भावार्थ दासबोध – भाग १९६

0

दशक १४ समास दहा माया निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. मायेचे निरूपण समर्थ करीत आहेत. कुत्र्याला वाघ असे नाव ठेवले, मुलाला इंद्र नावाने बोलावले, कुरूप असूनही सुंदरा म्हणून आळवले.. मूर्खाचे नाव सकळकळे.. आवाज गाढवीसारखा नाव मात्र कोकिळा, डोळस नाव आणि डोळा निकामी अशाप्रकारे वेगवेगळी नावे दिली जातात आणि प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असते. सावली आणि अंधार एक झाले त्यावेळी जसे होईल त्याप्रमाणे माया आहे. सूर्याचे किरण पडल्यावर बोटे आणि हात लाल दिसतो तशी माया आहे.

भगवे वस्त्र पाहिल्यावर मनाला वाटते आगच लागली आहे. असं वाटत. नीट पाहिले की नेमके काय ते समजते. पाण्यामध्ये पायाची बोटे आखूड, लांब, वाकडी दिसतात तशी माया असते. भोवळ आली की पृथ्वी फिरताना दिसते, काविळीच्या रोगांमध्ये सगळे पिवळे दिसते तशा प्रकारची माया आहे. संनिपातअवस्था असते तशी माया. कोणताही पदार्थ असतो एक आणि दिसतो वेगळाच तशी माया असते. असं समर्थ सांगत आहेत. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे माया निरूपणनाम समास दशम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.

आत्म दशकनाम दशक पंचदश
समास पहिला चातुर्य लक्षण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. अस्थी मासाचं शरीर असतं. त्याच्यामध्ये जीवरुपी ईश्वर राहतो. तो मायेच्या आधीन असल्याने स्वतः विकारी होऊन अन्य विकारांकडे ओढ घेतो, त्यामुळे तो स्वतःला शरीर मानायला लागतो आणि ती दुःखी समजायला लागतो. होईल न होईल ते जीव जाणतो, मात्र त्यासाठी विचार करायला हवा. एक मागून मागून घेतो, एक न मागताच न देतो अशा प्रकारची लक्षणे प्रचितीद्वारे ओळखावी. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म आत्म्यात मिसळावा, राहून राहून दुसऱ्याच्या अंतर्मनाचा शोध घ्यावा.

जानव्याची गुंतागुंत होते ते ढिले केल्यावर मग व्यवस्थित होते त्याप्रमाणे मनाला मन विवेकाद्वारे तयार करावे. ढिलेपण हा एक अंदाज म्हणावा लागेल. अंदाजामुळे अंदाज वाढतात, भीड असेल तर कार्यभाग नासतो, त्यामुळे आधी प्रत्यय पहावा. दुसऱ्याच्या जीवीचे समजत नाही, इतरांच्या मनात काय त्याची जाणीव होत नाही तर मग इतर लोक आपल्याला कशाप्रकारे वश होतील? अक्कल सोडून कार्य केले तर वशीकरण करतील. मात्र लोकांचे प्रयत्न निष्फळ झाल्याने मग ते थंडावतील. जगामध्ये जगदीश आहे मग कोणावर जादू करायची? जो कोणी विवेकाने विवरण करील तोच श्रेष्ठ. श्रेष्ठ माणूस श्रेष्ठ कार्य करतो. कृत्रिम कार्य करणारा कनिष्ठ असतो.

कर्मानुसार प्राणी नष्ट होतो किंवा भला होतो चांगला होतो किंवा वाईट होतो. राजे राजरस्त्यावरून जातात चोर चोराच्या मार्गावरून जातो. वेडे लोक थोड्या स्वार्थासाठी मूर्खपणे ठकवले जातात. मूर्खाला वाटतं की मी शहाणा! पण तो वेडा दीनवाणा असतो. नाना चातुर्याच्या खुणा चतुर माणूसच जाणतो. जो जगाला मिळाला तो जगासारखा झाला. त्याला इकडे किंवा तिकडे काहीही कमी पडत नाही. बुद्धी हे भगवंताचे देणे आहे. बुद्धी नसलेला माणूस कच्चा. त्याला आपले राज्य सोडून फुकटची भीक मागावी लागते. जे जे जिथे जिथे निर्माण झाले ते त्याला त्यांनी मानले. मात्र अभिमानी झाल्यास माणसाला गोवले जाते. सगळे म्हणतात आम्ही थोर, सगळे म्हणतात आम्ही सुंदर, सगळे म्हणतात आम्हीच या भूमंडळावर चतुर. असे मनात विचार आणल्यावर कोणीच स्वतःला लहान म्हणवून घेत नाही.जाणते लोक अनुमान करतात.

आपापल्या स्वाभिमानामुळे लोक अंदाजाने वागतात परंतु हे विवेकाने पाहिले पाहिजे. खोट्याचा अभिमान घेणे, सत्य संपूर्णपणे सोडून देणे ही मूर्खपणाची लक्षणे आहेत. सत्याचा अभिमान असला तरी तो निराभिमान जाणावा. न्याय अन्याय कधीही समान होणार नाही. न्याय म्हणजे शाश्वत, अन्याय म्हणजे अशाश्वत बाष्कळ. दोन्ही एक कसे म्हणता येईल? असा प्रश्न समर्थ विचारत आहेत. हा भाग इथे समाप्त झाला असून पुढील कथा ऐकू या पुढील भागात.जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.