६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा :‘गोष्ट एका पैठणीची’सर्वोत्तम मराठी चित्रपट
'जून', 'गोदाकाठ' आणि 'अवांछित' या तीनही चित्रपटांना विशेष ज्युरी मेंशन पुरस्कार,‘मी वसंतराव’ या मराठी चित्रपटातील पार्श्वगायनासाठी राहूल देशपांडे यांना रजत कमळ पुरस्कार
नवी दिल्ली – वर्ष २०२० साठीच्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा आज दिल्ली येथे करण्यात आली. यामध्ये ‘गोष्ट एका पैठणीची’ (पैठणीवर कथा) या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘टकटक’ आणि ‘सुमी’ या मराठी चित्रपटातील बाल कलाकारांना उत्कृष्ट बाल कलाकारांचा पुरस्कार जाहीर, तर ‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’ या हिंदी चित्रपटाला सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन श्रेणीतील पुरस्कार जाहिर झाला असून याच चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अजय देवगण यांना जाहीर झाला आहे.येथील नॅशनल मिडीया सेंटर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. यामध्ये विविध श्रेणीत मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे.
‘गोष्ट एका पैठणीची’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
प्लानेट मराठीतर्फे निर्मित ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शंतनू गणेश रोडे यांनी केले आहे.या चित्रपटाला एक लाख रुपयांचा रजत कमळ पुरस्कार जाहीर झाला आहे.
‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’ या हिंदी चित्रपटाला सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण फिल्मस् आणि दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. या दोघांनाही सुवर्ण कमळ आणि दोन लाख रूपये रोखीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अजय देवगण आणि तामिळ अभिनेता सुर्या (चित्रपट – सोराराई पोट्टरू) यांना संयुक्तरित्या उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप रजत कमळ आणि पन्नास हजार रुपये असे आहे. तानाजी या चित्रपटाला उत्कृष्ट वेशभुषेसाठीही पुरस्कार जाहीर झाला असून वेशभूषाकार नचिकेत बर्वे आणि महेश र्शेला यांना रजत कमळ आणि पन्नास हजार रूपये असा पुरस्कार जाहीर झाला आहे.
महिला व बालकांच्या सक्षमीकरणावर आधारित तसेच अनिष्ट चालीरीतींवर बोट ठेवणारा ‘फनरल’ या मराठी चित्रपटाला सामाजिक विषयावरील श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते बीफोर-आफटर इंटरटेंमेंट व दिग्दर्शक विवेक दुबे यांना एक लाख पन्नास हजार रुपयांचा रजत कमळ हा पुरस्कार जाहीर झाला आहे.’टकटक’ आणि ‘सुमी’ या मराठी चित्रपटातील बाल कलाकारांना उत्कृष्ट बाल कलाकारांचा पुरस्कार जाहीर
‘टकटक’ आणि ‘सुमी’ या मराठी चित्रपटातील बाल कलाकारांना उत्कृष्ट बाल कलाकारांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘सुमी’ या सिनेमातील आकांक्षा पिंगळे आणि दिव्येश इंदुलकर या बालकांना आणि ‘टकटक’ या सिनेमासाठी अनिष मंगेश गोसावी यांना रजत कमळ पुरस्कार जाहीर झाला आहे.
‘सुमी’ या चित्रपटाला उत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती हर्षला कामत एंटरटेंमेंट यांनी केली आहे, तर दिग्दर्शन अमोल गोळे यांनी केले आहे. या चित्रपटाला सुवर्ण कमळ आणि प्रत्येकी एक लाख पन्नास हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘जून’, ‘गोदाकाठ’ आणि ‘अवांछित’ या तीनही चित्रपटांना विशेष ज्युरी मेंशन पुरस्कार जाहीर झालेला आहे. जून चित्रपटासाठी सिद्धार्थ मेनन या अभिनेत्याला तर गोदाकाठ व अवांछित या दोन्ही चित्रपटांसाठी अभिनेते किशोर कदम यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.
‘मी वसंतराव’ या मराठी चित्रपटातील पार्श्वगायनासाठी राहूल देशपांडे यांना रजत कमळ पुरस्कार जाहीर झालेला आहे. तसेच या चित्रपटाला उत्कृष्ट ऑडिओग्राफीचा पुरस्कारही जाहीर झालेला आहे. या चित्रपटाचे ध्वनी संयोजक अनमोल भावे यांना रजत कमळ आणि पन्नास हजार रुपये रोख पुरस्कार जाहीर झाला आहे. हिंदी सिनेमा ‘सायना’तील गीतासाठी गीतकार मनोज मुंतशिर यांना रजत कमळचा पुरस्कार जाहीर झालेला आहे.
नॉन फिचर फिल्म या श्रेणीत मराठी “कुंकुमार्चन चित्रपटाला पुरस्कार जाहीर
कौटुंबिक मुल्यांवर आधारित ‘कुंकुमार्चन’ या मराठी चित्रपटाला कौटुंबिक मुल्यांवर आधारित सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती स्टुडिओ फिल्मी माँक्स आणि दिग्दर्शन अभिजित दळवी यांनी केले आहे. या दोघांनाही प्रत्येकी पन्नास हजार रूपयांचा रजत कमळ पुरस्कार जाहीर झाला आहे.
मराठी मुलुखाच्या प्रतिभेची मोहर उमटवणाऱ्या कलावंताचा अभिमान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘मनोरंजन क्षेत्रातील मानाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी मुलुखाच्या प्रतिभेची मोहर उमटवणाऱ्या कलावंताचा अभिमान आहे,’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कांरामध्ये बाजी मारणाऱ्या विविध श्रेणीतील चित्रपटांचे निर्माता, दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ज्ञ आदींचे अभिनंदन केले आहे.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने आज 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मराठी चित्रपट ‘सुमी’ ने पटकावला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून ख्यातनाम गायक राहूल देशपांडे यांना ‘मी वसंतराव’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
‘गोष्ट एका पैठणीची’ (सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट), ‘फनरल’ (सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट), ‘जून, गोदाकाठ, अवांछित’ (तीनही विशेष उल्लेखनीय चित्रपट) पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. नरवीर तानाजी मालुसरेंच्या पराक्रमांवर आधारित ‘तानाजी – द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार आणि त्यातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल अजय देवगण यांचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून पुरस्कार पटकावणाऱ्या अनिश गोसावी, आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर यांचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे.