भावार्थ दासबोध -भाग ६२

निरुपण :पद्माकर देशपांडे

0

दशक पाचवे समास तिसरा शिष्याचे वर्णन
जय जय रघुवीर समर्थ.
स्वतः आतून पापात्मा.समोरच्या विषयी दयामाया बाळगत नाही. हिंसक, दुराचारी असतो.दुसऱ्याच्या दुःखामुळे त्याला दुःख होत नाही. दुसर्‍याचे दुःख जाणत नाही. गांजलेल्यांना आणखी त्रास देतात. त्यांना त्रास झाला की मनामध्ये आनंद होतो. स्वतःच्या दुःखाने झुरतो आणि दुसऱ्याच्या दुःखाला हसतो, त्याला यमपुरी मिळते आणि राजदूत मारतात. अशा प्रकारचा मदांध असेल त्याला भगवंत कसा जोडता येईल? पूर्वपातकामुळे त्याला सुबुद्धी आवडत नाही.

अशा व्यक्तीच्या देहाचा अंत जवळ आल्यावर त्याचे अवयव क्षीण होतात आणि जिवलग त्याचा त्याग करतात. अशा प्रकारचे नसतात ते सत्शिष्य असतात त्यांना स्वानंदाचे सोहळे भोगायला मिळतात. जेथे मनामध्ये विकल्प निर्माण होतो, कुळाचा अभिमान मागे लागतो ते प्राणी प्रपंचाच्या मुळे दुःखी कष्टी होतात. ज्याच्यामुळे दुःख झाले तेच मनामध्ये पक्के धरले त्यामुळे पुन्हा दुःख प्राप्त झाले. संसारामुळे सुख झाले असे पाहिले नाही, ऐकले नाही, हे जाणून देखील ज्यांनी अहित केले ते दुःखी होतात. संसारात सुख मानतात ते मूढमती असून जाणून बुजून डोळे झाकणारे पढतमूर्ख आहेत. प्रपंच सुखाने करपण थोडा तरी परमार्थ करावा, परमार्थ पूर्ण बुडवावा हे योग्य नव्हे. आपण गुरुशिष्यांची ओळख करून घेतली आता उपदेशाचे लक्षण सांगतो.
इतिश्री गुरूशिष्य लक्षण नाम समास तृतीय समाप्त.

दशक पाचवे समास चौथा उपदेशाची लक्षणे
उपदेशाची लक्षणे बहुविध आहेत. त्यांचा विस्तार खूप होईल त्यापैकी काही सांगतो ती ऐका. पुष्कळ मंत्रोपदेश करतात. कोणी नाम सांगतात, कोणी ओंकाराचा जप सांगतात. शिवमंत्र, भवानी मंत्र, विष्णु मंत्र, महालक्ष्मी मंत्र, अवधूत मंत्र, गणेश मंत्र, मार्तंड मंत्र सांगतात. मत्स्य, कूर्म, वराहमंत्र, नृसिंह मंत्र, वामन मंत्र, भार्गव मंत्र, रघुनाथ मंत्र, कृष्ण मंत्र सांगतात. भैरव मंत्र, मल्हारी मंत्र, हनुमंत मंत्र, नारायण मंत्र, पांडुरंग मंत्र, अघोर मंत्र सांगतात. शेष मंत्र, गरुड मंत्र, वायु मंत्र, वेताळ मंत्र, झोटिंग मंत्र असे मंत्र किती म्हणून सांगावे? बाळामंत्र, बगुळा मंत्र, काली मंत्र, कंकाळी मंत्र, बटूक मंत्र, नाना शक्तींचे नाना मंत्र. जितके देव जितके मंत्र. सोपे, अवघड, विचित्र, खेचर, दारुण बीजाचे मंत्र. पृथ्वीवर पाहू जाता देवांची गणना कोण करेल? जितके देव तितके मंत्र म्हणून म्हणून त्याचे किती वर्णन करायचं?

असंख्य मंत्रमाळा, एकाहून एक आगळा, विचित्र मायेची कला कोण जाणणार? कित्येक मंत्राने भुतेजातात किती एक मंत्राने व्यथा नष्ट होतात, कित्येक मंत्राने थंडीताप नाहीसा होतो, सापाचे विष उतरते असे नाना परीचे मंत्र उपदेश केले जातात. त्यांचे जप, ध्यान, पूजा, यंत्र, विधान सांगितले जाते. एक शिव सांगतात, एक हरी हरी म्हणतात,

एक विठ्ठल विठ्ठल असे उपदेश करतात. एक सांगतात कृष्ण कृष्ण, एक सांगतात विष्णू विष्णू, एक नारायण नारायण म्हणून उपदेश करतात. एक अच्युत अच्युत, एक अनंत अनंत, एक सांगतात दत्त दत्त म्हणत जा! एक सांगतात राम राम, एक सांगतात ओम ओम, एक म्हणतात मेघश्याम अनेक वेळा स्मरण करावे. एक सांगतात गुरु गुरु, एक म्हणतात परमेश्वर, एक म्हणतात विघ्नहर चिंतीत जावा. एक सांगतात श्यामराज, एक सांगतात गरुडध्वज, एक सांगतात अधोक्षज म्हणत जावे. एक म्हणतात देव देव, एक म्हणतात केशव केशव, एक म्हणतात भार्गव भार्गव म्हणत जावे. एक विश्वनाथ म्हणवतात, एक मल्हारी सांगतात, एक तुकाई तुकाई असा जप करण्यास सांगतात.अशी उपदेशाची लक्षणे समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत. पुढील लक्षणे पुढील भागात पाहू या. जय जय रघुवीर समर्थ. (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!