
(Husband Wife Relationship) आजमितीला समाजात वाढत चाललेले फारकतींचे प्रमाण, तरुणाईचा अविवाहित राहण्याकडे वाढलेला कल, विवाहबाह्य संबंध, लिव्ह इन रिलेशन शिप चे फॅड, हुंडाबळी, विवाहितांच्या आत्महत्या अथवा घातपात हेच दर्शवतात की नात्यांमधील जबाबदारी, आपलेपणा, आदर, सुसंवाद, काळजी, प्रेम नष्ट होत चालले आहे. दिवसेंदिवस पती पत्नी मधील वाद विवाद पोलीस स्टेशन, कोर्ट इतपर्यंत पोहचून नात्याचा दुःखद शेवट होत आहे. पती पत्नीच्या वादामध्ये अपत्य, दोन्ही कुटुंबातील इतर सदस्य सुद्धा भरडले जात आहेत आणि त्यामुळेच विवाहित स्त्री पुरुष यांचे समुपदेशन करून संसार टिकवणे हि काळाची गरज बनले आहे.
समुपदेशन करतांना जोडप्यांमधील वाद, भावनिक अंतर, विश्वासाचा अभाव किंवा संवादातील अडथळे यानुसार वेगवेगळ्या शास्त्रीय सायकोथेरपी पद्धतींचा (Psychotherapeutic Approaches) वापर केला जातो.
जाणून घेऊया प्रमुख आणि सर्वाधिक प्रभावी थेरपी (Husband Wife Relationship)
*इमोशनली फोक्स्ड थेरपी* (Emotionally Focused Therapy – EFT) बद्दल.
यामध्ये पती-पत्नीमधील भावनिक बंध (Emotional Attachment) मजबूत करणे हा उद्देश असतो. या प्रक्रियेत नात्यात वारंवार निर्माण होणारी नकारात्मक चक्रे (Negative Cycles) शोधली जातात. एकमेकांच्या भावना, भीती आणि सुरक्षिततेच्या गरजा समजून घेऊन भावनिक संवाद पुनर्स्थापित केला जातो. पती पत्नी मध्ये वारंवार होणारे वाद कोणत्या स्वरूपाचे आहेत, कोणत्या विषयावरून जास्त मतभेद होतात आणि नात्यात नकारात्मकता वाढते हे समजल्यामुळे त्याच विषयावर काम केले जाते.
दुसरा प्रकार म्हणजे *गॉटमन पद्धत* (The Gottman Method). यामध्ये परस्पर मैत्री, आदर, भावनिक जवळीक वाढवणे आणि वादांचे योग्य व्यवस्थापन करणे याचा अंतर्भाव असतो. डॉ. जॉन गॉटमन यांच्या संशोधनावर आधारित ही पद्धत आहे. यात पती पत्नीच्या संवादातील चार घातक घटक म्हणजे *टीका, बचाव, तुच्छता, संवाद तोडणे तसेच एकमेकांना गृहीत धरणे* दूर केले जातात. ‘सामायिक ध्येय आणि अर्थ’ (Shared Meaning) निर्माण करण्यावर यात भर दिला जातो. दोघांचेही विचार जुळवणे, एकमत होणे यासाठी हि प्रभावी पद्धत आहे. आपण बघतो की जर पती पत्नी कोणत्याही विषयावर एकमत होवू शकत नसतील तर त्यांच्या आणि कुटुंबाच्या प्रगती मध्ये अडथळे निर्माण होतात. एक विचाराने घेतलेले आर्थिक निर्णय, मुलांबाबत चे शैक्षणिक अथवा वैवाहिक निर्णय, मालमत्ता अथवा कोणतीही मोठी खरेदी, घरातील जेष्ठ नागरिकांना दिले जाणारे वैद्यकीय उपचार, उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ घालणे हे सर्व नवरा बायकोच्या सामंजस्यातून घडणे अत्यंत गरजेचे आहे.
या पुढील प्रकार म्हणजे *कॉग्निटिव्ह बिहेव्हिरल कपल्स थेरपी* (Cognitive Behavioral Couples Therapy – CBCT). या प्रक्रियेचा उद्देश चुकीचे विचार, समज आणि नकारात्मक वर्तन बदलणे हा असतो. नात्याबद्दल असलेले अवास्तव दृष्टिकोन, चुकीचे समज आणि संशयास्पद विचारप्रणाली (Cognitive Distortions) बदलून सकारात्मक वर्तन आणि स्पष्ट संवादाचे कौशल्य शिकवले जाते. अनेक पती पत्नी एकमेकांकडून खूप मोठया अपेक्षा बाळगतात आणि त्या पूर्ण होवू शकल्या नाही तर त्यांच्यात दुरावा निर्माण होतो या थेरपी मध्ये दोघांना एकमेकांच्या अपेक्षा कितपत पूर्ण करणे खरच शक्य आहे त्यासाठी वाद न घालता परस्पर समजूतदार पणा किती गरजेचं आहे यावर भर दिला जातो. दुसऱ्यावर सतत आपल्या अपेक्षांचे ओझे लादणारे जोडपे प्रापंचिंक समाधान हरवून बसतात.
*इमागो रिलेशनशिप थेरपी* (Imago Relationship Therapy – IRT) हि देखील विवाहित जोडपं्यांना एकत्र आणण्यासाठी मदत करते. पती पत्नी दोघांचेही बालपणीचे अनुभव, मानसिक भावनिक दुखापती, सध्याच्या नात्यातील वाद विवाद यांमधील संबंध समजून घेणेकामी हि थेरपी उपयुक्त ठरते. या प्रक्रियेत ‘इमागो संवाद’ (Intentional Dialogue) वापरला जातो त्यामुळे ऐकणे, पुष्टी देणे (Validation) आणि सहानुभूती (Empathy) दाखवणे या तीन टप्प्यांद्वारे एकमेकांचे मत, भावना, अपेक्षा समजून घेतल्या जातात. प्रत्येकाला त्याच्या वैवाहिक आयुष्यात येणाऱ्या अडचणी बहुतांश त्याच्या बालपणी, तरुणपणी आयुष्यात घडलेल्या चांगल्या वाईट घटनांचे परिणाम असतात. विवाहनंतर नवरा किंवा बायकॊ जोडीदाराला काय वागणूक देतात , पती पत्नी च्या नात्याकडे दोघे कसे बघतात याचा अभ्यास या थेरपी मार्फत केला जातो. हि थेरपी जोडीदाराला समजून घेण्याचा वेगळा दृष्टीकोन निर्माण करते.
*सोल्यूशन-फोक्स्ड ब्रीफ थेरपी*(Solution-Focused Brief Therapy – SFBT). या थेरपी मध्ये भूतकाळातील वादांऐवजी वर्तमानातील व्यावहारिक म्हणजे प्रॅक्टिकल उपायांवर भर दिला जातो. या प्रक्रियेत समस्येच्या कारणांमध्ये जास्त न अडकता “गोष्टी चांगल्या कशा होऊ शकतात?” आणि पती-पत्नीच्या नात्यात आधी काय चांगले चालले होते, यावर आधारित व्यावहारिक ध्येये निश्चित केली जातात. पती पत्नी मधील वाद अनेकदा भूतकाळातील चुका, पश्चाताप, जर तर च्या गोष्टी यामुळे होत असतात. तू तेव्हा माझं ऐकलं नाही, त्यावेळी तू मला अडवलं, तुला मी तेव्हाच सांगितलं होत असे आरोप नवरा बायकॊ खूपदा एकमेकांवर लावत असतात. या थेरपी मार्फत झाले गेले ते सोडून दोघांना आता वर्तमानात काय चांगल घडवता येईल याबद्दल मार्गदर्शन केले जाते.
*नॅरेटिव्ह थेरपी* (Narrative Therapy) चा उद्देश समस्येला व्यक्तीपासून वेगळे पाहणे (Externalizing the Problem) हा आहे. या थेरपी ची कार्यपद्धती समजावून घेऊयात. या मध्ये “*व्यक्ती ही समस्या नाही, तर समस्या हीच समस्या आहे*” या तत्त्वावर काम केले जाते. पती-पत्नीला त्यांच्या नात्याची कथा पुन्हा सकारात्मक पद्धतीने लिहिण्यास (Re-authoring) मदत केली जाते. कोणत्याही अडचणीला, नुकसान होण्याला, समस्या आल्यास आपण व्यक्तींना दोष देत असतो. *काय चुकलं हे शोधण्यापेक्षा कोण चुकलं याकडे आपला भर असतो*. नवरा बायकॊ मध्ये एकमेकांना दोष देणे , स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलने हे नित्यनियमाने घडतांना दिसते. हि थेरपी पती पत्नीला समस्याचे मूळ शोधायला मदत करते. इतरांच्या चुका शोधल्यामुळे, त्या दाखवल्या मुळे समस्या कधीच सुटत नाही. समस्या तेव्हाच सुटते जेव्हा त्यावर विचारविनिमय करून काम केले जाते.
*बोवेनियन फॅमिली सिस्टीम्स थेरपी* (Bowen Family Systems Therapy) हा एक प्रकार लक्षात घेणे गरजेचे आहे. याचा उद्देश मूळ कुटुंबाचा (Family of Origin) नात्यावर होणारा परिणाम समजून घेणे. या थेरपी ची कार्यपद्धती म्हणजे पती किंवा पत्नीच्या मूळ कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेले वर्तन नमुने (Intergenerational Patterns) आणि भावनिक प्रतिक्रिया ओळखून नात्यात निरोगी सीमा (Boundaries) निर्माण करणे . पती पत्नी दोघेही वेगवेगळ्या घरातून आलेले असतात. लग्न होईपर्यंत दोघांच्या घरचे दिनचर्या, वातावरण, संस्कार, सवयी, विचार सर्व काही भिन्न असते. जर अत्यंत परस्पर विरोधी वातावरणातून पती पत्नी एकत्र आलेले असतील तर त्यांना सहजीवन जगताना दररोज अनेक बदलांना सामोरे जावे लागत असते आणि त्यातून मतभेद होण्याची शक्यता वाढत असते. या थेरपी मुळे पती पत्नी कितीही विरोधाभास असलेल्या कुटुंबातील असतील तरी त्यांना योग्य मार्गदर्शन करून मार्गी लावण्यास मदत होते.
समुपदेशन करतांना थेरपीची निवड कशी केली जाते? याबद्दल माहिती घेतल्यास आपण पती पत्नीच्या नात्याला अधिक निरोगी बनवू शकतो. प्रत्यक्ष समुपदेशनात समुपदेशक सहसा कोणत्याही एकाच पद्धतीवर अवलंबून न राहता इंटीग्रेटिव्ह आणि एक्लेक्टिक अप्रोच (Integrative Approach) वापरतात. यामध्येसुरुवातीचे मूल्यांकन (Assessment) जोडप्याची मुख्य समस्या (उदा. संवादाचा अभाव, अनैतिक संबंध, आर्थिक वाद, किंवा कौटुंबिक हस्तक्षेप) ओळखणे हा असतो. थेरपीचे संयोजन करतांना आवश्यकतेनुसार गॉटमन पद्धतीचे संवाद तंत्र आणि EFT चा भावनिक पाठिंबा एकत्र करून वापरले जातात. समुपदेशन हे पती पत्नीतील कोणत्याही वादावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी मोठे योगदान देते.
काउन्सिलर मीनाक्षी जगदाळे
हॅपी लाईफ काउनसेलिंग सर्विसेस,नाशिक
9766863443