मुंबई,७ जुलै २०२३ –महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा बंड केल्यानंतर अनेक नेते शिवसेनेत दाखल होत आहेत.विप्लव बाजोरिया, मनिषा कायंदे पाठोपाठ विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत काही वेळात प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. थोडाच वेळात विधान भवनात हा प्रवेश सोहळा होणार असल्याचे समजते आहे.
नीलम गोऱ्हे यांनी १९९८ साली शिवसेना पक्षात प्रवेश घेतला, तेव्हापासून त्यांची निष्ठावान शिवसैनिक आणि शिवसेनेचा महिला चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. महिलांच्या प्रश्नावर तसेच इतर सामाजिक प्रश्नावर सातत्याने आवाज उठवण्यात त्या नेहमी अग्रेसर असतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासू कार्यकर्त्या म्हणूनही त्यांची ओळख आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर नीलम गोऱ्हे या सातत्याने ठाकरे गटाची बाजू मांडत होत्या. मात्र, आता नीलम गोऱ्हे याच शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच नीलम गोऱ्हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.अखेर आज दुपारी नीलम गोऱ्हे यांच्यासह दोन पदाधिकार शिवसेनेत प्रवेश करणार आहे.