नाशिक,दि. १३ ऑक्टोबर २०२३ –महाराष्ट्राचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना आज (शुक्रवार दि १३ )पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मराठा आरक्षणाला विरोध केल्यास परिणाम भोगावे लागतील, अशा आशयाची धमकी देण्यात आली आहे.या बाबत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी धमकीसंबंधीची तक्रार नाशिकच्या अंबड पोलिस स्टेशनला दिली आहे.
दरम्यान, छगन भुजबळ यांना गेल्या पाच वर्षात देण्यात आलेली ही पाचवी धमकी आहे. ऑक्टोंबर २०१८ मध्ये धमकीचे तीन पानी पत्र भुजबळ यांना पाठवण्यात आले होते. जुलै २०२३ मध्ये भुजबळ हे पुण्यात असताना कोल्हापूरच्या तरुणाने धमकी दिली होती. पुढे ऑगस्टमध्ये मखमलाबादच्या शाळेतील भाषणानंतर धमकीचे दोन प्रकार घडले होते.
आज छगन भुजबळ येवल्याच्या दौऱ्यावर निघाले असताना २ सहाय्यकांना मोबाईलवर धमकी देणाऱ्याने संपर्क केला होता. प्रत्येकवेळी भुजबळ साहेबांशी बोलायचे आहे असे सांगितले जात होते. त्यानंतर छगन भुजबळ यांच्याही मोबाईलवर संपर्क केला गेला. अखेर धमकी देणाऱ्याने भुजबळ यांच्या मोबाईलच्या व्हॉटस-ॲपवर मेसेज पाठवण्यात आला. ‘तू जास्त दिवस राहणार नाही, तुझी वाट लावल्याशिवाय राहणार नाही’,अशी धमकी दिल्याचे खैरे यांनी तक्रारीत नमूद केले आहे
अंबड पोलिसांनी तक्रारीच्या आधारे मोबाईल ‘ट्रेस’केला असून धमकीचा मेसेज पाठवणारा परभणी भागातील असल्याचे आढळून आले.त्यानुसार संशयिताला ताब्यात घेण्यासाठी पोलिस रवाना झाल्याचे सांगण्यात आले.