नाशिक दि.१० ऑगस्ट २०२३ – मानवी जीवनातील जगण्या-वागण्या-बोलण्याचे बारकावे प्रभू रामचंद्राच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. माणूस म्हणून मोठे होण्यासाठी जी गुणवैशिष्ट्ये लागतात, त्याचेही दर्शन रामचंद्राच्या जीवनात आहे. एकूणच जीवन जगण्याचे शिक्षण देणारा महाग्रंथ म्हणजे रामायण आहे आहे; असे प्रतिपादन आचार्य श्रेयसजी बडवे यांनी केले.
बळवंत स. देशपांडे, लक्ष्मण स. देशपांडे आणि उर्मिलाताई देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ॲड. एस. एल. देशपांडे आयोजित रामकथा ज्ञानयज्ञाच्या चौथ्या दिवशी ते बोलत होते.
आचार्य बडवे पुढे बोलताना म्हणाले की, मानवी जीवनातील भावभावना, कुटुंबव्यवस्था, राष्ट्र असे टप्प्याटप्प्याने येणारे भाग रामचंद्र आपल्याला स्वकर्तृत्वातून समजून सांगतात. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते आणि ते निभावताना माणसांवर राग धरायचा नसतो. आपल्या अवतीभवतीच्या लोकांवरील प्रेम कमी करायचे नसते. कर्तव्य पालनात फार महत्त्वाची बाब आहे; असेही ते म्हणाले.
वडीलधाऱ्या मंडळींची बोलताना आणि त्यांचा सन्मान करताना आपल्याकडून चूक होणार नाही, कुणाचा अपमान घडणार नाही हे फार कटाक्षाने सांभाळले पाहिजे. हे ज्याला सांभाळता येते तोच राजा जनतेच्या मनावर राज्य करू शकतो. तोच राजा सर्वप्रिय होतो. आई-वडिलांची आज्ञा मानून वनवासाला गेलेले प्रभू श्रीराम या जीवन संचिताला सर्वांना वाटत होते. म्हणूनच ते भारतीय जनमनाच्या हृदयस्थानी आहेत;असेही आचार्य बडवे यांनी सांगितले. यावेळी आचार्यांना मानसी बडवे, स्वप्निल परांजपे (हार्मोनियम), भालचंद्र बाळ (तबला) यांनी साथसंगत केली. शहरातील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.