दशक १३ समास नववा आत्मविवरणनाम समास
जय जय रघुवीर समर्थ. वायुबरोबर सुगंध येतो पण तो सुगंध वितळून जातो. वायू धूळ घेऊन येतो पण धूळ देखील निघून जाते. वायूबरोबर थंड-उष्ण येते. सुगंध किंवा दुर्गंध येतो; पण तेही निघून जाते. वायूबरोबर रोग येतात. वायूबरोबर भुते धावतात. वायुबरोबर धूर आणि धुके येते. वायूच्या संगतीमध्ये काहीच जगत नाही. आत्म्याबरोबर वायू टिकत नाही. आत्म्याची चपळता अधिक आहे. कठीण गोष्ट आली की वायु अडतो. आत्मा मात्र कठीण गोष्टी भेदून जातो. वायु झडझडा आवाज करतो
आत्म्याचा आवाज येत नाही. मौन बाळगून शोध घेतला असता अंतरात्म्याला गवसतो. शरीराला बरे केले ते आत्म्यापर्यंत पोहोचले. शरीराच्या योगाने समाधान मिळाले. देहाशिवाय विविध उपाय केले असता ते आत्म्यापर्यंत पोहोचत नाही. देहाचीच वासना भागते. देह आणि आत्मा यांचं कौतुक खूप आहे. देहाशिवाय वेगळे आत्म्याचे अस्तित्व आहे. दोन्ही एकत्र असताना उदंड काहीतरी घडतं दोन्ही वेगळे असतील तर काहीही घडत नाही. देहात्मयोगाचा विचार विवेकपूर्वक करावा. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मविवरण नाम समास नवम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक तेरा समाज १० शिकवण निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. पानांच्या माळा, फुलांच्या माळा, फळांच्या माळा, बीजांच्या माळा, पाषाणाच्या माळा, कवडीच्या माळा या दोरीच्या योगाने तयार होतात. स्फटिक माळा, मोहरेमाळा, लाकडाच्या माळा, गंधमाळा, धातूच्या माळा, रत्नांच्या माळा, जाळ्या हे देखील तंतुमुळे चालते. तंतू नसेल तर विस्कळीत होते. मात्र हा दृष्टांत आत्म्याला देता येत नाही. तंतूमध्ये मणी ओवला असता तंतू मध्ये राहतो. आत्मा मात्र सहजपणे चपळ असतो. तर दोरी ही एका ठिकाणी स्थिर असते. म्हणून हा दृष्टांत काही योग्य नाही. नाना वेलींमध्ये पाण्याचा अंश असतो. ऊसामध्ये रस असतो पण तो रस आणि चोयट्या एक नाहीत. देहामध्ये आत्मा असतो. देह अनात्मा असतो. त्याच्यापेक्षा वेगळा असा परमात्मा असतो; त्या निरंजनाला कोणतीही उपमा नाही. राजापासून रंकापर्यंत सगळी मनुष्याची जात असली तरी सगळ्यांना समान कसं काय मानायचं? देव-दानव-मानव नीच योनी जीव, पापी, चांगले काम करणारे असे अनेक आहेत. एकाच्या अंशामुळे जग चालतं पण सामर्थ्य वेगवेगळे आहे.
एकामुळे मुक्त होतं एकामुळे बंधन पडते. साखर आणि माती म्हणजे पृथ्वीतत्व पण माती खाता येत नाही! विष आणि पाणी हे आपतत्त्व आहे पण दोन्हीचे गुणधर्म वेगळे. पुण्यात्मा आणि पापा दोन्हीकडे अंतरात्मा पण साधू आणि भोंदू यांची सीमा वेगळी आहे. अंतर एक हे खरं पण कोणालाही जोडीला घेता येत नाही. पंडित आणि मूर्ख सारखेच कसे काय होऊ शकतील? माणूस आणि गाढव, राजहंस आणि कोंबडा, राजे आणि माकडे एक कशी? गंगेचे जल म्हणजे पाणी आणि डबक्यामध्ये असतं तेही पाणीच. पण डबक्यातलं पाणी थोडं तरी पिले जाईल का? त्याप्रमाणे माणूस आचारशुद्ध, विचारशुद्ध, वितरागी आणि सुबुद्ध असा पाहिजे.
शुरापेक्षा भित्र्या लोकांना मान दिला तर युद्धाच्या प्रसंगी फजिती होईल. श्रीमंत सोडून दरिद्री माणसाला धरलं तर काय उपयोग आहे? एका सर्व निर्माण झालं पण पाहूनच त्याचं सेवन करायला हवं. सगळं तसंच घेतलं तर तो मूर्खपणा ठरेल. अन्न म्हणजेच जीवन असतं, अन्न ओकून पडले पण त्या ओकारीचे भोजन करता येत नाही. त्याप्रमाणे निंद्य असेल ते सोडून द्यावे. वंद्य असेल ते हृदयात धरावे. सत्कीर्तीने सगळे भूमंडळ भरावे! असं समर्थ सांगत आहेत. हा भाग येथे संपला असून पुढील कथा ऐकूया पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

मोबाइल- ९४२०६९५१२७