मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा : शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
गरज असेल तरच घराबाहेर पडावे :प्रशासनाच्या सूचना
मुंबई,दि.२६ जुलै २०२३ – भारतीय हवामान खात्याने मुंबईला आज रात्री ८ ते उद्या दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे.या पार्श्वभूमीवर,विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ.इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सुटी जाहीर केली आहे.गेल्या काही तासांमध्ये मुंबईत जवळपास १०० मिमीच्या आसपास पाऊस पडल्याचा अंदाज आहे. आगामी तीन ते चार तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
कृपया सर्वांनी सतर्क रहावे.गरज असेल तरच घराबाहेर पडावे.तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी केले आहे. आज सकाळपासून मुंबई पावसाची संततधार सुरु आहे. दुपारनंतर पावसाचा जोर आणखीनच वाढला.गेल्या काही तासांमध्ये जराही खंड न पडता पाऊस सुरु आहे. पावसासोबत वाऱ्याचाही चांगलाच जोर अनुभवायला मिळत आहे.
पुढील पाच दिवस पावसाची कोसळधार सुरुच राहणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. राज्यात कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय. या तुलनेत मराठवाड्यामध्ये कमी पाऊस पडतो आहे. भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेनं पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा दिला आहे.