“गोदावरी गुदमरली, झाडं कापली… आता नाशिकच तापलं!”
“नाशिकचा पारा ४१.५°… विकासाच्या नावाखाली उकळतं वास्तव!”

अभय ओझरकर
Nashik temperature rise नाशिकची थंड ओळख विरत चालली… काँक्रिटीकरणाच्या सावलीत तापतं शहर कधीकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख मिळवलेले नाशिक आज स्वतःची ती ओळख गमावत चालले आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. काही दशकांपूर्वी उन्हाळा सुरू झाला की अनेक पर्यटक आपला मुक्काम नाशिकला हलवायचे. नाशिकची गार हवा, हिरवाईने नटलेले डोंगर, आणि शांत, निवांत वातावरण – या सगळ्यामुळे हे शहर ‘समर रिट्रीट’ म्हणून प्रसिद्ध होते. पण आज परिस्थिती अशी आहे की, त्या आठवणी आता केवळ जुन्या डायऱ्यांमध्ये, फोटो अल्बममध्ये आणि वृद्धांच्या गप्पांमध्येच उरल्या आहेत.
आज नाशिकची हवा केवळ उष्णच नाही, तर प्रदूषण आणि अनियोजित विकासामुळे दूषितही झाली आहे. एकेकाळी थंड हवेसाठी गाजणारे हे शहर आता वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आहे. तापमानाचा पारा ४१.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणे हे केवळ आकड्यांमध्ये मोजण्याचे प्रकरण नाही, तर शहराच्या बदलत्या पर्यावरणीय संतुलनाचा इशारा आहे.
विकास की विनाश? काँक्रिटीकरणाचा विळखा (Nashik temperature rise)
नाशिकच्या विकासाचे फलक घेऊन राजकीय नेते छातीठोकपणे फिरत असले, तरी या विकासाची किंमत काय मोजावी लागते आहे, याचा विचार क्वचितच केला जातो. ‘विकास’ या गोड शब्दामागे लपलेले काँक्रिटीकरण शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिरले आहे. रस्ते, इमारती, पूल, प्रकल्प – सगळीकडे सिमेंट आणि लोखंडाचे साम्राज्य वाढत आहे. या काँक्रिटीकरणाने नाशिकच्या ओळखीचा अविभाज्य भाग असलेल्या गोदावरी नदीलाही वाचवले नाही. गोदावरीच्या काठावर असलेले जुने कुंड, घाट – ज्यांनी शतकानुशतके धार्मिक, सांस्कृतिक परंपरा जपल्या – ते आज काँक्रिटमध्ये गुदमरले आहेत.
गोदाप्रेमी देवांग जानी यांच्यासारख्या काही सजग नागरिकांनी या कुंडांचे काँक्रिटीकरण काढून त्यांना पुन्हा ‘जिवंत’ करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे, पण त्याचे यश अजूनही अनिश्चिततेच्या भोवऱ्यात आहे. कारण, या लढ्याला जितका लोकसहभाग हवा, तितका तो मिळत नाही; आणि सत्ताधाऱ्यांची इच्छाशक्ती कितपत आहे, हा प्रश्न कायमच अनुत्तरित राहतो.
तपोवन: आंदोलनांची आग आणि सत्तेची सावली (Nashik temperature rise)
तपोवन वाचवण्यासाठी अनेक वर्षांपासून नागरिक आणि पर्यावरणप्रेमी आंदोलन करत आहेत. या आंदोलनात तरुणाईही मोठ्या प्रमाणात सहभागी झाली आहे. झाडे तोडू नयेत, हरित क्षेत्र जपावे, शहराचा श्वास कायम ठेवावा – या मागण्यांसाठी लोक रस्त्यावर उतरले.पण एक कटू वास्तव नागरिकांच्या लक्षात येत आहे – राजकीय पाठबळ असेल, तर कोणतेही आंदोलन सहजपणे मोडून काढले जाऊ शकते. निवडणुका असताना नागरिकांच्या भावना, प्रश्न, आणि आंदोलनांना महत्त्व दिले जाते. पण एकदा निवडणुका संपल्या की, त्या सगळ्या गोष्टींचे महत्त्व कमी होते.
नागरिकांमध्ये अशीही चर्चा ऐकू येते की, “तुम्ही केळी घेऊन आंदोलन करा किंवा गाजर घेऊन आंदोलन करा, सत्तेसमोर काही चालत नाही.” ही भाषा कदाचित थोडी कडू वाटेल, पण ती वास्तवाचे प्रतिबिंब आहे. लोकशाहीत लोकांच्या आवाजाला महत्त्व असावे, अशी अपेक्षा असते; पण प्रत्यक्षात तो आवाज कितपत ऐकला जातो, हा प्रश्न उभा राहतो.
वृक्षतोड नव्हे, वृक्षकत्तल!(Nashik temperature rise)
‘वृक्षतोड’ हा शब्द आता अपुरा वाटतो; ‘वृक्षकत्तल’ हा शब्द अधिक योग्य वाटतो. कारण जे घडते आहे, ते केवळ झाडे तोडणे नाही, तर पर्यावरणाचा गळा घोटणे आहे. तपोवनात झाडांची कत्तल होणार होती, म्हणून खास कर्नाटकातून झाडे आयात करून त्यांचे रोपण करण्यात आले. हा उपक्रम कागदावर आणि बातम्यांमध्ये खूप छान दिसतो. पण पुढे काय झाले? त्या झाडांची देखभाल झाली का? ती टिकली का? याचे उत्तर मात्र कोणी देत नाही. नाशिकमध्ये एका प्रदर्शनात एका संस्थेच्या अध्यक्षांनी जाहीर केले होते की, “जितकी माणसे प्रदर्शनाला भेट देतील, तितकी झाडे आम्ही लावणार.” हा संकल्प ऐकायला खूप छान वाटतो. पण प्रत्यक्षात किती झाडे लावली गेली? ती जगली का? याचा हिशोब कोणी देणार?
गोदावरीचे काँक्रिटीकरण आणि पाण्याचा प्रश्न
पाणी जमिनीत मुरले, तरच परिसर सुपीक होतो, भूजल पातळी वाढते आणि पर्यावरण संतुलित राहते. पण गोदावरीच्या काठावर झालेले काँक्रिटीकरण पाण्याला जमिनीत मुरू देत नाही.आज प्रश्न असा आहे की, गोदावरीचे काँक्रिटीकरण काढण्याबाबत बोलणारे तथाकथित गोदाप्रेमी सध्या कुठे आहेत? नाशिकचे तापमान ४१.५ अंशांवर पोहोचले आहे – ही झळ त्यांना जाणवत नाही का? की एसीच्या थंड वातावरणात बसल्यामुळे बाहेरचे वास्तव त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही?
गगनचुंबी इमारती आणि हरवलेली हिरवाई
नाशिकमध्ये मोठमोठे प्रकल्प सुरू आहेत. गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. शहराचा ‘स्कायलाइन’ बदलत आहे. प्रत्येक नवीन प्रकल्पासोबत ‘विकास’ हा शब्द जोडला जातो.नियमांनुसार प्रत्येक प्रकल्पात ठराविक झाडे लावणे बंधनकारक आहे. पण ही झाडे प्रत्यक्षात लावली जातात का? लावली असतील, तर त्यांची देखभाल होते का? हे पाहण्याची जबाबदारी असलेली यंत्रणा कितपत सक्रिय आहे? ही यंत्रणा एसी ऑफिसमधून बाहेर पडून प्रत्यक्ष जागेवर पाहणी करणार का? की कागदोपत्री अहवालांवरच समाधान मानणार?
सामान्य माणूस: सगळ्यात मोठा बळी
या सगळ्या प्रक्रियेत सर्वात मोठा फटका बसतो तो सामान्य माणसाला. उष्णतेच्या झळा, पाण्याची टंचाई, प्रदूषण – या सगळ्याचा सामना त्यालाच करावा लागतो. बातम्यांमध्ये आपण वाचतो – “उन्हाळ्यामुळे अमुक व्यक्तीचा मृत्यू.” पण त्या एका ओळीमागे एक संपूर्ण आयुष्य असते, एक कुटुंब असते, एक संघर्ष असतो. राजकीय नेते, अधिकारी, आणि मोठे व्यावसायिक यांच्याकडे एसी घरे, गाड्या, आणि सुविधा असतात. पण सामान्य माणसाकडे काय? त्याच्याकडे फक्त सहन करण्याची ताकद असते.
निवडणुका आणि विस्मरण
निवडणुका असताना नागरिकांची आठवण होते. त्यांच्या समस्या ऐकल्या जातात. आश्वासने दिली जातात. पण निवडणुका संपल्या की, त्या आश्वासनांचे काय होते?आज नाशिकमध्ये अशी परिस्थिती आहे की, लोकांना वाटते – “आता कोणत्याही निवडणुका नाहीत, त्यामुळे आपले प्रश्न कोणी ऐकणार नाही.” ही भावना लोकशाहीसाठी धोकादायक आहे.
शेवटचा प्रश्न: जबाबदारी कोणाची?
नाशिकचे तापमान वाढत आहे, पर्यावरण बिघडत आहे, आणि शहराची ओळख बदलत आहे. यासाठी जबाबदार कोण? फक्त सरकार? फक्त नेते? की आपण सगळे? प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे. कारण आज जर आपण शांत राहिलो, तर उद्या आपल्या पुढच्या पिढ्यांना नाशिकची थंड हवा फक्त कथांमध्येच ऐकायला मिळेल.
(क्रमशः)
गोदाप्रेमी ,वृक्षप्रेमी नेमक्या कोणत्या भूमिकेत

