भावार्थ दासबोध – भाग १३४

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक नऊ समास ६ गुणरूप निरूपण नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ. जिथे चलनवलन नाही तिथे जाणीव नाही, म्हणून तो वायूचा गुण आहे हे लक्षात घ्यावे. एकापासून एक निर्माण झाले. त्रिगुण भूतांचे स्वरूप मूळ मायेमध्येच आहे हे त्यातून दिसून आले. हा मूळ मायेचा चिखल असून त्याच्यात एकापासून एक उगम त्याच्यात झाला हे खरे आहे, असे सांगता येईल. वायूचा कर्दम सांगितला, त्याच्यापासून अग्नी झाला तोही पाहिला तर चिखलच. पाण्यापासून पृथ्वी झाली, म्हणजे चिखलच.

इथे अशी शंका निर्माण होते की भुतांमध्ये जाणीव कशी निर्माण झाली?  जाणीव म्हणजे जाणते चलनवलन. ते वायूचे लक्षण आहे. वायूच्या अंगी मागे सांगितलेले सगळे गुण असतात. जाणीवनेणीव मिश्रित पंचभूते असतात. कुठे दिसते कुठे दिसत नाही पण भूतामध्ये ती व्यापून असते. तीक्ष्णबुद्धीने विचार केला तर स्थूल-सूक्ष्म लक्षात येतं. पंचभुते आकारली, भुतांमध्ये भुते मिसळली, तरी सूक्ष्म पाहिल्यावर त्यांच्यातील वेगळेपण लक्षात येते. त्यात विरोध करणारा वायू दिसत नाही, मात्र तो असतो. ज्याप्रमाणे लाकडामध्ये अग्नी दिसत नाही त्याप्रमाणे तो वायू दिसत नाही. भूते वेगवेगळी  दिसतात, धूर्तपणे त्याची प्रचिती घ्यावी. ब्रह्मापासून मूळ माया, मूळ मायेपासून गुणमाया, गुण मायेपासून गुण जन्माला आले. गुणांपासून भूते स्पष्ट दशेला आली.अशी ही सगळी रूपे सांगितली. यावर श्रोत्याने शंका व्यक्त केली,

आकाश गुणांपासून झाले हे घडले नाही. शब्द गुणांची कल्पना केली हे विनाकारण आहे.यावर वक्ता सांगतो, एक सांगतो तर तू  दुसराच प्रश्न निर्माण करतो, हा गोंधळ असून असं वेड्यासारखं केलं तर त्याचं कसं समाधान होणार? शिकवलं तरी समजत नाही, समजलं तरी उमजत नाही, दृष्टांतही समजत नाही म्हणजे मंदबुद्धी म्हणायला पाहिजे. भूतांपेक्षा भूत थोर हा विचार सांगितला पण भूतांतील स्वतंत्र कोण आहे? जिथे मूळ माया पंचभुतिक आहे तिथे काय विवेक राहिला? मूळमायेपेक्षा वेगळे एक निर्गुण ब्रह्म आहे. ब्रह्मामध्ये मूळ माया झाली, तिची लीला तपासली, तेव्हा या त्रिगुणांची ओतीव मूस असल्याचे लक्षात आले. चारी भुते विकारवंत आहेत. आकाश निर्विकार दिसते. आकाश भूत हा विचार शून्यत्वाच्या उपाधीमुळे त्याला आलेला आहे. पिंडी व्यापक म्हणून जीव, ब्रह्मांडी व्यापक म्हणून शिव तसाच हा आकाशाचा अभिप्राय आहे.

उपाधीमध्ये सापडले, सूक्ष्म पाहता भासले म्हणून आकाश हे भूत रूप झालेले आहे. आकाश अवकाश म्हणजे शून्य. परब्रम्ह म्हणजे निराभास.उपाधी नसलेले आकाश म्हणजे ब्रह्म. जाणीव नेणीव  मध्यम म्हणजे सत्व, रज तम गुणांचे प्रमाण म्हणजे त्रिगुण आहे. त्याची माहिती दिली. प्रकृती ही विस्तार पावली पण पुढे एकच झाली. विकारवंत असल्याने तिथे नियम नाही. काळे पांढरे एकत्रित केले की पारवा रंग तयार होतो, काळे पिवळे एकत्रित केले की हिरवे होते, असे नाना रंग एकत्रित केले की विविध रंग तयार होतात. तसं दृश्य हे विकारी विकारवंत असते. एका जीवनामध्ये नाना रंग असतात नाना तरंग उमटतात. त्याच्यामध्ये किती बदल होतात हे किती सांगणार? असं गुण रूपांचे वर्णन समर्थ करीत आहेत.जय जय रघुवीर समर्थ. (क्रमशः) 
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.