prsanna

भावार्थ दासबोध – भाग ११९

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक आठवे समास सातवा मोक्ष लक्षण नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ. नरदेहाला ज्ञानाशिवाय जन्म मरण चुकत नाही. त्याला दारूण नीच योनी भोगाव्या लागतात. अस्वल, माकड, कुत्रे, डुक्कर, घोडा, बैल, म्हैस, गाढव, कावळा, कोंबडे, कोल्हा, मांजर, सरडा, बेडूक, माशी अशा अनेक नीच योनी ज्ञान नसल्यास माणसाला भोगाव्या लागतात. मूर्खप्राणी पुढच्या जन्माची आशा करतो, त्याच्यामुळे हा नरदेह पडल्यानंतर पुन्हा जन्म मिळतो. पुढील जन्म मिळावा असा विश्वास धरला त्याची त्याला लाज वाटत नाही. कोणत्या पुण्याचा संग्रह तू करतो की ज्याच्यामुळे तुला पुन्हा नरदेह मिळेल? वाईट इच्छा धरली पुढच्या जन्माची तर वाईटच होणार.

मूर्ख अज्ञानी लोक संकल्प करून बंधन पाडून घेतात आणि आपणच स्वतःचे शत्रू होतात. अशा संकल्पाच्या वंधनामुळे संतांचा संग सुटतो, त्याचं लक्षण सांगतो. शरीर हे पाच भूतांचे आहे त्याच्यामुळे सगळी सृष्टी, चराचर निर्माण झालेले आहे आणि हा प्रकृतीच्या स्वभाव जगाचा आकार घेऊन आलेला दिसतो. देह, अवस्था, अभिमान, स्थान, विविध भोग, मात्रा, गुण, शक्ती अशी आठ तत्वे देहाची आणि याची चौपट म्हणजे बत्तीस तत्वे चारी देहांची. अशी ही पिंड ब्रम्हांडाची रचना आहे. त्याचा कल्पनेमुळे विस्तार वाढलेला आहे. त्याच्यामुळे वेगवेगळी मते निर्माण झालेली आहेत. नानामती नाना भेदांमुळे  विवाद वाढलेला आहे. पण ऐक्य कसे साधायचं तो संवाद साधू जाणतात. त्या संवादाचे लक्षण पंचभौतिक देह आहे, त्यामध्ये कारण असलेला आत्मा ओळखला पाहिजे. देह शेवटी नष्ट होतो त्याला आत्मा म्हणू नये.

नाना तत्वांचा समुदाय देहामध्ये आलेला आहे. अंत:करण, प्राण अशी दहा इंद्रिये त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यापेक्षा सूक्ष्मदेह वेगळा आहे असं शास्त्रामध्ये सांगितले आहे. या सूक्ष्मदेहाची शुद्धी झाली, मनाची शुद्धी झाली तर या तत्त्वांपासून आत्मा वेगळा आहे हे लक्षात येतं. स्थूल, सूक्ष्म कारण-महाकारण विराट हीरण्य, अव्यक्त आणि मूळ प्रकृती असे अष्टदेह आहेत. चार पिंडी चार ब्रम्हांडी अशीही अष्ट देहाची प्रौढी आहे. प्रकृती पुरुष ज्याच्यामध्ये वाढतात त्याला दशदेह म्हणतात. असं तत्वाचे लक्षण आहे. आत्मा हा साक्षी आहे. कार्य-कर्ता-कारण-दृश्य हे आत्म्याला दिसते. जीव-शिव,पिंड-ब्रम्हांड हे माया अविद्येचे बंड आहे. पण आत्मा त्यापासून वेगळा आहे.

पाहिले तर चार प्रकारचे आत्मे आहेत. त्याचं लक्षण ऐकून ते मनामध्ये पक्क करा. एक जीवात्मा, एक शिवात्मा, एक परमात्मा त्यालाच विश्वात्मा देखील म्हणतात, पण मला आणि चौथा निर्मळात्मा. असे चार आत्मे आहेत. त्यांच्यात खूप फरक वाटतो,पण चारही एकच आहेत. याविषयीचा दृष्टांत सावधपणे ऐका. घटाकाश, मठाकाश, महदाकाश आणि चीदाकाश सगळे मिळून आकाश एकच आहे. तसं जीवात्मा आणि शिवात्मा परमात्मा आणि निर्मळात्मा मिळून आत्मा एकच आहे. घटामध्ये जे व्यापक आकाश आहे त्याचं नाव घटकाश. पिंडामध्ये जो ब्रम्हाचा अंश आहे त्याला जीवात्मा म्हणतात. मठामध्ये जे आकाश आहे त्याला मठाकाश असे म्हणतात. तसा ब्रम्हांडामध्ये जो ब्रम्हांश आहे त्याला शिवात्मा म्हणतात. बाहेरच जे आकाश आहे त्याला महदाकाश असं म्हणतात त्याप्रमाणे ब्रम्हांडाबाहेरच जो ब्रह्म अंश आहे त्याला परमात्मा म्हणतात आणि या उपाधीवेगळे आकाश आहे त्याला चिदाकाश  असे म्हणतात.

त्याप्रमाणे निर्मळ आत्मा परेश तो या सगळ्या उपाधींपासून वेगळा आहे. उपाधीमुळे भिन्न वाटतात परंतु आकाश अभिन्न आहे त्याप्रमाणे स्वानंदघन आत्मा हा एकच आहे. आत-बाहेर, निरंतर सूक्ष्मत्मा आहे त्याची थोरवी वर्णन करण्यास कोणीही समर्थ नाही. असे आत्म्याचे लक्षण आहे. उपाधीच्या योगाने आत्म्याचे  चार भेद होतात पण आत्मा एकच आहे. असं आत्म्याचे वर्णन समर्थांनी केलेलं आहे. पुढील वर्णन ऐकूया पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः) 
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!