चित्रपट सृष्टीला सुवर्ण वैभव देणारा ‘४७’ वर्षाचा सुपरहिट “शोले”

दीपक ठाकूर

0

दीपक ठाकूर
१५ऑगस्ट १९७५,हा दिवस हिंदी चित्रपट सृष्टीला एक वेगळेच वैभव देऊन गेला कारण बरोबर  ४७ वर्षा पूर्वी शोले हा सिनेमा रिलीज झाला होता.त्या दिवशी दिग्दर्शक रमेश सिप्पी, निर्माते जि पी सिप्पी अथवा त्यात काम करणाऱ्या कुठल्याही कलावंतांना आपण काहीतरी खूप भव्य दिव्य निर्माण केले ह्याची पुसट शी पण कल्पना नव्हती. पहिला दिवस थंड गेला पण दुसऱ्या दिवसानंतर चित्रपटाने जी काही धुंदी देश परदेशातील प्रेक्षकांना चढवली ती थेट ४७ वर्षे कायम आहे.

माझ्या सारख्या हजारो लोकांनी तर हा सिनेमा किमान ५० वेळा तरी बघितला असेल. शोले,प्रत्येक वेळी काही तरी नविन अनुभूती देऊन जातो. हा तसे म्हटले तर रोमँटिक चित्रपट नाही, तरीही त्यात प्रणयचे उत्तम सीन्स होते मग ते अमिताभ आणि जया यांचे मूक प्रेम असो किंवा धर्मेंद्र आणि हेमा यांच्यातील खेळकर देवाणघेवाण असो.हा चित्रपट विनोदी नाही तरीही त्यात वीरूबद्दल मौसीजींशी बोलताना अमिताभच्या डेडपॅन लूकची सर्वात मजेदार दृश्ये होती. धर्मेंद्रचा पाण्याच्या टाकीवर आत्महत्येचा प्रयत्न असो की हम अंग्रेजों के जमाने के जेलर है म्हणत अती उच्च दराची विनोद निर्मिती करणारा असराणी चा अभिनय असो किंवा धर्मेंद्र हेमाला झाडावरून आंबे कसे काढायचे हे शिकवत असो की बसंती म्हणजे हेमा मालिनी ची बकबक असो,संपूर्ण चित्रपटात रिलीफ देण्यासाठी ही  ठीकठिकाणी विनोदाची मस्त फोडणी देण्यात आली.

व्हिलन किती क्रूर असू शकतो ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गब्बर सिंग अर्थात अमजद खान ,ह्याने तर संधीचे  अक्षरश: सोने केले आणि गब्बर ला अजरामर करून ठेवले आहे. म्हणुनच डॅनी म्हणाला होता  एक उत्तम भूमिका  त्याने गमावली असली तरी अमजद खानने शोलेनंतर खलनायकांची किंमत वाढवली.हा एक अ‍ॅक्शन चित्रपट आहे का की ज्यात त्यावेळच्या भारतीय चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शन सीन आहेत? मी तर म्हणेन  की हे एक शक्तिशाली नाटक आहे जे तुम्हाला पहिल्या फ्रेमपासून गुंतवून ठेवते.

शोले हा आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट स्टारकास्टसह बनलेला सर्वात मोठा चित्रपट आहे. आजपर्यंत एकही चित्रपट त्याच्या एकूण महानतेशी बरोबरी करू शकला नाही. कथा, संगीत, सिनेमॅटोग्राफी, अभिनय, दिग्दर्शन  आणि एक सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे ह्या चित्रपटाचे एडिटर होते मराठमोळे माधव तथा एम एस शिंदे. या सर्वानी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

“तुम्हारा नाम क्या है बसंती?” हा शोलेचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट संवाद आहे. आणि त्याच बरोबर इतना सन्नाटा क्यू है भाई. माझे ठाम मत आहे ह्याचा सर्वात मजबूत प्रभाव म्हणजे त्याचा भावनिक गाभा. अमिताभ मरण पावल्यावर शेवट न बदलण्यात रमेश सिप्पी अगदी बरोबर ठरले होते. तुम्ही पण मान्य कराल की आतापर्यंत चित्रित केलेले हे सर्वोत्तम मृत्यू दृश्य आहे. शेवटी जेव्हा धर्मेंद्र गाव सोडतो तेव्हा तो इतका दुःखी असतो की तो त्याची मैत्रीण हेमाला सुद्धा विसरतो. मध्यन्तरा दरम्यान जेव्हा प्रेक्षकांना संजीव कुमारचे हात कापलेले आढळले तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसतो.

एकूणच शोले, खूपच अलौकीक, भव्य दिव्य पण त्याच वेळेस प्रेक्षकांना शेवट पर्यंत खिळवून ठेवतो. तुम्हा सर्वाना एक गोष्ट लक्षात आलीच असेल की ह्यातली छोटी मोठी सर्वच पात्रे आपला एक वेगळाच ठसा उमटवून जातात, मग तो मॅकमोहन चा सांभा असो, की विजू खोटे चा कालिया, ए के हंगल यांनी साकारलेला  रहीम चाचा असो की सचिनचा अहमद, महबुबा वर भन्नाट नाचणारा  जलाल आगा असो की केस्टो मुखर्जी चा हरी राम न्हाई ,जगदीप चा सुरमा भोपाली असो की सत्यम कप्पू चा रामू काका असो की लीला मिश्रा ची मौसी असो सर्वांनी आपआपल्या भूमिका चोख आणि दमदार बजावल्याआहेत.

आर डी बर्मन चे अफलातून संगीत, आनंद बक्षीची एकाहून एक हिट गाणी, सलीम -जावेद ची कथा आणि त्याहीपेक्षा उत्तम पटकथा आणि संवाद आणि द्वारका दिवेचाचे अफलातून कॅमेरा वर्क ,सगळंच अदभूत, अद्वितीय आणि अलौकिक. धर्मेंद्र, अमिताभ, संजीव कुमार, जया, हेमा, अमजद ह्या प्रमुख कलाकारांचा अफलातून अभिनय.असा चित्रपट क्वचितच बनतो आणि आयुष्यभर आपल्या ह्रदयात जागा कायमची रिसर्व करून ठेवतो. सलाम शोले .

दीपक ठाकूर
मोबाईल -९८२३३५१५०५

Deepak Thakur
दीपक ठाकूर,

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!