दशक १२ समास आठ काळ रूप नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. जगदेश्वर मुळमाया असून पुढे अष्टधा प्रकृतीचा विस्तार झालेला आहे. सृष्टीच्या क्रमाने हा आकार आकारला आहे. हे सर्व नसते तर आकाशासारखे निर्मळ, निराकार काळ वेळ नसलेले असे काहीच नाही. विविध उपाधीचा विस्तार झाला तिथे काळ दिसून आला. अन्यथा काळ हा कुठे नसतोच. एक चंचल, एक निश्चळ यापेक्षा वेगळा काळ कुठे आहे? चंचलाच्या सापेक्षतेने आहे त्याला काळ म्हणावे.
आकाश म्हणजे अवकाश. अवकाश म्हणजे विलंब. त्या विलंबरूपी काळाला जाणून घ्यावे. सूर्योदयापासून वेळ सुरु होते, तिथपासून काळाची गणना समजते. पळापासून युगापर्यंत काळ पळ, घटका, प्रहर, दिवस, अहोरात्र, पक्ष, मास, षडमास आणि नंतर युग अशाप्रकारे कालगणना केली जाते. कृत,त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग अशी ही काळाची संख्या भूमंडळावर आहे. देवांची आयुष्यही आगळी आहेत त्याचे निरूपण शास्त्रामध्ये केले आहे. त्यात तीन देवांचीही माहिती आहे. त्याचे अलग केलेले सूक्ष्म रूप, त्यांचे नियम ही माहिती लोकांना होऊ शकते. नीतीनियम सोडल्याने शेवटी लोक दुःखी होतात. ब्रम्हा विष्णू महेश या देवांची माहिती होऊ शकते. मिश्रित त्रिगुण निवडले गेले त्यातून आदि-अंत सृष्टीरचना झाली. त्यात कोण थोर? कोण लहान? असं कसं म्हणावं.. असो ही जाणत्याची कामे आहेत.
अज्ञानी माणूस उगाचच भ्रमामध्ये गुंतून पडतो. अनुभव असला तर जागोजागी त्याच्या खुणा दृष्टीस पडतात. उत्पन्न काळ, सृष्टिकाळ, स्थितिकाळ, संहार काळ, असा संपूर्ण काळ विलंबरूपी आहे. ज्या ज्या प्रसंगी जे जे झाले त्याला त्या काळाचे नाव पडले. लक्षात येत नसेल तर पुढे ऐका. पाउसकाळ, शीतकाळ, उष्ण काळ, संतोष काळ, सुख, दुःख आनंद काळ प्रत्ययाला येतो. प्रातःकाळ मध्यान्ह काळ, सायंकाळ,वसंतकाळ, पर्वकाळ, कठीण काळ लोकांना माहिती आहे.जन्मकाळ, बालपणाचा काळ, तारुण्यकाळ, वृद्धापकाळ, अंतकाळ, विषम काळ हा वेळेनुसार लक्षात येतो. सुकाळ आणि दुष्काळ, प्रदोष काळ, पुण्यकाल, सर्व वेळा मिळून काळ तयार होतो. असते एक आणि वाटते एक त्याचे नाव हीन विवेक. नाना प्रवृत्तीचे लोक ही प्रवृत्ती जाणतात.
प्रवृत्ती ही अनेकत्वाकडे झुकलेली असते. निवृत्ती ही एकत्वाकडे झुकलेली असते. एकत्वामुळे नाना सुख हे निर्माण होतात हे विवेकी लोक जाणतात. जिथून ब्रम्हांडाची रचना झाली तिथे विवेकी माणूस लक्ष घालतो आणि त्याचे विवरण करता करता त्याला पूर्वापारची स्थिती, सहज स्थिती प्राप्त होते. प्रपंच असून देखील परमार्थ पाहणे हे या स्थितीमध्ये शक्य होते. प्रारब्धामुळे तो लोकांमध्ये राहत असतो. सगळ्याचं मूळ एकच आहे. बाकी सगळं बाष्कळ आहे. विवेक करून ताबडतोब परलोक साधावा. विवेक हा मूळ असून तो पाहिल्यास जन्माचे सार्थक होईल. विवेकहीन आहेत ते पशुसमान मानावे. त्यांचं भाषण ऐकल्यावर परलोक मिळणार नाही. त्यात आमचं काय गेलं?
जे केलं ते फळाला आलं! पेरलं ते उगवलं! आता भोगतील. पुढेही जे करतील तसं त्यांना फळ मिळेल. भक्तीयोगामुळे भगवंत मिळेल. देवभक्त मिळाल्यावर समाधान दुप्पट होईल. आपली कीर्ती करून नाही मेले ते उगीच आले आणि गेले. शहाणे असूनही भुलले. आता काय सांगावं? येथील सर्व इथेच राहते, असा अनुभव आहे कोण काय घेऊन जाते? सांगा ना! म्हणून पदार्थांविषयी उदास असावं. सावकाशपणे विवेक पाहावा. त्यामुळे अलभ्य असलेला जगदीश प्राप्त होतो. जगदीशासारखा दुसरा लाभ नाही. कार्य-कारण सर्व काही संसार करीत असताना देखील समाधान प्राप्त होते. मागे जनकासारखे अनेक राजे देखील राज्य करीत करीत परमेश्वर प्राप्ती करते झाले.
त्याचप्रमाणे आता देखील अनेक पुण्यश्लोक लोक आहेत. राजा असताना मृत्यू आला. लक्ष कोटी रुपये कबूल केले तरी त्याला मृत्यू सोडणार नाही.अशा प्रकारचे जीवन पराधीन आहे. यामध्ये दुखणे, बहाणे, नाना उद्वेग, चिंता करणे किती म्हणून सांगायचं? हे सगळं आहे. हा संसाराचा एक बाजार भरलेला आहे, त्यात देवाचा पहावा, तरच तुमच्या कष्टाचा परिहार होईल. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे काळ रूप नाम समास अष्टम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे