आदिती मोराणकर(शिक्षण विश्लेषक)
गणपती बुक करायला गेल्यानंतर जशा सगळ्या मुर्त्या एका साच्यातून काढलेल्या असतात, फक्त उपरण्याचा आणि पीतांबराचा रंग वेगळा असतो, त्याच नजरेतून आपण मुलांना बघत असतो, पण या प्रत्येक मुलाचा साचा वेगळा आहे ही मूलभूत गोष्ट आपण सोयीने विसरतो!
शेजारच्या सोसायटीमध्ये एक आई तिच्या तीन वर्षाच्या मुलाला स्टॅंडिंग लाईन, स्लीपिंग लाइन शिकवत होती. ते मुलाला जमत नाही असं पाहून मग तिने आपली गाडी “ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार” कडे वळवली. तेही जमत नाही ? मग ए फॉर एप्पल तरी म्हणून घेऊ असा विचार करून “ए फॉर एप्पल, बी फॉर बॉल” सुरु झालं.
तिची ती शिकवण्याची, तिच्या मुलाला सगळ्यांच्या पुढे ठेवण्याची धडपड,आपण सांगतोय ती गोष्ट मुलाच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न बघून हसावं का रडावं हेच कळत नव्हतं!हे सगळं पाठांतर करून,ते आईला म्हणून दाखवल्याशिवाय ती आपल्या मुलाला खेळायला जाऊ देणार नव्हती. ही परिस्थिती तुमच्या आजूबाजूला तुम्ही अनुभवली असेलच.
शिक्षण देण्याची घाई मुलांना पुढे निरीच्छ,उदास, निराश करते.प्रत्येक मुलाची शिक्षण आत्मसात करण्याची गती वेगवेगळी असते. आपलं मूल दुसऱ्या मुलापेक्षा वेगळं आहे हे आपण समजून घेत नाही.
गणपती बुक करायला गेल्यानंतर जशा सगळ्या मुर्त्या एका साच्यातून काढलेल्या असतात, फक्त उपरण्याचा आणि पीतांबराचा रंग वेगळा असतो, त्याच नजरेतून आपण मुलांना बघत असतो,पण या प्रत्येक मुलाचा साचा वेगळा आहे ही मूलभूत गोष्ट आपण सोयीने विसरतो!
प्रत्येक मुलानुसार त्याची शिकण्याची प्रवृत्ती, शिकण्याची पद्धत आणि शिकण्याचा वेळ बदलत असतो.आपल्याला काय करावसं वाटतंय, आपल्या आजूबाजूला काय चाललंय तसंच निसर्गातून हसत-खेळत ते मुल आपोआप शिकत असतं. आपण एखादं झाड लावतो, त्याला खतपाणी घालतो, त्याची कटिंग करतो, त्याच्या आजूबाजूला असलेले गवत काढतो, एवढं केलं तरी ते झाड त्याच्या वाढीला लागणारा वेळ घेणारच असतं कारण त्याच्या वाढीचा वेग निश्चित असतो. खत टाकतांना आपण जर नैसर्गिकरित्या त्याला उगवणाऱ्या फांद्या कापून टाकल्या तर ते झाड कसं बहरेल? अगदी हेच काही पालक त्यांच्या मुलांच्या बाबतीत करत असतात. एखादा अनुभव येताना, एखादी गोष्ट करताना, त्या मुलांना काही शोध लागला तर त्याचा आनंद घेण्याऐवजी “मी तुला हे करायला सांगितलं होतं का? उगीच काहीतरी करुन वेळ वाया घालवत असतो.” असं बोलून पालक त्या मुलांच्या उत्साहावर पाणी फिरवतात.
“आमची मुलं नुसती खेळतात, त्यांना इतर काहीही दिलं तरी त्यांना ते नको असतं फक्त खेळायला हवं असतं ! हे असेच खेळत राहिले तर शिकणार कधी?” अशी तक्रार कित्येक पालक माझ्याकडे घेऊन येतात. खरंतर पाच वर्षाच्या आतील मुलांचे शिक्षण खेळाद्वारेच होत असतं. पाणी, वाळू, फुगे, चमचे, वाट्या, स्वयंपाक घरातलं सगळं सामान वापरून मुलं काही ना काही शिकत असतात. कधी वास घेऊन, कधी वस्तूंना हात लावून, त्या वस्तू बद्दल समजून घ्यायचा प्रयत्न करत असतात. या वयात मुलांना चित्रकला आवडते, रंगकाम आवडतं म्हणून हळूहळू मुलांच्या कलाकलाने त्यांचं बालशिक्षण व्हायला हवं असं अनेक शास्त्रज्ञ सुद्धा सांगतात मारिया मॉंटेसरी हॉवर्ड गार्डनर यांच्यासारखे वैज्ञानिक तसंच आपल्या भारतातल्या ताराबाई मोडक, अनुताई वाघ, गिजुगाई बधेका यांच्यासारखे विचारवंत पण खेळाला केंद्रस्थानी ठेवून होणाऱ्या शिक्षणावर भर देतात.
या खेळण्याच्या प्रक्रियेतूनच मुल स्वतःला जाणतं. वेगवेगळ्या परिस्थितीत मुलं कशी व्यक्त होतात हे खेळण्याच्या माध्यमातून तुम्ही समजून घेऊ शकता. खेळता खेळता मुलं इतरांची काळजी घ्यायला शिकतात, खेळता खेळता वस्तूंची देवाणघेवाण करता येते, तसंच आपल्या मित्र-मैत्रिणींना आपल्याला मदत करता येते या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना हळूहळू जमायला लागतात. कुठलाही खेळ खेळताना काही नियम असतात, कधी कधी माघार घ्यावी लागते, कधी एकट्याने तर कधी कधी ग्रुपमध्ये खेळता येतं या काही गोष्टींची मुलाला जाणीव होते. खेळतांना सगळ्या शरीराचा वापर होतो, स्नायूंचा वापर होतो हाताचा आणि डोळ्यांचा वापर होतो. जसं रंगवणे, चिकटवणे, गिरवणे कशावर तरी हाताने ताल देत नवीन वाद्यांचा शोध लावणे, त्यानंतर ते तालात वाजवणे इत्यादी गोष्टी हळूहळू मुलांना करता येऊ लागतात. जवळपास उपलब्ध असलेल्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून नवीन खेळ शोधणं यात मुलं जास्त चांगले रमतात आणि त्यातून चांगले शिकतात सुद्धा!
घरात असलेले बिनकामाचे कागद,काही पुठ्ठे, खोके,थर्माकोल किंवा इतर काही आपल्याला टाकाऊ वाटणाऱ्या गोष्टी मुलांना आवर्जून खेळायला द्याव्यात.त्या वस्तू घरातून बाहेर फेकून न देता मुलांना त्यांच्याशी खेळू द्यावं. त्यांना त्या वस्तूंचा वापर कल्पकतेने आणि वेगवेगळ्या प्रकारे करू द्यावा. घरात थोडासा कचरा होईल पण यातून मुलांचा मेंदू समृद्ध होतो आहे हे लक्षात असू द्या!
मुलांना खेळण्यासाठी रिमोट कंट्रोलची गाडी किंवा बाहुली हवी असा अजिबातच नाही. मुलांच्या गरजेनुसार त्यांना काहीतरी शिकता येईल असं सामान आपण आपल्या घरात असलेल्या टाकाऊ वस्तूंमधून बनवू शकतो. संपूर्ण कुटुंब जर मुलाच्या शिकण्यामध्ये सहभागी झालं तर मूल अधिक चांगल्या प्रकारे शिकू शकतं म्हणून मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या विकासासाठी संपूर्ण कुटुंबाने एकत्रित प्रयत्न करायला हवा.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलाची कुटुंबामध्ये काळजी घेत असताना मुलांच्या भावना समजून घेणे महत्त्वाचं असतं. त्यांचं म्हणणं ऐकून घेताना, आपलं म्हणणं त्यांना समजावून सांगताना,त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगता आलं पाहिजे.जेव्हा आपण मुलांच्या भाषेमध्ये त्यांच्याशी संवाद साधतो तेव्हा त्यांची विचारप्रक्रिया देखील स्पष्ट होत जाते. आपण सुद्धा या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहोत याची जाणीव त्या मुलांना होते आणि मग कुटुंबात चालणाऱ्या सगळ्या गोष्टींमध्ये सकारात्मक सहभाग घ्यायची इच्छा त्या मुलांना होते.
माझी लेक चार वर्षाची असतांना आम्ही एक गाव दत्तक घेतलं होतं. त्या गावांमध्ये आदिवासी महिलांना प्रशिक्षण देऊन आम्ही त्यांच्याकडुन ज्वेलरी बनवून घ्यायचो आणि मग त्या आदिवासी बायकांनी तयार केलेल्या ज्वेलरीचं प्रदर्शन मांडून त्यातून आलेला पैसा आम्ही त्या आदिवासी लोकांना परत द्यायचो. हे काम चार वर्षांची माझी लेक अगदी जवळून बघत होती. हे नक्की काय आहे? असं विचारल्यानंतर तिच्या भाषेत, तिला समजेल अशा पद्धतीने सांगितलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान मला दिसलं. ती आता काय करणार याचा मला अंदाज नव्हता.काही दिवसांनी ती माझ्या ऑफिसमध्ये आली आणि तिथे त्या आदिवासी बायकांनी बनवलेले ज्वेलरी वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवलेली
तिने बघितली.त्यावेळेला एक एक बॉक्स उघडून त्यातली एक एक माळ तिने बाहेर काढली.माझी उत्सुकता ताणली जात होती पण तिला प्रश्न न विचारता ती पुढे काय करते हे बघण्यासाठी मी शांत बसले.बॉक्स मधून बाहेर काढलेली ज्वेलरी तिने टेबलावर ठेवली आणि मला म्हणाली,”मॅडम तुम्हाला हवी का एखादी माळ?” तिने असं विचारल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण प्रदर्शनांमध्ये हे विकणार आहे त्याची प्रॅक्टिस ती आत्ता करत आहे. मग मीही तिच्या छोट्याशा नाटकात सहभागी झाले. गिऱ्हाईक म्हणून मी तिला चार प्रश्न विचारले , हीच माळ मी का घेऊ? दुसरी का घेऊ नको? याची किंमत एवढी जास्त का? मला थोडी कमी करून द्या ना,असं साधारण दुकानात गेल्यानंतर आपण जे संभाषण करतो त्या पद्धतीचं संभाषण मी तिच्याशी सुरू केलं.माझ्या सगळ्या प्रश्नांची ती इतकी समर्पक उत्तरे देत होती की तिचे विचार करण्याची पद्धत बघून मला खरोखरच कौतुक वाटत होतं.
“अहो मॅडम, यामागे आम्हाला सुद्धा मेहनत असते.आम्ही गावात राहतो.या गोष्टी घ्यायला आम्हाला मुंबईला जावं लागतं, तिथे पैसे लागतात ,प्रवास करताना आमचा खर्च होतो आणि मग आम्ही मेहनत घेतली त्याचे थोडेफार पैसे पण मिळायला पाहिजेत ना आम्हाला?”असं ती चार वर्षाची मुलगी मला ठणकावून सांगत होती.तसं बघायला गेलं तर माळ बनवण्याच्या प्रत्यक्ष प्रक्रियेमध्ये ती कधीच सहभागी झाली नव्हती पण तरीसुद्धा मला उत्तर देतांना तिने स्वतःला या आदिवासी बायकांच्या जागी नेऊन ठेवलं होतं आणि त्यांच्यासारखा विचार करून ती माझ्या प्रश्नांची उत्तरे देत होती.
यावरून चार वर्षाच्या मुलाची विचार करण्याची क्षमता किती अफाट आहे हे लक्षात घ्या.माझ्या डोळ्यासमोर अशी अनेक उदाहरणे रोज घडत असतात पण विचार क्षमता असलेल्या या मुलांना आपण मात्र किती सहज “तुला यातलं काय कळतं” म्हणून गप्प बसवतो याचा प्रत्येक पालकांनी विचार करायला हवा. मुलांना पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण द्यायलाच हवं.”हा तुझा विषय नाही,यात तू बोलू नको, तुझ्यापर्यंत ही गोष्ट आलेली नाही” असे शेरे मारून त्यांच्या प्रश्नांना अनुत्तरीत ठेवणं हा एक प्रकारचा गुन्हा आहे कारण त्या प्रश्नांना मिळणाऱ्या उत्तरांमधूनच मुलांची प्रगतीची वाटचाल, विचार करण्याच्या दिशा मोकळ्या होत असतात.
मुलांना प्रश्न तेव्हाच पडतात जेव्हा ते कुठलीतरी कृती करून बघत असतात.आपण एक तर त्यांना ती कृती करण्यापासूनच थांबवतो आणि जर आपल्या नकळत मुलांनी ती कृती सुरू केली तर त्यातून येणाऱ्या अनुभवातून निर्माण होणारे प्रश्न आपण टाळतो.अश्याने ती मुलन शिकणार नाहीत. ती परत प्रयोग करायला घाबरतील. त्या मुलांच्या मनातले प्रश्न आपण नाही सोडवले तर ते बाहेर जाऊन तिसर्या माणसाला विचारतील आणि मग तो माणूस त्या प्रश्नांचं कुठल्या भाषेत आणि काय उत्तर देईल हे आपल्या हातात राहणार नाही.
तुमच्या मुलांना तुम्ही स्वतंत्र व्यक्ती म्हणून किती बरोबरीने वागवता यातून त्यांची स्वतःबद्दलची संकल्पना, स्व-आदर,स्वप्रतिमा कशी बनेल ते ठरतं.निर्णय घेताना ही मुलं उत्तम विचार करू शकतात.इतरांना सामावून घेताना दुसऱ्यांबद्दल विचार करताना त्यांच्या क्षमता छान विकसित होतात.तुमचं मुलं लहान आहे त्याला काही कळत नाही हे गृहितक सोडून आपल्या मुलाला सुद्धा खूप काही कळत आहे, जे कळत आहे ते तो कसे वापरतो,त्यातून त्याला काही इजा तर होत नाहीये ना,त्याला इजा होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची हे तो शिकतोय का ? याचं निरीक्षण आपण करायला हवं.
त्याची काळजी म्हणून त्याच्या सोबत असायला हवं पण त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा त्याच्यावर वचक ठेवण्यासाठी आपण त्याच्यासोबत असता कामा नये ! त्याच स्वावलंबन हे त्याला द्यायलाच हवं,आपलं मूल आपल्या संस्कारात वाढलं पाहिजे,ते हसत-खेळत वाढलं पाहिजे,त्यांच्यावर योग्य ते शिक्षणाचे संस्कार झाले पाहिजेत असं वाटत असेल आणि हे जर साध्य करायचं असेल तर सगळ्यात आधी तुमची स्वतः अपॉइंटमेंट घ्या आणि माझा वेळ मी जास्तीत जास्त माझ्या मुलाला देईल ही कमिटमेंट स्वतःला आज आत्ता या क्षणाला देऊन टाका !
तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न तुम्ही ई-मेल किंवा व्हाट्सअप करून मला विचारू शकता.भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह!

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.
मॅडम, अगदी सहजतेने सूचक पद्धतीने लिखाण केले आहे…
सर्वांना पचेल रुचेल आणि समजेल असे आहे माफक सांगितले आहे तुम्ही…
यातून सर्वानी बोध घ्यावा अगदी मीसुद्धा
धन्यवाद !!! खूप छान विचार मांडला आहे
मुलांना वाढवताना किती सजगता ठेवायला हवी हे खुप छान सोप्या शब्दांत मांडल आहेस.छान लेख👌👌👍
उत्तम लेख!
सुरवातीलाच दिलेले गणपतीबाप्पाच्या मूर्तीचं उदाहरण अगदी चपखल! हा लेख वाचून प्रत्येक पालक नक्कीच विचार करेल पुढच्या वेळी आपल्या पाल्याची इतरांशी तुलना करताना!
असेच छान लेख लिहीत रहा मॅडम, हे अंजन फार गरजेचे आहे! पुढील पिढ्याना आपण मदत करत आहात!
सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन.
साधा वाटणारा पण अतिशय महत्वाचा विषय फारच सोप्या भाषेत मांडला आहे.
लेखाचे शीर्षक फारच छान.
play way learning…… हा जो भाग आहे हा मुलांच्या जीवनात फार महत्वाचा आहे .
फक्त अभ्यास नाही तर कुठलीही गोष्ट तुम्ही मुलाला या माध्यमातून शिकवू शकता.