क्रेडाई नाशिक मेट्रो नाशिकमध्ये कामगारांसाठी उभारणार आधुनिक ‘स्किल अँड एक्सलन्स सेंटर’
कामगार दिनी चांदशी शिवारात भूमिपूजन; प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि कल्याणाचा नवा अध्याय सुरू

नाशिक, दि. ३० एप्रिल २०२६: CREDAI Nashik Metro News नाशिकच्या बांधकाम क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल उचलत क्रेडाई नाशिक मेट्रोच्या वतीने कामगारांसाठी अत्याधुनिक ‘स्किल अँड एक्सलन्स सेंटर’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा कामगार दिनाचे औचित्य साधत शुक्रवार, दि. १ मे रोजी सकाळी ११ वाजता गंगापूर रोडजवळील जलालपूर-चांदशी शिवार येथे पार पडणार आहे. या उपक्रमामुळे नाशिकमधील बांधकाम क्षेत्राला नव्या तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून कामगारांच्या कौशल्यविकासाला गती मिळणार आहे.
क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम क्षेत्रात दिवसेंदिवस तांत्रिक बदल होत असून त्या बदलाशी सुसंगत राहण्यासाठी कामगारांचे नियमित प्रशिक्षण अत्यावश्यक झाले आहे. बांधकाम क्षेत्राचा कणा असलेल्या कामगारांचे कौशल्य वाढवणे म्हणजे संपूर्ण क्षेत्राच्या गुणवत्तेत सुधारणा करणे होय. या पार्श्वभूमीवर उभारले जाणारे हे सेंटर अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते तसेच बांधकाम कामगारांच्या हस्ते भूमिपूजन होणार असून, यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासह खासदार, आमदार आणि विविध शासकीय अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
आधुनिक सुविधा आणि व्यापक दृष्टीकोन (CREDAI Nashik Metro News )
या स्किल अँड एक्सलन्स सेंटरसाठी सुमारे ३३,५०० स्क्वेअर फूट एवढी विस्तीर्ण जागा निश्चित करण्यात आली आहे. या केंद्रात अत्याधुनिक कार्यालयीन सुविधा, कार्यशाळा, सेमिनार हॉल आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार संकलेचा यांनी सांगितले की, हे केंद्र केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित राहणार नसून बांधकाम क्षेत्रातील नव्या संकल्पना, तंत्रज्ञान आणि ज्ञानविनिमयासाठीही एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल. या प्रकल्पाचे वास्तुशास्त्रीय डिझाइन अहमदाबाद येथील सुप्रसिद्ध वास्तुविशारद मथारू आर्किटेक्ट यांनी तयार केले असून, डिझाईन टीममध्ये अनंत राजेगावकर आणि कृणाल पाटील यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या इमारतीची रचना ब्रह्मगिरी पर्वतरांगेपासून प्रेरित असून, पर्वतांच्या उतार आणि पठारासारखी रचना तयार करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला एक वेगळे आणि आकर्षक वास्तुरूप मिळणार आहे.
पर्यावरणपूरक आणि ‘नेट झिरो’ संकल्पना (CREDAI Nashik Metro News )
या सेंटरच्या उभारणीत पर्यावरणपूरक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आले आहे. ‘नेट झिरो बिल्डिंग’ संकल्पनेवर आधारित असलेली ही इमारत ऊर्जा बचत, पाणी व्यवस्थापन आणि हरित तंत्रज्ञानाचा वापर यासाठी आदर्श ठरणार आहे. तसेच आयजीबीसी प्लॅटिनम रेटिंग मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, जे या प्रकल्पाच्या गुणवत्तेची आणि पर्यावरणीय जबाबदारीची साक्ष देईल.
कामगारांच्या जीवनात सकारात्मक बदल
या स्किलिंग सेंटरमुळे नाशिकमधील बांधकाम कामगारांना प्रशिक्षणाची संधी मिळून त्यांच्या कौशल्यात मोठी वाढ होणार आहे. यामुळे कामगारांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल तसेच त्यांना अधिक सुरक्षित आणि दर्जेदार काम करण्याची क्षमता प्राप्त होईल. प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने बांधकाम क्षेत्रातील गुणवत्ताही उंचावणार आहे.माजी अध्यक्ष आर्किटेक्ट कृणाल पाटील यांनी सांगितले की, हे सेंटर नाशिकच्या विकासात मैलाचा दगड ठरेल आणि शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरेल. या प्रकल्पामुळे नाशिकला एक वेगळी ओळख मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कामगार कल्याण सप्ताहाचे आयोजन
क्रेडाई नाशिक मेट्रोच्या वतीने १ ते ७ मे दरम्यान ‘कामगार कल्याण सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या आठवड्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बांधकाम कामगारांची नोंदणी आणि नूतनीकरण शिबिरे, कौशल्यविकास कार्यक्रम, आरोग्य तपासणी शिबिरे आणि सुरक्षा साहित्याचे वाटप अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.या माध्यमातून अधिकाधिक कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी सांगितले. कामगारांच्या आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य देत त्यांचे जीवनमान उंचावण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
संघटित प्रयत्नातून साकारतोय प्रकल्प
या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी क्रेडाई नाशिक मेट्रोच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक सदस्य परिश्रम घेत आहेत. उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सहसचिव आणि समिती सदस्य यांच्या समन्वयातून हा प्रकल्प साकार होत आहे. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे नाशिकच्या बांधकाम क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे. एकूणच, ‘स्किल अँड एक्सलन्स सेंटर’ हा प्रकल्प नाशिकच्या बांधकाम क्षेत्रासाठी परिवर्तनाचा नवा अध्याय ठरणार आहे. कामगारांचे कौशल्य, तंत्रज्ञानाचा वापर आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन या तिन्हींचा समतोल साधणारा हा उपक्रम भविष्यात शहराच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
या प्रसंगी माजी अध्यक्ष सुरेश अण्णा पाटील ,रवी महाजन यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले..कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष अनिल आहेर, मनोज खिंवसरा, अंजन भालोदिया, उदय घुगे ,कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा ,सहसचिव सचिन बागड,नरेंद्र कुलकर्णी ,ऋषिकेश कोते, हंसराज देशमुख तसेच समिती सदस्य श्यामकुमार साबळे ,अनंत ठाकरे ,विजय चव्हाणके ,सागर शाह ,निशित अटल ,सुशील बागड ,निरंजन शाह, वृषाली हिरे, दिपाली बिरारी, सहयोगी सदस्य सतीश मोरे, सुशांत गांगुर्डे ,अभिषेक महाजन, समीर सोनवणे आमंत्रित सदस्य मनोज लाडानी हर्षल हणमंते ,भूषण कोठावदे शिवम पटेल, हिरेन भडजा मयुरेश चौधरी, ऋषभ जैन, क्रेडाई युवा विंग समन्वयक आदित्य भातंबरेकर, सहसमन्वयक अजिंक्य नहार हे परिश्रम घेत आहेत.


