भावार्थ दासबोध -भाग १७३

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक १३ समास एक आत्मानात्मविवेक नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ. जिथे विद्या आहे, कुविद्या आहे दोन्हीकडे आनंदाचे वावडे आहे तिथेही सगळीकडे तोच आत्मा आहे. तो दिसतो, बसतो, चालतो, धावतो,  डोलतो, तोलतो, सोयरे धायरे करतो तो आत्मा असतो. पोथी वाचतो, अर्थ सांगतो टाळ धरतो, गाऊ लागतो, वादविवाद करतो तो आत्मा. देहात आत्मा नसेल तर ते प्रेतच आहे. देहाच्या संगतिने आत्मा सगळं काही करत असतो. देह आणि आत्मा एकाशिवाय एक काहीही न करता वाया जातात; म्हणून देहाच्या योगानेच हा उपाय केला जातो.

देह अनित्य, आत्मा नित्य आहे, हाच विवेक आहे आणि हा विवेक करण्याचं काम फार सूक्ष्म आहे. कार्य म्हटले की ते सूक्ष्मदेहाकडूनच होत असतं. स्थूल देह सूक्ष्मदेवाकडून होणाऱ्या आज्ञा फक्त पाळत असतात. पिंडात देह धारण करणारा जीव असतो आणि ब्रम्हांडामध्ये देह धारण करणारा असतो त्याला  शिव म्हणतात. विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूल प्रकृती हे सगळे चार देव ईश्वराच्या आधीन आहेत. त्रिगुणाच्या पलीकडचा जो ईश्वर तो अर्धनारी नटेश्वर असून सगळ्या सृष्टीचा विस्तार तिथून झालेला आहे. विचार केला असता तेथे स्त्री पुरुष नाहीत, चंचल रूपाने सर्व प्रत्ययास येते.

मुळापासून शेवटपर्यंत, ब्रह्म्या पासून तर मुंगीपर्यंत नित्य अनित्य विवेक चतुराने जाणावा. जितकं जड तितक अनित्य. आणि जितकं सूक्ष्म तितकं  नित्य. याच्यामध्ये नित्यानित्य पुढे सांगितले आहे. स्थूल, सूक्ष्म ओलांडले, कारण-महाकारण सोडलं, विवेकाने विराट आणि हिरण्यगर्भ यांचे खंडन केले. अव्याकृत मूळप्रकृती तिथे जाऊन बसली, तिथे वृत्ती जाऊन बसली. ती वृत्ती निवृत्त होण्यासाठी निरूपण ऐका, असं समर्थ सांगत आहेत. आत्मानात्मक विवेक सांगितला. चंचलात्मा प्रत्ययाला आला. पुढच्या समासामध्ये सारासार विचार सांगत आहे. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मानात्म  विवेक नाम समास प्रथम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.

दशक १३ समास २ सारासार निरूपण नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ. हे संपूर्ण जगडंबर वाढलेले आहे, त्यामध्ये सार कोणते आणि असार कोणते ते विवेकाने ओळखावे. त्यासाठी सारासार विचार ऐका. दिसेल ते नसेल आणि येईल ते जाईल जे असत आहे असेल तेच सार. मागे आत्मानात्म विवेक सांगितला. अनात्मा ओळखून घेतला. आत्मा जाणता झाल्यावर मूळचा मूळतंतू असे त्याला म्हणतात. मूळमायेच्या ठिकाणी जी वृत्ती राहिली ती निवृत्त झाली पाहिजे असा विचार श्रोत्यांनी करावा. नित्य-अनित्य विवेक केला, नित्य असलेला आत्मा निवडला.

निवृत्ती रूप निराकार हेतू उरला. सारासार विचार करता हेतू म्हणजे चंचल, निर्गुण म्हणजे निश्चल. चंचल होते आणि नष्ट होते, म्हणून निश्चल महत्वाचे. ज्ञान आणि उपासना दोन्ही एकच आहेत. उपासनेसाठी लोकांचा उध्दार केला पाहिजे. दृष्टा, साक्षी, जाणता, ज्ञानघन, चैतन्यसत्ता, ज्ञान म्हणजेच तत्वतः देवच. त्या ज्ञानाचे विज्ञान होते. अनेक मतं शोधून पहा. चंचल सगळं नष्ट होतं. नाशिवंत नष्ट होईल, होईना का ..असं मनामध्ये तर्क केला जातो पण असं म्हणणारा पुरुष हा सहसा ज्ञानाचा अधिकारी असतोच असे नाही. नित्य निश्चय केला, संदेह निघूनच  गेला नाही तर तो मृगजळामध्ये वाहवत गेला असं जाणावं. ज्याला क्षयच नाही तो अक्षय, व्यापकपणे सर्वांच्या ठायी वास करतो, तिथे काही हेतू किंवा संदेह नसतो.   तो निर्विकार असतो.

जे उदंड, घनदाट, आद्य,मध्य शेवट, अचल आढळतो आकाशासारखं जे घनदाट असतं जिथे काही जन्मलेच नाही, असं सदोदित निरंजन असतं. चर्मचक्षु, ज्ञानचक्षु हा सगळ पूर्वपक्ष आहे. निरर्थक आहे. जे निर्गुण जे आहे ते लक्ष आहे. संगत्याग केल्याशिवाय परब्रम्ह होणार नाही. संगत्याग म्हणजे आपल्या संगाचा म्हणजे मीपणाचा त्याग करून म्हणजे जिथे सगळे स्फुरण आदि सर्व वाणी  नष्ट होतात अशा मौन स्थितीला तो पोहोचतो. अशा प्रकारची माहिती समर्थ देत आहेत. पुढील माहिती ऐकूया पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ. (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!