नाशिकरांसाठी दर्जेदार नाटकाच्या सलग ५ प्रयोगांची मेजवानी

‘स्वेच्छामूल्य’देऊन प्रयोग बघता येणार

0

नाशिक,दि.५ ऑक्टोबर २०२३ –  नाट्यकलेची सेवा आणि परंपरा जोपासण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाचे १४ पुरस्कार प्राप्त, ‘शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान, सेवा संस्था, नवी मुंबई’ निर्मित,  ‘आय.एम. पुंगळ्या शारूक्या आगीमहुळ’ या नाटकाचा ‘रौप्य महोत्सवी प्रयोग’ नाशिक शहरात ‘स्वेच्छामूल्य’ पद्धतीने सादर करणार असल्याचे संस्थेचे सर्वेसर्वा श्री. प्रशांत निगडे’ यांनी जाहीर केले आहे. एवढंच नव्हे तर सलग पाच प्रयोग खास नाशिककरांसाठी सादर करण्याचा मनोदय बोलून दाखवतांना ‘नाशिकमधील लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि तमाम रसिकांनी या योजनेचा लाभ घेतांना ‘नाट्यकला’ जिवंत ठेवण्याचा उद्देशाने ‘यथाशक्ती स्वेच्छामूल्य’ दान केल्यास आम्हास समाधान वाटेल, असे विशेष करून नमूदकेले. 

नाशिक शहराला नाट्यकलेची उत्तुंग परंपरा आहे.येथील रसिकांची प्रगल्भता लक्षात घेऊन त्यांच्यासमोर आपली कला सादर करण्यासाठी येथील स्पर्धांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील संस्था आतुर असतात. ‘बाबाज करंडक’ आयोजित एकांकिका स्पर्धेमध्ये ‘शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान, सेवा संस्था, नवी मुंबई’ निर्मित, एकांकिकेला प्रथम पारितोषिक लाभले होते. त्यावरूनच इथल्या रसिकांचा आणि परीक्षकांचा दर्जा लक्षात येतो.

नाशिकमधील कलाकार सुप्रिया बर्वे आणि हेमंत सैदाणे ह्या दोघांच्या  संकल्पनेतून सलग पाच प्रयोग नाशिककरांसाठी ‘स्वेच्छामूल्य’ सादर होणार आहेत. अर्थात ह्या नाटकासाठी पैसे खर्च करून तिकीट काढण्याची आवश्यकता नाही. नाटकाचा प्रयोग रसिक- प्रेक्षकांना मोफत पाहता येणार आहे. नाटक पाहून झाल्यावर रसिक-प्रेक्षक स्व-इच्छेनुसार पैसे कलाकारांना देऊ शकतात. ते द्यावेच असे  काही बंधनकारक नाही. हे नाट्यप्रयोग शनिवार, ७ ऑक्टोबर व रविवार, ८ ऑक्टोबर या दोन दिवसात नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिर आणि परशुराम  सायखेडकर नाट्यमंदिरात सलग ५ प्रयोग सादर होणार आहेत.

‘स्वाभिमान – शोध अस्तित्वाचा’ या लोकप्रिय मालिकेत ‘बबनदादा’ हे पात्र साकारलेले कलाकार प्रशांत निगडे ह्या नाटकात मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत. तसेच लेखन, दिग्दर्शन, आणि निर्मिती अशा महत्त्वपूर्ण बाजू प्रशांत निगडे यांनी लिलया पेलवल्या आहेत. त्याचबरोबर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ आणि आता सुरू असलेल्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील ‘चंचला’ च्या भूमिकेत असणारी विरीशा नाईक ही अभिनेत्री सुद्धा या नाटकात मध्यवर्ती भूमिकेत आहे. सहकलाकार श्रद्धा शितोळे या अभिनेत्रीला महाराष्ट्र शासनाचा अभिनयाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. लेखकाच्या लेखणीतून उमटलेल्या एका प्रश्नातून अख्या नाटकाचा सार कळतो, “गरीब कोण? जो कागदपत्रे दाखवून गरीब असल्याचे मांडत राहतो तो, की ज्याची नोंदच नाही तो गरीब ?”  शिकार करणाऱ्या  फासेपारधी जमातीतील पुंगळ्या या तरुणाच्या अस्तित्वाची कागदोपत्री नोंदच झालेली नाही. त्याच्या जाळ्यात मनुष्याने कधीही न पाहिलेला एक रहस्यमय पक्षी अडकतो. अस्तित्वात असूनही कायम अदृश्य असणाऱ्या दोन जीवांची ही अद्भुत गोष्ट आहे. या नाटकातून पारधी समाजावर, त्यांच्या जीवनावर, परंपरांवर, रूढींवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे.

ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, गज़ल नवाज़  पंडित भीमराव पांचाळे, नारायण जाधव, प्रसाद पंडित, रवी मिश्रा, अक्षर कोठारी यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी नाटकाला उपस्थित राहून प्रोत्साहन दिले आहे.

या नाटकाला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित साठाव्या राज्यनाट्य स्पर्धेत मुंबई केंद्रातून प्रथम पुरस्कार आणि अंतिम फेरीसह नाटकाला एकूण चौदा पुरस्कार प्राप्त झाले आहे. या नाटकाचा हिंदी भाषेत अनुवादित झाले. नाटक ६१ व्या हिंदी राज्यनाट्य स्पर्धेत महाराष्ट्रातून प्रथम आले आहे.

नाटकाचे ५ प्रयोग पुढीलप्रमाणे असतील.  शनिवार, ७ ऑक्टोबर, दुपारी २ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग परशुराम सायखेडकर, नाट्यमंदिर येथे सादर होणार आहे.  रविवार ८ ऑक्टोबर, सकाळी ९ वाजता आणि दुपारी १२:३० वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे प्रयोग असेल.  त्याच दिवशी  संध्याकाळी ६ वाजता परशुराम सायखेडकर, नाट्यमंदिर येथे प्रयोग सादर होईल.

महाराष्ट्र शासनाचे ‘अ’ वर्ग दर्जा प्राप्त नाटक, उत्तम संहितेवर आधारित जबरदस्त सादरीकरण अनुभवण्यासाठी प्रत्येकाने हे नाटक नाट्यगृहात जाऊन पहावे! मोफत आसन मिळवण्याकरिता रसिक प्रेक्षकांनी 79777 60034 ह्या नंबरवर संपर्क साधावा.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!