दशक पाचवे समास चौथा उपदेशाचे वर्णन
जय जय रघुवीर समर्थ.समर्थ रामदास स्वामी महाराज उपदेशाचे विविध प्रकार कथन करीत आहेत. उपदेशाचे प्रकार किती म्हणून सांगावे? शिवशक्तीची अनंत नावे आहेत. आपल्या इच्छेप्रमाणे उपदेश दिला जातो. एक चार मुद्रा, खेचरी-भूचरी-चाचरी-अगोचरी या चार मुद्रा एकामध्ये आसने करण्याचे उपदेश केले जातात.एकामध्ये देखणे,एक अनाहत ध्वनी, एक गुरु पिंडज्ञान सांगतात.
एक कर्ममार्ग सांगतो. एक उपासनामार्ग सांगतो. अष्टांगयोग नाना चक्रांची माहिती देतो. एक तप सांगतो, एक आजपा जप सांगतो. एक तत्वाची विस्तारपूर्वक माहिती देतो. एक सगुण सांगतो, एक निर्गुण सांगतो, एक तीर्थाटन करावे म्हणतो, एक महावाक्य सांगतो, त्याचा जप करावा म्हणून सांगतो, सर्व ब्रह्म म्हणून उपदेश करतो. एक शाक्त मार्ग सांगतो, एक मुक्त मार्ग सांगतो, एक इंद्रियपूजन करण्यास सांगतो, एक वशीकरण सांगतो, स्तंभन, मोहन, उच्चाटन नाना चेटके स्वतः सांगतात. अशा प्रकारची उपदेशाची स्थिती किती म्हणून सांगावी? असे असंख्य उपदेश आहेत. असे अनेक उपदेश असले तरी ते ज्ञानावाचून निरर्थक आहेत.
याविषयी एक भगवदवचन आहे.नही ज्ञानेन सदृशं पवित्र मीहमुत्तमम.. ज्ञानासारखे पवित्र अन्य नाही म्हणून आत्मज्ञान साधले पाहिजे. सर्व उपदेशांमध्ये आत्मज्ञानाचा उपदेश विशेष असून याबाबत जगदीश पुष्कळ वेळा बोलला आहे.आत्मज्ञानाचा महिमा चतुर्मुख ब्रह्मा देखील जाणून घेऊ शकत नाही. तेथे बापडा जीवात्मा काय जाणणार? सर्व तीर्थ यांची पुण्याई, स्नान-दानामुळे मिळणाऱ्या पुण्यापेक्षा ज्ञान मिळाले म्हणजे मिळणारे पुण्य कोटीपट श्रेष्ठ आहे. म्हणून आत्मज्ञान हे गहनाहून गहन आहे. त्याचं लक्षण सांगत आहे. जय जय रघुवीर समर्थ
इति श्रीदासबोधे गुरु शिष्यसंवाडे उपदेशनाम समास चतुर्थ समाप्त
दशक पाचवा समास पाचवा बहुधाज्ञान
जय जय रघुवीर समर्थ. जोपर्यंत प्रांजळ ज्ञान मिळत नाही तोपर्यंत सगळे काही निष्फळ आहे. ज्ञानावाचून तळमळ जाणार नाही. ज्ञान म्हणताना भ्रम वाटतो, त्याचे लक्षण काय असेल म्हणून त्याची माहिती आता सांगतो. भूत भविष्य वर्तमान स्पष्ट समजते याला ज्ञान म्हणतात पण ते खरं ज्ञान नाही. पुष्कळ विद्या पठण केले, संगीत शास्त्र राग ज्ञान, वैद्यकशास्त्र, वेदाध्ययन केले हेही ज्ञान नव्हे. नाना व्यवसायांचे ज्ञान, नाना दीक्षेचे ज्ञान, नाना परीक्षेचे ज्ञान हे ज्ञान नव्हे. नाना वनितांची परीक्षा, नाना मनुष्यांची परीक्षा, नाना नरांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना अश्वांची परीक्षा, नाना गजांची परीक्षा, नाना श्वापदांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना पशूंची परीक्षा, नाना पक्षांची परीक्षा, नाना भुतांची परीक्षा हे ज्ञान नव्हे.
नाना वाहनांची परीक्षा, वस्त्रांची परीक्षा, नाना शस्त्रांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना धातूंची परीक्षा, नाना नाण्यांची परीक्षा, नाना रत्नांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना पाषाण परीक्षा, नाना काष्ठांची परीक्षा, परीक्षा नाना वाद्यांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना भूमिंची परीक्षा, नाना जळाची परीक्षा, नाना सतेज परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना रसांची परीक्षा, नाना बीजांची परीक्षा, नाना अंकूर परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना पुष्पांची परीक्षा, नाना फळांची परीक्षा, नाना वल्लीची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना दुःखांची परीक्षा, नाना रोगांची परीक्षा, नाना चिन्हांची परीक्षा, नाना मंत्रांची परीक्षा, नाना यंत्रांची परीक्षा, नाना मूर्तींची परीक्षा हे ज्ञान नव्हे. अशा प्रकारे ज्ञान म्हणजे काय नाही ते समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत. पुढील लक्षणे पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७