दशक ५ समास ९ साधकाची लक्षणे
स्वप्नामध्ये जे भय वाटले ते जागृतीस आल्यानंतर राहिले नाही. सगळे खोटे आहे हे लक्षात आले त्याचे नाव साधक. माया प्रत्यक्ष आहे असे लोकांना वाटते ते ज्याला स्वानुभवामुळे योग्य वाटत नाही तो साधक. निद्रेतून जागृत झाला तो स्वप्नाच्या भयापासून चुकला; माया ज्याला सोडून गेली व जो स्वरूपात लीन झाला अशाप्रकारची अंतरस्थिती निर्माण झाली, त्याने बाहेरील गोष्टींबाबत निस्पृहता स्वीकारली व संसाराच्या उपाधीचा त्याग केला, त्याचे नाव साधक. कामापासून सुटला, क्रोधापासून पळाला, मद, मत्सर सोडून दिला. कुळाचा अभिमान सोडला.
लोकलाजेला लाजवले, विरक्तीच्या बळामुळे परमार्थ वाढविला. अविद्येपासून दूर गेला, प्रपंचापासून निसटला, लोभाच्या हातून सुटला, थोरपणा नाकारला, वैभव लाथाडले, विरक्तीमुळे आपले महत्त्व वाढू दिले नाही. भेदाचा मठ नष्ट केला, अहंकार सोडून पाडला, संदेहशत्रू पायाला धरून आपटला! विकल्पाचा वध केला, भवसिंधु बाजूला सारला, सगळ्या भुतांचा विरोध तोडून टाकला. भवाभयास भडकावले, काळाच्या तंगड्या तोडल्या, जन्म-मृत्यूचे मस्तक हाणून फोडले. देहरूपी संमंधावर हल्ला केला, संकल्पाच्या विरोधात उठाव केला, अकस्मात कल्पनेचा घात केला. दुष्ट भयास मारले, वासनामय सुक्ष्म देहास जिंकले, विवेकाने पाखंडास मागे टाकले. गर्वावर गर्व केला, स्वार्थ अनर्थात घातला, नितीन्यायाद्वारे अनार्थाचेही निर्दालन केले. मोहाचे मध्येच खंडन केले, दुःखाला देहरहित केले, शोकाला एका बाजूला तोडून टाकले. द्वेषाला हद्दपार केले,
अभावाच्या नरडीचा घोट घेतला, कुतार्काच्या पोटात धाक निर्माण केला. ज्ञानाने विवेक माजला, त्यामुळे निश्चय बलवान झाला, वैराग्यबळाने अवगुणांचा संहार केला. स्वधर्माने अधर्मास लुटले, सत्कर्माने कुकार्मास झुगारले, विचाराने अविचारास वाटेला लावले. तिरस्कार चिरडला, द्वेष खरवडून टाकला, अविशादाने विशाद पायाखाली घातला. कोपावर घाला घातला, कपटीपणाला अंतरात कुटून काढले, सगळ्या जगातील लोकांशी मैत्री केली. प्रवृत्तीचा त्याग केला, नातेवाईकांचा संघ सोडला, निवृत्तीच्या वाटेवरून ज्ञानयोग साधला. विषयरुपी ठकास ठकविले, कुविद्येला वेढा घालून नष्ट केले,
आप्ततस्करापासून स्वतःला सोडवले. पराधीनतेवर रागावला, ममतेवर संतापला, वाईट इच्छांचा एकदम त्याग केला. मनाला स्वरूपामध्ये घातले, यातनेला यातना दिल्या, दृढनिश्चय आणि प्रयत्नांची प्रतिष्ठापना केली. अभ्यासाचा संग धरला, सारासार विचार करून प्रयत्नाला सोबती करून साधनामार्गावर निघाला. सावध दक्ष असतो तो साधक, तो नित्य-अनित्य विवेक पाहतो, मीपणाची संगत सोडून तो एकमेव सत्संग धरतो. बलपूर्वक संसार बाजूला सारतो, विचारपूर्वक व्यापताप बाजूला करतो, शुद्ध आचारा द्वारे अनाचार भ्रष्ट करतो. विसरायचे विसरतो, आळसाचा आळस करतो, मनाचे इतस्ततः भटकणे काबूत आणतो. विविध निरुपणाच्या आधाराने तो अवगुण सोडून देतो असा तो साधक जाणावा. प्रयत्नपूर्वक सगळं सोडणारा,
त्याग करणारा म्हणून त्याला साधक म्हणतात. आता सिध्दाची लक्षणे पुढील समासात जाणुया.इथे एक प्रश्न निर्माण झाला साधक निस्पृह असतो, संसारी व्यक्तीला त्याग करता येत नाही; म्हणजे तो साधक होऊ शकत नाही का? श्रोत्यांच्या या प्रश्नाला पुढल्या समासात उत्तर देत आहे. ते तत्पर होऊन ऐका.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे साधक लक्षण निरूपण नाम समास नववा समाप्त. जय जय राघुविर समर्थ!(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७