्ध भडकावण्यात आले आहे. आई वडील दोघांचेही मुलांप्रती समान कर्तव्य असते.  पण मूल आई जवळ राहत आहेत, आई सोबत निघून गेली म्हणून वडिलांच्या मनात त्यांचेबद्दल पण राग आणि कटुता निर्माण होऊ शकते.  या सर्व प्रकरणात मुलाचे मानसिक, शारीरिक, शैक्षणिक सर्वच प्रकारे नुकसान होऊ शकते याचा पती आणि पत्नी दोघांनीही कोणताही आततायी निर्णय घेणे आधी विचार करावा.

त्यामुळे महिलांनी कोणत्याही वैवाहिक समस्येमुळे पती चे घर सोडताना फक्त राग, वैताग, अपमान, संताप या गोष्टींचा आधार न घेता सर्व बाजूनी सखोल विचार करून, अतिशय अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊन, जाणकार व्यक्ती सोबत सल्ला मसलत करूनच पुढचे पाऊल उचलावे.

आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी कायदा सुव्यवस्था  नक्कीच अस्तित्वात आहे,खास महिलांसाठी अनेक सुधारित कायदे अस्तित्वात आहेतच. परंतु वैवाहिक आयुष्यातील त्रास आणि समस्येबाबतीत कायद्याचा आधार घेताना आपल्याला त्यातील अभ्यासू आणि सकारात्मक मार्गदर्शन करणारी विश्वासू व्यक्ती लाभणे खूप आवश्यक असते.  पतीचे घर सोडून लांब राहण्याचा, कायद्याने आर्थिक मोबदला अथवा हक्क मिळण्याचा सल्ला, पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला कोणताही अनुभव पाठीशी नसलेले नातेवाईक, मित्र मैत्रिणी अथवा आई वडील सुद्धा जर महिलेला देत असतील तरी केवळ ऐकीव माहितीच्या आधारे  आपल्या आयुष्यातील असा कोणताही महत्वाचा निर्णय घेणे योग्य नाही.आपल्या स्वतःच्या केस मध्ये एकंदरीत परिस्थिती ला, आपल्याला होणाऱ्या त्रासाला,आपल्या समोर असलेल्या समस्येला खरंच नेमकी कोणती कायदेशीर प्रक्रिया कितपत प्रभावी ठरू शकेल याचा शहानिशा करणे आवश्यक आहे.

आजही आपल्या समाज रचनेनुसार पती च्या घरात राहणारी,नांदणारी महिला च सुरक्षित समजली जाते.एकदा का ती कोणत्याही कारणास्तव नवऱ्याच्या घरातून बाहेर पडली की तिने कोणत्या त्रासदायक परिस्थिती मुळे असा निर्णय घेतला याहीपेक्षा ती कशी चुकीची आहे यावरच लक्ष दिल जात. तिच्या चारित्र्याला तर ताबडतोब टार्गेट केल जात. त्यामुळे आपल्याच घरातील सून अथवा आपली पत्नी समाजात बदनाम होणार नाही, चुकीचा असा कोणताही टोकाचा निर्णय घेणार नाही किंवा तिच्यावर तशी वेळच येणार नाही यासाठी पतीने देखील पत्नीला खंबीर पणे साथ देणे, तिला होत असलेला कोणत्याही स्वरूपाचा त्रास दूर करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.आपल्या घरात आहे तो पर्यंत ती आपली बायको म्हणून ज्या अधिकाराने तिला वागवले जाते, प्रेमाने, निष्ठापूर्वक तिला वागणूक दिली जाते तीच वागणूक, तोच मानसन्मान तिला घरा बाहेर पडल्यावर का मिळू नाही?  एक विवाहित स्त्री जर पती सोबत असलेल्या कोणत्याही मतभेदामुळे त्याचीच मूल बाळ घेऊन, त्याचंच नाव लावून जर स्वतंत्र आयुष्य जगण्याचा प्रयत्न करीत असेल तर तिची आर्थिक मानसिक कोंडी करणे कितपत योग्य आहे यावर सर्वांनीच विचार करणे क्रमप्राप्त आहे.


संपर्क. 9834114342 9766863443

(लेखिका पत्रकार, समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)

Meenakshi Krishnaji Jagdale
मीनाक्षी कृष्णाजी जगदाळे 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

2 Comments
 1. Ambika says

  navrach kahi Karan nastanahi apman, shivya v Marat asto. Tyas gharatalehi virodh kart nahit. Konahi samor fakt apmanch karat asel, tyala baykochi kimmatach nahi. Baykola kahich Maan nahi kuthech. Ti kitihi tyanchya manasarkhihi rahili tari Tila mar khavach lagto.
  Me post graduate aahe pan me agdi chotya gavat rahate mazya shikshanla kahich mahtv nahi. Mala shejaryanahi bolnyachi permission nahi. Gharatali sarv kame Mich karavi. Mazya lagnala 14 varsh zale aahet. Ata Mazi sahanshkti nahi aahe . Mala Don mule aahet .ik 5th la aahe v dusara 4th aahe. Maz Maher hi garib aahe. Hya trasala kantalun mala tar maranachech vichar yetat dokyat, pan maza ik bhau varala aahe ,ug mazya aai vadalana aankhi kashala dukh mhanun trass sahan karat aahe. As ayushy konachych nashibala yevu naye .

  1. Parshuram Kirwale says

   Navarahi काही काम करत असेल ना.
   उगाच तो काही मारणार नाही.
   कारण सांगा

कॉपी करू नका.