

दशक आठवे समास नववा सिद्ध लक्षण
जय जय रघुवीर समर्थ. सत्य स्वरूपाने अमर झाला त्याला भीती कशाची वाटेल? म्हणून साधूजनांना भीती वाटत नाही. दोघांमध्ये येणारे वितुष्ट तेथे नसते कारण तो स्वतःच स्वतःत अभेद असतो. त्याला देह बुद्धीचे दुःख नसते. बुद्धीने निर्गुणाचा निश्चय केल्यामुळे त्याला कसलाही खेद होत नाही. तो एकांतप्रिय असल्याने कोणाच्याही बाबतीत स्वार्थ साधायचा प्रयत्न करीत नाही. साधू स्वतःशीच एकटा असल्यामुळे त्याला कोणताही दुःख किंवा शोक नसतो. दुसरा आला की मग अविवेक येत असतो त्यामुळे साधू एकटा असतो. परमार्थाची त्याला आशा असल्यामुळे स्वार्थामुळे निर्माण होणारी निराशा त्याला येत नाही. निस्पृहता किंवा वैराग्य हे साधूचे लक्षण आहे म्हणून साधूला जाणणे कठीण नाही.
स्वरूपाच्या योगाने तो स्वरूपच झालेला असतो त्यामुळे तो अनासक्त असतो. स्वरूपाची स्थिती निर्माण झाल्यामुळे त्याने देहाची चिंता सोडलेली असते त्यामुळे त्याला काय होणार? याची चिंता नसते. स्वरूपी बुद्धी लागल्यामुळे सगळ्या उपाधींपासून तो दूर असतो त्यामुळे तो निरूपाधिक असतो. साधू स्वरूपामध्ये वास करतो तिथे त्याला कोणतीही संगत उपयुक्त वाटत नाही म्हणून त्याला मान-अपमान असं काही नसतं. अलक्षाकडे त्याचं लक्ष असल्यामुळे साधू हा परमदक्ष असतो, त्यामुळे तो परमार्थाचा पक्ष धरतो. स्वरूपामध्ये मळ सहन होत नाही म्हणून साधू निर्मळ असतो.
सर्व धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणं हाच आहे हेच साधू लक्षणाच मुख्य वैशिष्ट्य आहे. साधूची संगत धरल्यावर आपोआप स्वरूपाची स्थिती प्राप्त होते. स्वरूपस्थितीची लक्षणे अंगी बाणवली जातात. साधूची अशी लक्षणे असून त्याचे निरूपण ऐकल्यावर अंगी बाणतातम मात्र निरंतर स्वरुपस्थितीत राहणे महत्वाचे आहे. निरंतर स्वरूपामध्ये राहिल्यानंतर स्वरूपच होऊन जाते मग लक्षणे वेगळी अंगी बाणवण्याची वेळ येत नाही. स्वरूपामध्ये मती राहिली तर सगळे दुर्गुण नष्ट होतात परंतु त्याच्यासाठी सत्संगती आणि निरूपण हवे. सर्वसृष्टीच्या ठायी या स्थितीचा अनुभव एकसारखा नाही तो सर्व पुढच्या समासामध्ये सांगतो. कोणत्या स्थितीत साधू राहतात, कसा अनुभव घेतात ते मी सांगतो, श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावे असं समर्थ रामदास म्हणतात. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे सिद्ध लक्षण नाम समास नवम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक आठ समास दहा शून्यत्व निरसन नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. लोकांचे अनुभव विचारले असता एकदम कल्लोळ उठला. हा कथा कल्लोळ श्रोत्यांनी कौतुकाने ऐकावा. एक म्हणतात संसार केल्यावर पैलपार जावे, आपला हा व्याप योग्य नाही. जीव देवाचा आहे. एक म्हणतात लोभ करावासा वाटत नाही मात्र पोटासाठी कुटुंबाची सेवा करावी लागते. एक म्हणतात, सुखांने संसार करावा, सद्गती मिळण्यासाठी काही दान पुण्य करावे. एक म्हणतात संसार खोटा, वैराग्य घेऊन देशाचा त्याग करावा त्यामुळे स्वर्गलोकी च्या वाटा मोकळ्या होतील. एक म्हणतात, कुठे जावे? व्यर्थ कशासाठी हिंडायचं? आपण आश्रम स्थापन करून तिथे राहावं.
एक म्हणतात कसला धर्म? सगळा अधर्म सुरु आहे. या संसारामध्ये नाना कर्म करावी लागतात. एक म्हणतात अनेकांसारखी वासना असलेली बरी, त्यामुळे संसारात तरतो. एक म्हणतात काहीतरी कारण शोधून देवाचे भजन करावे. बाकी सर्व स्वार्थ आहे, गोंधळ आहे. एक म्हणतात वडिलांना देव मानून आई-वडिलांचे मनोभावे पूजन करावं..अशा तऱ्हेने वेगवेगळी मत ही मांडली जातात असं समर्थ सांगत आहेत. ही मतं कोणती मांडली जातात त्याची अधिक माहिती ऐकू या पुढच्या समासामध्ये.जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७

