पवार साहेब माफी नाही येवल्याची जनता तुमचे आभार मानते,त्यांनी विकास पहिला आहे : भुजबळ

0

नाशिक,दि.९ जुलै २०२३ –कालच्या सभेचे आयोजन ज्यांनी केले. त्या व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात काम केले म्हणून पक्षाने हाकलवून दिले. पक्षाने त्यांची हकालपट्टी केली होती. त्यांचे पक्षासाठी, येवल्यासाठी, नाशिककरांसाठी योगदान काय….? जे दुसऱ्या पक्षाचे लोक सतत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विरोधात भूमिका घेतात. ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला. तीच  मंडळी ति येवला येथे स्टेजवर का असा सवाल राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थितीत करत ज्या सहकाऱ्यांनी खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस येवला आणि नाशिक जिल्ह्यात वाढवली ते सगळे सहकारी काल माझ्यासोबत होते असे मत मांडले…

काल साहेबांनी माफी मागितली. २० वर्षांपूर्वी चूक केली असल्याचे म्हंटले. साहेबांनी माफी मागितली त्याचे वाईट वाटले. जनता मात्र पवार साहेबांचे आभार मानते कारण त्यांनी विकास पहिला आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले. . ते म्हणाले की, आपण काल माफी मागितली पण इथले लोक आपले आभार मानत आहेत कारण त्यांनी नाशिक आणि येवल्याचा विकास पाहिला आहे. आपणच मागे एका ठिकाणी म्हणाला होता की, बारामती नंतर सर्वात विकास कोणत्या तालुक्याचा झाला असेल तर तो येवल्याचा झाला आहे, आणि तो भुजबळांनी केला. आता आमच्या सहकार्यांना विकास का दिसत नाही तेच कोडं आम्हाला पडलय …? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नाशिक येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कार्याध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

नाशिकची जनता माझ्यासोबत
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, कालच्या सभेच नियोजन ज्या माणिकराव शिंदें यांनी केले होते. त्यांना २ जानेवारी २० ला पक्षातून बाहेर केले. शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेली होती. त्यांचे पक्षासाठी योगदान नाही, येवल्यासाठी तरी काय योगदान आहे, हे मला माहिती नाही. शिस्तभंगाची कारवाई झालेल्याकडून सभेची तयारी करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेणारे दराडे बंधू स्टेजवर होते. जे वृद्ध आहेत, ज्यांचे काम संपले होते ते सभेला आले होते, तिथले तरुण मंडळी माझ्या स्वागतासाठी आले होते, त्याचबरोबर नाशिकची जनता माझ्यासोबत असल्याचा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला.

ते म्हणाले की, काल झालेल्या स्वागत कार्यक्रमात नाशिककर आमच्या सोबत आहेत हे सिद्ध झाले. त्याबद्दल सर्वांचे आभार. येवला विधानसभेत अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना देखील लढलो. येवला मतदारसंघ हा सुरक्षित नव्हता, कार्यकर्त्यांची मेहनत आणि जनेतेचे प्रेम यामुळे सर्वदूर हा पक्ष आम्ही पसरविला. या काळात मोठा संघर्ष आम्हाला करावा लागला असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, माझ्या समोर धरणगाव, एरंडोल, वैजापूर, जुन्नर आणि येवला असे पर्याय होते. यामध्ये काम करण्याची संधी ही येवल्यात असल्याचे मी पवार साहेबांना सांगितले. मी स्वतः येवल्याची निवड केली. मी येवल्याची निवड करावी हे पवारांनी सांगितले नाही. हा शिवसेनेचा मतदार संघ होता, मी तिथे संघर्ष केला. येवला मतदारसंघात केलेल्या विकासकामामुळे लोकांनी मला चार वेळेला निवडून दिले. लाखांचे मताधिक्य घेऊन मी निवडून येतो.

ते म्हणाले की, येवला मी यायच्या अगोदर कसा होता आणि आत्ता कसा आहे हे सर्वांना माहीत आहे. पैठणीची परिस्थिती या अगोदर कशी होती, किती दुकाने या अगोदर होती आता किती आहेत…? मांजरपाडा प्रकल्पच आम्ही उभा केला आणि तो पूर्णत्वाच्या दृष्टीने जातोय. लोकांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून आम्हीच प्रयत्न केले. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत नाशिकच्या बाबतीत निर्णय घेतला गेला आहे. पहिल्याच बैठकीत त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते आणि दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा वळण योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या विकासाचे आणि पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आमचे लक्ष आहे आणि आम्ही काम करतोय. जास्तीत जास्त पाणी नाशिक आणि मराठवाड्यात कसे जाईल यासाठी काम करत आहे. एक लाख कोटींचे कर्ज घ्यायचे वेळ आली तरी चालेल पण पाणी वळवूया असे मी पवार साहेबांशी बोललो होतो. अधिवेशनात सुदधा मी अनेक वेळा बोललो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलतांना मंत्री भुजबळ म्हणाले की, आमचे वरिष्ठ नेते म्हणतात की, सहकारी आम्हाला सोडून गेले. साहेब ते का जात आहे याचा विचार आपण करायला हवा असा सवाल उपस्थित करत जो निर्णय आपण घेणार होता तो निर्णय आम्ही घेतला एव्हढाच फरक आहे. पवार साहेब म्हणाले की,  नाशिक जिल्ह्याचे माझ्यावर नेहमीच प्रेम आहे. मग दिंडोरी आणि नाशिक लोकसभेची जागा का गेली.
कांद्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, कांद्याच्या बाबतीत कालच्या सभेत प्रश्न उपस्थित केला गेला. कांद्याला भाव मिळत नाही म्हणून विधानभवनात प्रश्न उपस्थित करणारा मी पहिला आमदार होतो. सातत्याने या प्रश्नावर मी सभागृहाचे लक्ष वेधले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले आणि कांद्याला ३५० रु अनुदान मिळवून दिले. टोमॅटो च्या  बाबतीत देखील तसेच टोमॅटोला १ रू भाव मिळत होता. तेव्हा आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिले आणि लक्ष घालायला सांगितले.

ते म्हणाले की, फुले, शाहू, आंबेडकर यांच्यावर बोलल जात त्यांचे विचार समाजात रुजविण्याचे काम कालही सुरु होत आणि पुढे सुरु राहील. मंत्रालयात इतर सगळ्या प्रतिमा होत्या मात्र फुले दाम्पत्याचे फोटो नव्हते. या सरकारने एका महिन्याच्या आत काम केले. भिडे वाड्या साठी हे सरकार काम करत आहे. त्यासाठी सुमारे ५० कोटी रुपये निधी मंजूर केला असल्याचे त्यांनी सांगितले. सारथी, बार्टी, आणि महाज्योतीला आत्ता समान योजना मिळणार आहेत.

राजकारणात अनेक संधी माझ्या गेल्या. एका कार्यक्रमात उद्धव जी म्हणाले ९५ साली शिवसेना सोडली नसती तर भुजबळ मुख्यमंत्री असते. काँग्रेस सोडत होतो तेव्हा अनेकांनी सांगितले होते. मुख्यमंत्री म्हणून आजच जाहीर करतो असे ही आश्वासन मला कॉंग्रेसने दिले होते . मी महापौर असतांना शरद यादव हे तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी.सिंह यांचा प्रस्ताव घेऊन आले होते की तुम्ही देशात ओबीसीचे नेतृत्व करा. पण मी कायम पवार साहेबांसोबतच राहिलो. आता आम्ही घेतलेल्या निर्णयामध्ये पवार साहेबांनी आमची साथ द्यायला हवी अशी भावनिक साद देखील छगन भुजबळ यांनी घातली.

ते म्हणाले की, मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सगळीकडच्या सभा रद्द फक्त माझ्याकडेच सभा घेण्यात आली. सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वांच्या सह्या होत्या मात्र माझ्याच मतदार संघात पहिली सभा झाली त्याचे मी स्वागत करतो पण जनता माझ्याच सोबत आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.