अनामिका, युवांजनी नाटक मंडळी निर्मित आणि साईसाक्षी प्रकाशित-लेखन आणि दिग्दर्शन – सागर देशमुख. आनंद – सागर देशमुख, संजय – पुष्करराज चिरपुटकर, अनामिका, प्रिया उर्फ जेनी – अनिता दाते. नेपथ्य – संदेश बेंद्रे, प्रकाश – विक्रांत ठकार, गीत – जितेंद्र जोशी, स्वर – जसराज जोशी, संगीत – सौरभ भालेराव.
प्रस्तावना
मानवी जीवन आणि सामाजिक जडण-घडणीत ‘प्रसार माध्यम’ हा चौथा स्थंभ’ मानला गेला आहे. कारण आजवरच्या ‘कौटुंबिक, आर्थिक, सामजिक आणि राजकीय’, ‘सुधार, बदलाव किंवा विकास’ घडवण्यात प्रसार माध्यमांनी अत्यंत महत्वाची भूमिका कळत-नकळतपणे निभावली आहे, यात दुमत नसावे. अर्थात हे चांगलं की वाईट हे ठरवणं, हा ज्याचा त्याचा प्रश्न! वर्तमानपात्रांनी घडलेल्या आणि संभाव्य घटनांवर आधारित केवळ सामाजिक विचारधारांचा प्रसार केला ते चांगलेच आहे. परंतु मराठी नाटकांनी त्याही पुढे जाऊन घराघरातून उद्भवणाऱ्या, घडणाऱ्या बारीक-सारीक प्रसंगांचे कळत-नकळतपणे समाजावर उमटणारे पडसाद रंगमंचावर सादर केले आहेत. ज्यामुळे समाजाला त्या संभाव्य परिणामाची गहनता, दाहकता आणि व्यापकता’ याची देही याची डोळा अनुभवता आली आणि वेळीच त्यावर उपाययोजनाही करता आली. आजवरच्या अनेक कौटुंबिक नाट्य-संहितांमधून पती-पत्नी, भाऊ-बहिण, आई-वडील, आजोबा-नातू, भाऊ-भाऊ, अशा अनेक नातेसंबंधांमधील ‘भावभावनांना’ मोकळं केलं आहे तरी परंतु नाट्यकर्मींनी समजून उमजून केलेल्या समाज प्रबोधनाच्या या महनीय कार्याची जाणीव समाजाला नाही, याची खंत वाटते.
सामाजिक की फार्सिकल
किरकोळ नवरे हे विनोदी नाटक नवरा बायकोच्या नात्याबद्दलचं आहेच, पण नात्यातली असुरक्षितता आणि चिरंतर प्रेमाबद्दलही बोलणारं आहे. हे नाटक खरंतर ‘फार्सिकल’ या संज्ञेत मोडलं जाईलही, परंतु ते चुकीचं ठरेल कारण या नाटकाच्या माध्यमातून ‘लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता’ सागर देशमुख याने नवरा-बायको यांच्यातील ‘बाधित–अबाधित’ संबंधांना अत्यंत खुबीने उलगडलं आहे. या नाटकाचा फॉर्म जरी वरकरणी मनोरंजनात्मक पद्धतीने जाणवला तरीही मानवी जीवनातील ‘सरळमार्गी, गुंतागुंतीची आणि समजूतदार’ अशी स्वभाव वैशिष्ठ्ये असलेली पात्रे रंगमंचावर सादर करून पराकोटीला गेलेले संबंध परत जुळवून आणण्याचा ‘सहज, सोपा आणि सुलभ’ मार्ग समाजासमोर आदर्शवत ठेवला आहे. खरंतर अशा प्रकारच्या समाज-प्रबोधनात्मक विचारांना ‘फार्सिकल’ बाजाने मांडायचं म्हणजे रिस्कच असते. परंतु या संपूर्ण टीमने हे इंद्रधनुष्य समर्थपणे पेललं आहे.
या नाटकात चार पात्रे असून तीनच कलाकार आहेत. त्यातही प्रत्येकाची स्वत:ची अशी प्रतिमा आहे. दिग्दर्शकाने याच प्रतिमांचा उत्कृष्ट उपयोग या कथानकासाठी वापरला आहे.
सागर देशमुख –
महाराष्ट्रांचं लाडकं व्यक्तिमत्व-पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, यांची भूमिका ‘भाई’ या चित्रपटात साकारून स्वत:ची एक प्रतिमा बनवली आहे. ही भूमिका साकारतांना केवळ आपलं उद्दिष्ठ नजरेसमोर ठेऊन त्या दिशेनेच मार्गक्रमण असा निर्धार आणि यशस्वी होण्याची जिद्द अतिशय समर्थपणे साकारली आहे.
अनिता दाते –
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून अनिता दाते घराघरांत पोहोचली आहे. आपल्या नवऱ्याच्या कारवायांना सडेतोड जबाब आणि त्याच्या प्रत्येक खेळीवर मात करीत आपल्या खमक्या स्वभावाने नवऱ्याला वठणीवर आणणारी राधिका, या पात्राची महाराष्ट्राला चांगलीच ओळख आहे. किंबहुना त्यामुळे अनिता महाराष्ट्रातील तमाम स्त्रियांच्या गळ्यातला ताईत बनली. सध्या ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे ‘अय्या’ या सिनेमातही अनिता दातेने राणी मुखर्जी सोबत महत्त्वाची भूमिका निभावली होती. या नाटकात तिने दोन पात्रे रंगवली असून त्या दोहोंमधील फरक दर्शवण्यात तिला निश्चितपणे यश लाभलं आहे.
पुष्करराज चिरपुटकर –
अभिनयाची उत्तम जाण, धांदरट, भेदरट, बोटचेपी धोरण आणि क्षणात शरणागती पत्करणारा अशीच याची प्रतिमा आहे. ‘मी वसंतराव’ या चित्रपटात त्याने साकारलेली ‘पु.ल.देशपांडे’ यांची भूमिकाही रसिकांच्या चांगलीच लक्षात आहे.
या तिघांनी आजवर वेगवेगळया भूमिकांमधून या तिघांनी आपली अभिनयक्षमता सिद्ध केली आहे.आपापल्या आजवरच्या प्रतिमांचा वापर करण्याची संधी या तिघांना मिळाली असून हे तिघेही एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ.
अभिनयानुभव
अभिनयाच्या बाबतीत सागर देशमुखला मानावंच लागेल. जशा शब्दांच्या कोलांट्या उड्या तशाच उड्या रंगमंचावर घेत त्याने प्रसंग खेळते ठेवले आहेत. तुरुंगातून सुटल्यानंतर घरी परतल्यावर त्याची झालेली गोची, खिशात पैसे नाहीत आणि रहायला घरही नाही. या परिस्थितीतही आनंद सामोपचाराने मार्ग काढून त्या घरात आपले बस्तान बसवतो. कायदेशीरपणे! ‘मेरी आवाज सुनो’ अनामिका आणि प्रिया उर्फ जेनी या दोन्ही भूमिका अनिता दाते हिने सहजपणे पेलल्या असून प्रत्येकीचा बाज जपला आहे. पुष्करराज आपल्या भूमिकेशी प्रामाणिक, किंबहुना प्रामाणिकपणा हाच त्याचा स्थायीभाव, अत्यंत सुंदरपणे दाखवला आहे. परिस्थितीला शरण जाऊन गपगुमान आनंद सोबतची त्याची छुपी मैत्री आणि अनामिकेचा राग यामधली त्याची पळताभुई थोडी होते. पण तो खोटं अजिबात वागत नाही. या तिघांनीही केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर हे कथानक पेललं असून समाजप्रबोधनाचा कडू जहर डोस अलगदपणे प्रेक्षकांना पाजला आहे. परिस्थिती कशीही असली तरीही नवरा-बायको यांच्यातील भावनिक संबंध आलेल्या प्रसंगांना सामोरे जाण्याची शक्ती देतात, हा दृढ विश्वास! व्वा क्या बात है!
या नाटकाचे निर्माते अभिजीत देशपांडे, राहुल कर्णिक, दिनू पेडणेकर आहेत. दिग्दर्शन सहाय्य कल्पेश समेळ तर नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. संगीत सौरभ भालेराव यांचे असून गीते जितेंद्र जोशी यांनी लिहिली आहेत. प्रकाशयोजना विक्रांत ठकार तर वेशभूषा सोनल खराडे यांची आहे.
सारांश
खरंतर एका गंभीर विषयावरचं हे कथानक असूनही लेखक आणि दिग्दर्शक सागर देशमुख याने आपल्या उद्दिष्टाकडे जाण्याचा प्रवास आकांततांडव न करता हलक्याफुलक्या पद्धतीने सुकर केला आहे. माणूस हा समाजशील प्राणी असून त्याच्या जीवनातील कठीणातील कठीण प्रसंगही तो केवळ चर्चेच्या माध्यमातून सोडवू शकतो, याचा परिपाठ या नाटकाच्या माध्यमातून अनुभवायला मिळतो. आनंद निर्दोष असूनही कोठडीत काढलेली तीन वर्षे, दरम्यान पत्नीने घटस्फोट घेऊन केलेलं दुसरं लग्न या यातना मनात साठवलेल्या असतानाही वास्तवाला सामोरे जाऊन आपलं निर्दोषत्व पत्नीसमोर सिद्ध करण्यात तो यशस्वी होतो. सोबतच इतरांनाही आपापल्या चुकांची आणि जबाबदारीची जाणीव करून देऊन सन्मार्गी लावतो, हे त्याचं खरं कर्तुत्व!
एक गंभीर कथानक, हलकाफुलका अभिनय आणि समाजप्रबोधन यासाठी हे नाटक रसिकांना खिळवून ठेवेल,हे नक्की!
एनसी देशपांडे
9403499654