पुणे,दि. १९ ऑगस्ट २०२३ –महाराष्ट्रीयन संस्कृतीतील श्रावण महिन्यातील परंपरागत उत्सवांपैकी एक म्हणजे मंगळागौर.रोटरी क्लब ऑफ पुणे हेरीटेज यांच्यावतीने श्रावण सरी मंगळागौर स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील विविध भागांतून एकूण १६ संघ सहभागी होते.
प्रत्येक संघाला सादरीकरणासाठी देण्यात आलेल्या १० मिनिटांमध्येच पारंपरिक परंतु वैविध्यपूर्ण खेळ दाखविणे आवश्यक होते.यामध्ये या ग्रुपने विविध प्रकारच्या फुगड्या,झिम्मा,गोफ,दींड,सुप फिरवणे, कोंबडा, मोर असे एकूण ४३ खेळ सादर केले व गाण्यांमधून सामाजिक संदेशही देण्यात आले..
या स्पर्धेत नाशिकच्या संस्कारभारती टिळक विभागाच्या ‘झिम पोरी जिम’ या संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. विजेत्या संघाला सन्मानचिन्ह, सहभाग प्रमाणपत्र आणि उपयुक्त वापर होईल अशा पद्धतीचा प्रोत्साहन निधी देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर गायन व वादन याचे देखील विशेष पारितोषिक आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये प्राची कुलकर्णी,संगीता मुळे,प्रिया शुक्ल,स्नेहल जोशी,पूर्वा सावजी,अनुश्री साखरे, अनघा मोघे,संगीता गोगटे,पूर्वा जोशी,अनघा जोशी,कीर्तीरमा मोराणकर,पृष्णी पाठक,सुचेता सोनार आदींचा सहभाग होता. तर हर्षल खैरनार याने तबल्याची साथ संगत केली. त्याचबरोबर या स्पर्धेतील नृत्यासाठी नृत्यदिग्दर्शिका अनया कोठावदे यांचे सहकार्य लाभले.
पारितोषिक वितरण प्रसंगी रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज यांचे सर्व पदाधिकारी व ज्येष्ठ नृत्यांगना स्वाती दैठणकर उपस्थित होत्या.