मुंबई,दि. १६ एप्रिल २०२३ – ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी आले होते,पण या पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागलं आहे. कार्यक्रमाच्या वेळी अनेक श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला असून यात दहा जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. या प्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी राज्यसरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. लोंढे यांनी याबाबत ट्विट केले आहे.
”आज सरकारच्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराच्या कार्यक्रमादरम्यान भर दुपारी एप्रिल महिन्यात उन्हामध्ये कार्यक्रम ठेवल्यामुळे व या सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप दहा लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक गंभीर आहेत. हा सरकारने केलेला मनुष्यवध आहे. यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे”, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे.
आज सरकारच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमादरम्यान भर दुपारी एप्रिल महिन्यात उन्हामध्ये कार्यक्रम ठेवल्यामुळे या सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप दहा लोकांचा मृत्यू झालाय अनेक लोक गंभीर आहेत हा सरकारने केलेला मनुष्यवध आहे
यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल…— Atul Londhe Patil (@atullondhe) April 16, 2023
अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात रविवारी १२३ हून अधिक लोकांना कडक उन्हामुळे डिहायड्रेशनसारख्या गंभीर उष्णतेशी संबंधित आरोग्य समस्यांचा सामना करावा लागला. एका सरकारी अधिकाऱ्याने ही माहिती दिली.त्यापैकी २५ ते ३० जणांना विविध स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
खारघरमधील ३०६ एकरच्या विशाल मैदानात झालेल्या या भव्य कार्यक्रमाला लाखो धर्माधिकारी समर्थक पोहोचले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमासाठी सकाळपासूनच लोकांची ये-जा सुरू झाली होती आणि सकाळी 11.30 वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम एक वाजेपर्यंत चालला.यातील अनेक जण शनिवारीच आले होते. हे मैदान माणसांनी खचाखच भरले होते आणि श्री सदस्य यांच्या अनुयायांच्या सोयीसाठी ऑडिओ/व्हिडिओचीही व्यवस्था करण्यात आली होती.
उघड्यावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून शेडची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. घटनास्थळी कर्तव्यावर असलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले,कार्यक्रमा दरम्यान एकूण १२३ लोकांनी उष्णतेशी संबंधित आरोग्य समस्या जसे की डिहायड्रेशनची तक्रार केली. त्याला तातडीने घटनास्थळी असलेल्या ३० मेडिकल बूथमध्ये नेण्यात आले. तेरा रुग्णांना विशेष उपचारांची आवश्यकता होती, त्यांना खाजगी रुग्णालयात नेण्यात आलेआहे.