नाशिक,दि. ९ जुलै २०२३ –राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यानंतर देवळालीच्या आमदार सरोज अहिरे चर्चेत आहेत.यातच अजित पवारांनी ५४ पैकी ३२ आमदारांना आपल्या गटात खेचत शरद पवारांना मोठा धक्का दिला.अजित पवारांच्या बंडावेळी काही आमदारांनी अजित पवार गटात लगेच न जाता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. या तटस्थ आमदारांच्या यादीत सरोज अहिरे यांचा समावेश आहे.
सध्या सरोज अहिरे यांची प्रकृती बरी नसल्याने नाशिक शहरातील संजीवनी हॉस्पिटल दाखल असून त्या उपचार घेत आहेत. आज सकाळीच सुप्रिया सुळे यांनी सरोज अहिरेंची रुग्णालयात भेट घेतली होती. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुळे यांनी सरोजताई माझ्या बहीण आहेत आणि जेव्हा आपल्या कुटुंबातील व्यक्ती दवाखान्यात असते तेव्हा त्या व्यक्तीची विचारपूस करणं माझी जबाबदारी आहे.असं सांगितलं
हे नातं प्रेमाचं आहे यात राजकारणाचा प्रश्नच येत नाही. सध्या त्या रुग्णालयात आहेत आधी त्यांना बरं होऊद्या त्यानंतर त्यांच्याशी राजकीय चर्चा करता येईल असे सुळे यांनी सांगितले होते. सुळे यांच्या भेटीनंतर आता अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनीही सरोज अहिरे यांची रुग्णालयात भेट घेतली आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. नुकतीच शरद पवार गटाच्या दोन आमदारांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवार गटाची वाट धरली आहे.
दरम्यान, सरोज आहिरे यांनी आपली भूमिका अद्यापही जाहीर केलेली नसली तरी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तटस्थ आमदार आहे. यावर विचारले असता, ‘सरोज आहिरे या दोन दिवस अजितदादा यांच्या बंगल्यावर होत्या. त्यांनी सह्या वगैरे केल्या आहे,’ अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच त्यांची तब्येत बरी नसणार, म्हणून त्या नॉट रिचेबल झाल्या होत्या, असे देखील छगन भुजबळ म्हणाले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी संजीवनी रुग्णालयाचे डॉ.अमेय कुलकर्णी,डॉ.मधुर केळकर कुलकर्णी यांच्याशी आमदार सरोज आहिरे यांच्यावर सुरू असलेल्या उपाचाराबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच आवश्यकता असल्यास मुंबईच्या तज्ञ डॉक्टरांशी चर्चा करून अधिक तपासण्या करून आवश्यकतेनुसार मुंबईला उपचार घ्यावा असे त्यांनी सांगितले.