“वाचेल का हो आमचं मुल ?”

लेबलिंग ते एनेबलिंग : प्रवास आणि प्रयास -भाग ५ ; लेखिका आदिती मोराणकर

0

बालक पालक नात्यावर आधारित बाल मानसशास्त्र व संगोपन लेखमाला : ४१

शीर्षक वाचून थोडासा धक्का बसला का? एखाद्या दवाखान्यात डॉक्टर समोर , हताश झालेले आई-वडील, त्यांच्या हातात त्यांचे मूल आणि केविलवाण्या चेहऱ्याने “वाचेल का हो आमचं मुल ?” असा प्रश्न ते पालक विचारत आहेत असं काहीसं चित्र डोळ्यासमोर आले असेल ना?

“वाचाल तर वाचाल! वाचाल तर शिकाल, शिकाल तर टिकाल!” ही एक न संपणारी साखळीच आहे. याच साखळीत आपण सगळेच जखडलो आहोत म्हणूनच जस आपण आपल्या लहानपणापासून वाचायला, लिहायला सुरुवात केली तसेच आपल्या मुलांनी देखील लहान वयातच वाचायला, लिहायला सुरुवात केली पाहिजे अशी आपली अपेक्षा असते. हे जर त्यांनी केलं नाही तर “तो सगळ्यांच्या मागे पडेल” अशी अनामिक भीतीही असते. ती भीती आपण मान्य करत नसलो तरीही त्या भीतीच रूपांतर आपल्या मुलांवर दडपण आणण्यामध्ये होतच असतं. अनेक प्रयत्न करूनही जेव्हा आपलं मूल एक दोन शब्दही बोलत नाही किंवा हातात पुस्तक दिल्यानंतर शब्दाला शब्द लावून महाप्रयत्नांनी मुलं एक-दोन शब्दच वाचू शकतात तेव्हा “वाचेल का हो आमचं मुल?”  हा प्रश्न विचारत अनेक पालक माझ्याकडे येतात. वाक्य तसं “ट्रिकी” आहे. फक्त वाचनात समस्या येते आहे म्हणून विचारला जाणारा हा प्रश्न इतक्या गंभीर चेहऱ्याने विचारला जातो की त्या प्रश्नाचा अर्थच बदलतो. ‘वाचेल का आमचं मूल’ म्हणजे पुस्तकात दिलेले शब्द आमचं मुल वाचू शकेल का? हा अर्थ घ्यायचा का? की जग रहाटीच्या स्पर्धेमध्ये आमचं मुल वाचेल का? हा अर्थ घ्यायचा हे पालकांच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. आपल्यासमोर वाढवून ठेवलेल्या परिस्थितीमुळे जर आपणच हतबल झालो तर आपण आपल्या मुलांना धीर कुठून देणार? मार्ग कसा दाखवणार? त्यांना योग्य वेळेत, योग्य वयात, योग्य उपचार देण्यासाठी आपणच खंबीर बनायला हवे.

रस्त्यावरचा डोंबाऱ्याचा खेळ कधी बघितलाय? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न? पण खरंच सांगा ना, रस्त्यावरच्या डोंबाऱ्याचा खेळ कधी बघितलाय का? तात्पुरते चार खांब लावून त्यावर बांधलेल्या दोरीवरून केस पिंजरलेलं एखाद निरागस मूल आत्मविश्वासाने तोल सावरत चालत असतं आणि खाली त्याचे आई किंवा बाबा जोरजोरात ढोल वाजवत असतात. त्या ढोलाचा आवाज त्या ‘ढोलाचा तालच त्या मुलाला दोरीवर ताल सांभाळायला मदत करतो’, प्रेरणा देतो, “तुमच्या ढोलाचा आवाज तुमच्या मुलांपर्यंत पोहोचतो आहे का?” याचे उत्तर शोधण्याआधी “तुम्ही तुमच्या मुलासाठी ढोल वाजवता आहात का?” याचं उत्तर शोधा.अध्ययन अक्षमतांमध्ये आपण काही प्रकारच्या अक्षमता समजून घेतो आहोत पण नेमक्या या अध्ययन अक्षम मुलांमध्ये नक्की काय कमतरता असते ज्यामुळे यांना आपण त्यांच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा वेगळ समजतो?  अध्ययन अक्षम मुलांमध्ये बौद्धिक कौशल्यांवरील दोष, अंक गणितामधील दोष, लेखी भाषेतील दोष, बोली भाषेतील दोष, एकाग्रता साधण्यामधील दोष, कारक क्षमते (motor Skills) मधील दोष, सामाजिक कौशल्यांमधील दोष यापैकी एक किंवा कुठल्याही दोन अथवा त्यापेक्षा जास्त दोषांची युती झालेली दिसते आणि म्हणून मुलं त्यांच्याच वयाच्या इतर मुलांपेक्षा काही बाबतीत वेगळी असतात.

यातील कारक क्षमते (motor Skills) मधील दोष समजून घेताना एक लक्षात घ्यायला हवे की या मुलांचा शारीरिक विकास सामान्य असतो. मात्र जेव्हा या मुलांना सुईत दोरा ओवणे, चमचा नीट पकडणे, हाताच्या बोटांमध्ये एखादी वस्तू पकडून ती इतर ठिकाणी हलवणे या क्रिया करण्याची वेळ येते तेव्हा या मुलांना अडचणी येतात कारण या क्रिया करण्यासाठी विविध स्नायूंच्या कॉर्डिनेशनची अर्थात समन्वयाची गरज असते आणि ते कारक क्षमतेत दोष असल्यामुळे जमत नाही. काही साध्या क्रिया करणेसुद्धा या मुलांना अवघड जातं कारण डोळे आणि हात यांचा समन्वय साधण्यात त्यांना अडचण असते. अगदी चेंडू फेकणे, चेंडू झेलणे, दोऱ्यात मणी ओवणे या गोष्टी अशा मुलांना जमत नाही. अंकगणितातील दोष अर्थात डिसकॅल्क्युलीया यावरचा लेख मागच्याच रविवारी तुम्ही वाचला आहे म्हणून आता परत नव्याने यावर प्रकाश टाकत नाही. आपल्या रोजच्या दैनंदिन कामांमध्ये जवळपास प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपली बौद्धिक कौशल्य वापरावी लागतात. सकाळी उठल्यापासून दात घासणे असो किंवा आंघोळ देवपूजा असो किंवा बाहेर निघण्याची तयारी, ते रात्री झोपेपर्यंत जवळपास प्रत्येकच ठिकाणी आपल्याला तर्कशुद्ध विचार करावा लागतो. काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. काही विषयांवर विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतात आणि त्यानुसार कृती देखील करावी लागते. मात्र ज्या मुलांच्या बौद्धिक कौशल्यांमध्येच अध्ययन अक्षमता असते त्यांना संवेदना, विचार करणे, एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण सादर करणे, एखाद्या गोष्टी मागचा तर्क शोधून काढणे, गोष्टी स्मरणात ठेवणे फार अवघड जाते. या सगळ्याच क्रियांमध्ये समन्वय होत नसल्याने मेंदूमध्ये या माहितीचे संघटन कसं करावं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो.

या मुलांना एकाग्रता साधण्यामध्ये समस्या येते. लक्ष केंद्रित करू न शकल्याने त्यांच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा कमी शिकतात, त्यामुळे शैक्षणिक दृष्ट्या अशी मुलं मागे पडतात. त्यांच्या वयाच्या इतर मुलांची एकाग्रता करण्याची क्षमता 15 ते 20 मिनिटे असेल तर या मुलांची क्षमता केवळ 2 ते 3 मिनिटे असते म्हणूनच अशा मुलांचे शैक्षणिक नुकसान होतं.

मुलं आपल्या आजूबाजूला चाललेल्या संभाषणातले शब्द पकडून नवीन वाक्य बनवायला शिकत असतात मात्र ज्यांना अध्ययन अक्षमता असते त्यांना दुसऱ्यांचे बोलणे ऐकून समजतच नसते. ‘हा शब्द नक्की कुठल्या क्रियेला वापरला आहे’ याचा समन्वय साधणं या मुलांना जमत नाही. बऱ्याचदा आपल्याकडे एक गैरसमज असतो की ‘जे मूल बोलू शकत नाही त्याला ऐकू देखील येत नसते’. अध्ययन अक्षम मुलांमध्ये त्यांना ऐकू येत असते पण ते जे शब्द ऐकताहेत त्याचा अर्थ त्यांना समजत नसतो आणि म्हणून तो शब्द बोलताना नक्की कुठे वापरायचा हेच माहिती नसतं. हळूहळू सरावाने तेच तेच शब्द कानावर पडून, त्या शब्दांची क्रिया बघून मुलांना मोजके शब्द समजतात आणि मग उशिराने का होईना अशी मुलं बोलायला लागतात. पण त्यांची शब्द संपत्ती खूप कमी असते आणि म्हणूनच मोठ मोठी वाक्य ही मुलं बोलू शकत नाहीत. त्यांना वाक्यरचना सुद्धा जमत नसते. मनात खूप असतं पण वाक्यच बनवता येत नसल्याने अशी मुलं आपल्या मनातले विचार बोलवून दाखवू शकत नाहीत.

ज्यांना शब्दच माहीत नाहीत आणि बोली भाषेमध्येच अडचण येते आहे, अशा मुलांना वाचनात आणि पर्यायाने लिहिताना देखील खूप अडचणींना सामोरे जावे लागते. वाचन म्हणजे ‘लिहिलेल्या शब्दांचा अर्थ समजणे’ आणि लेखन म्हणजे ‘समजलेले शब्द लिहून काढणे’ दोन्ही क्रिया परस्पर पूरक असल्याने ज्या मुलाला वाचनच करता येत नाही तो सहाजिक लिखाणात सुद्धा मागे पडतो.

इतर मुलांपेक्षा दुर्दैवी असणारी ही मुलं, त्यांच्या त्यांच्याच पातळीवर अनेक गोष्टींचा सामना करत असतात. त्या समस्या सोडवण्याचा त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न करत असतात. त्यात त्यांना यश येत नाही म्हणून इतरांचे टोमणे ही ऐकत असतात, तरी खचून न जाता मार्गक्रमण करत असतात. या सगळ्या परिस्थितीमुळे या मुलांची इतर मुलांसोबत मैत्रीच होत नाही. इतर मुलं यांना वेगळं म्हणून बाजूला ठेवतात. यांच्याशी बोललं तरी यांना काय समजणार? अशा दुराग्रहाने संवाद साधला जात नाही आणि म्हणूनच अध्ययन अक्षम मुलांच्या सामाजिक कौशल्यांमध्ये सुद्धा दोष निर्माण होतात.

आपल्या भारताचे चांद्रयान 3 दिमाखाने अवकाशात झेपावल! यामागे अनेक वैज्ञानिकांची मेहनत तर आहेच पण त्याहीपेक्षा जास्त यश हे त्या वैज्ञानिकांच्या आत्मविश्वासामुळे मिळाल आहे. “हे होणार, हे मी करून दाखवणार!” या आत्मविश्वासामुळेच आज चांद्रयान 3 ‘’स्काय इज नॉट द लिमिट’’ असं म्हणत या विश्वाच्या कक्षा मोजायला निघालंय, आजपर्यंत न बघितलेल्या अनेक आकाशगंगा शोधायला निघालंय! चंदा मामा ची ओळख आपल्यालाही लहानपणीच होते. चंद्र जणू आईचा भाऊ आणि म्हणून आपण त्याला मामा म्हणतो. त्याच्याकडे बघतच आईने कित्येकदा रात्रीचा गरम गरम मऊ सायभात आपल्याला भरवलाय. त्या चंद्रासारखाच शुभ्र साय भात आवडत नाही अशी व्यक्ती सापडणं विरळीच! चंद्राच्या सौंदर्याकडे बघाताना, त्याच्या चंदेरी प्रकाशात नाऊन निघताना, “चंद्रावर डागही आहेत” याकडे आपण सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतोच ना! तसंच आपल्या घरात. आपल्या मुलांमध्ये जे काय गुणदोष आहेत, त्याच्या सकट त्याला स्वीकारून बघा! बघा, तुमच हेच मूल  रॉकेटच्या गतीने झेपावेल आणि अध्ययनाच्या सगळ्या कक्षा पादाक्रांत करेल. गरज आहे ते फक्त तुम्ही त्याच्यासोबत असण्याची आणि “आम्ही आहोत, तू कर!!” याची जाणीव करून देण्याची…..

प्रवास कितीही लांबचा, अगदी हजारो मैलाचा असला तरी त्याची सुरुवात ही पहिले एकच पाऊल टाकून होते. आपणही ते पहिलं पाऊल आता टाकूया आणि टप्प्याटप्प्याने या सगळ्या समस्येवरचे पर्याय शोधूया! पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी आणि जाणुन घेऊया एका नवीन अध्ययन अक्षमतेबद्दल क्षमतेबद्दल…..धन्यवाद!

आदिती मोराणकर (स्पेशल एज्युकेटर  व शिक्षण विश्लेषक)
संचालिका : ईस्कुलिंग डिजीस्मार्ट किंडरगार्टन,डे केअर व थेरपी सेंटर.
eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524

 

Aditi Morankar
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!