सामाजिक प्रश्नांवर उघडपणे भाष्य करणारा चित्रपट गुठली
उत्तम कथासंहिता,दिग्दर्शन आणि अभिनय संपन्न चित्रपट : नाशिकमधील अनेक कलाकार आणि नाशिकच्या परिसरातच चित्रीकरण
प्रस्तावना
शासन दरबारी नोंद असलेला मुबई-पुणे-नाशिक या त्रिकोणाच्या विकासाची जबाबदारी राज्यकारण्यांनी नाकारली असली तरीही ‘बांधकाम, कारखाना, शिक्षण आणि आरोग्य’ या चार स्तंभांवर नाशिक शहराचा विकास होतो आहे, ही एक आश्वासक बाब आहे.
मुंबई आणि पुणे या दोन शहरांच्या विकासासाठी ‘हिंदी आणि मराठी चित्रपटांचा फार मोठा सहभाग राहिला आहे. बॉलीवूडचे मुंबई आकर्षण आता ओसरत चालले असून परदेशात शुटींग करण्याकडे कल वाढला आहे. काही मराठी चित्रपटांनीही परदेशात चित्रीकरण केल्याची नोंद आहे. मुंबई आणि पुण्याच्या एकुणात विकासाचा परिणाम चित्रीकरणाला खर्चिक आणि अडचणीचे होत असल्याने अनेक चित्रपट मुंबई-पुण्याच्या कक्षेबाहेरील लहान-लहान गावांत चित्रीकरण करण्यासाठी प्राधान्य देत आहेत. अर्थातच त्यामुळे दूरदर्शन मालिकांचे निर्माते देखील आता जवळील गावे आणि खेडीपाडी येथे नवनवीन जागा शोधत आहेत.
नाशिक मधील सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी नाशिक शहराच्या बाहेर आपापली कला सादर करून नाशिकची सांस्कृतिक ओळख वृद्धिंगत करण्यात यशस्वी होत आहे. ‘नाटक, सिनेमा, मालिका आणि हिंदी चित्रपट’ यातून आपलं स्थान मिळवून आहेत. नाशिक मधील कलाकार मंडळी निर्मात्यांना नाशिक शहराकडे वळवण्यासाठी पुढाकार घेत असतांनाच स्वत: निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. परिणामस्वरूप ‘बांधकाम, उद्योग, आरोग्य, शिक्षण आणि संस्कृती’ या पंचतंत्राच्या आधारे नाशिकचा शहराचा विकास सर्वांगीण आणि जलद होतांना स्पष्टपणे जाणवतोय.
पार्श्वभूमी
‘संजय मिश्रा’ हा कलाकार बॉलीवूडमध्ये अगदी लहान-सहान भूमिकांमध्ये प्रेक्षकांना त्याने चांगलेच आकर्षित केले आहे. एक उत्तम ‘चरित्र आणि विनोदी अभिनेता’ अशी बॉलीवूडमधील त्याची ओळख अगदी रास्त असून, सामाजिक प्रश्नांवर उघडपणे भाष्य करणाऱ्या चित्रपटातील त्याच्या भूमिका प्रकर्षाने आणि प्रामुख्याने लक्षात राहिल्या आहेत. ‘आंखों देखी’, ‘इक्कीस तारीख शुभ मुहूर्त’, ‘अंग्रेजी में कहते हैं’ सोबतच ‘वध’ आणि ‘कोट’ सारख्या चित्रपटातील भूमिका लक्षात घेऊन दिग्दर्शक ‘इशरत खान’ याने ‘गुठली लड्डू’ या चित्रपटात एका मुख्य भूमिकेत त्याला कास्ट केले आहे. ज्यामध्ये ‘शिक्षण क्षेत्रातील सामान अधिकार’ या वादग्रस्त विषयाला ‘भक्कम पाठींबा’ देणारं पात्र ‘संजय मिश्रा’ यांनी चितारले आहे.
कथासंहिता
गुठली (धनाय सेठ) आणि लड्डू (हीत शर्मा) या दोन लहान मुलांवर या चित्रपटाचे कथानक बांधलंय. त्यांच्या नशिबाने त्यांचा जन्म ‘समाजाची घाण’ साफ करणाऱ्या समाजात झाल्याने त्यांना अस्पृश्यतेचा सामना करावा लागतो. एकाला शिक्षणाची तर एकाला लाडू खाण्याची आस असते. गुठलीसाठी शाळेचे दरवाजे बंद असल्याने बाहेर उभा राहून शिक्षणाची भूक भागवत असे. तरीही स्वत:चं नाव लिहिण्याची कला आत्मसात करून वायुमंडलचा भ्यास करण्याची क्षमता राखून असतो.
या शाळेचे मुख्याध्यापक- हरिशंकर (संजय मिश्रा) यांना गुठलीच्या एकुणात समाजाची आणि शिक्षणाच्या ध्यासाची पूर्ण जाणीव असते. परंतु समाजाचा या जातींकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि त्यानुसार वर्तणूक यांच्या बंधनामुळे काहीही करण्याच्या परिस्थितीत नसतात.
गुठलीच्या या वर्तनाची तक्रार त्याच्या घरच्यांकडे केली जाते आणि आई-मां रानिया (कल्याणी मुळ्ये) वडील-मंगरु (सुब्रत दत्ता) दोघंही त्याचा समाचार घेतात. याच दरम्यान नाल्याची साफसफाई करतांना लड्डूचा मृत्यू होतो आणि गुठलीच्या आई-वडिलांचे डोळे खाडकन उघडतात. आपल्या मुलाला या घाण कामापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतात. गुठलीला उत्तम शिक्षण देऊन मोठा माणूस बनवण्याचा निश्चय करतात. त्यांच्या निर्णयाला मुख्याध्यापक हरिशंकर यांचा बहुमोल पाठींबा लाभतो आणि गुठ्लीच्या आमुलाग्र बदललेल्या जीवनाचा एकुणात प्रवास या चित्रपटात दाखवला आहे. मानवी जीवनात शिक्षणाचं महत्व, शिक्षणापासून वंचित समाजाच्या व्यथा आणि संधी लाभल्यास त्यांच्या आयुष्यात होणारा आमुलाग्र बदल यासोबतच ‘शिक्षणाचा समान अधिकार’ या संकल्पनेचा आणि घोषणांचा जागर याच्या तुलनेत वस्तुस्थिती याचा उहापोह या निमित्ताने अनुभवायला मिळतो.
दिग्दर्शन
जवळपास ५० एक ‘फिल्म फेस्टिवल’ मध्ये या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद का लाभला याची प्रचीती हा चित्रपट बघितल्यानंतर निश्चितपणे येते. देशातील प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार असून शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये याची जबाबदारी शासनाची आहे. देशातील प्रत्येकाच्या शिक्षणाची उचित व्यवस्था करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. मोठ्या शहरांमध्ये काही प्रमाणात जरी ही कर्तव्यपूर्ती शासनातर्फे होत असली तरीही खेड्यापाड्यांमध्ये सरकारच्या योजना अजूनही पोहोचल्या नाहीत याची जाणीव प्रकर्षाने हा चित्रपट बघतांना होते. किंबहुना आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि खालच्या जातीतील मुलांना शिक्षणासाठी काय त्रास सहन कारावा लागतो याचं दर्शन होतं. या चित्रपटाच्या कथानकात ‘समानाधिकार आणि शिक्षणाधिकार’ याचा उहापोह करतांनाच जातीयवाद या विषयावर प्रखर तडाखे दिलेले आहेत. परिणामस्वरूप या चित्रपटातील काही दृश्ये मन हेलावून टाकणारी आहेत. अस्पृश्यता आजही समाजात जिवंत आहे, हे बघवत नाही.
विषयाला गहनता दर्शवण्यासाठी दिग्दर्शकाने काही प्रसंग उगीचच नाटकी केल्या आहेत. तद्वतच दिग्दर्शकाला चित्रपटाचा तोल सांभाळता आलेला नाही. प्रथमत: मनाचा ठाव घेणारा हा चित्रपट दिग्दर्शकाच्या हातातून रेती सारखा हळूहळू निसटत जातो.
अभिनयाच्या बाबतीत संजय मिश्रा यांनी समाजाच्या दबावाखाली असूनही एका जिद्दी मुख्याध्यापकाची भूमिका मस्त रंगवली आहे. यातील महत्वाची दोन पात्रे म्हणजे मुलाच्या शिक्षणासाठी धडपडणारे आई-वडील, (कल्याणी मुळ्ये आणि सुब्रत दत्ता) या पात्रांनी प्रेक्षकांना आकर्षित केलं आहे.
विशेष –
कांचन पगारे – आपल्या शहरातील हा कलाकार आज कुठल्या स्तरावर पोहोचला आहे, याची जाणीव कदाचित नाशिककरांना नसावी. मराठी थिएटरशी पक्की नाळ जुळलेला हा कलाकार जवळपास १००० च्या वर व्यावसायिक नाट्य कलाकृतींमध्ये चमकला आहे. सोबतच १० मराठी चित्रपट आणि १० मराठी दूरदर्शन मालिकांमध्ये त्याने आपली कला सादर केली आहे. जवळपास ४५०/५०० जाहिराती करतांना कॅडबरी ५ (रमेश-सुरेश), फेव्हीकॉल मरीन, स्प्राईट, व्हील विथ सलमान खान, गो डॅडी.कॉम. आय.पी.एल. दरम्यान आयडिया च्या ३१ जाहिरातींची मालिका अभिषेक बच्चन सोबत त्याने केली आहे. १.४० की लास्ट लोकल, आमीर, माय नेम इज अँथनी गोन्साल्विस, थँक्स मां, मायग्रेशन, पप्पू कान्ट डान्स साला, चैतन्य महाप्रभू, खट्टा मिठा, आक्रोश, दिल तो बच्चा है, धमाल २, बांबू, जोकर, रावडी राठोड, कमाल धमाल मालामाल, रंगरेज, मर्दानी, डॉली की डोली, गब्बर, कॅलेंडर गर्ल, ग्रँड मस्ती, सुपर नानी, पागलपंती, राज कपूर अ जंटलमॅन, अग्नी आणि ग्रेट इंडियन फॅमिली अशा चित्रपटातून आणि जाहिरातीच्या माध्यमातून बहुतांशी विनोदी भूमिका रंगवणाऱ्या या कलाकाराची एका गंभीर भूमिकेसाठी निवड करतांना दिग्दर्शक इश्रत आर खान यांनी रिस्क घेतली की कांचनच्या अभिनय क्षमतेवर विश्वास दाखवला, हे सुरुवातीस कळलेच नाही. परंतु चित्रपट बघितल्यानंतर दिग्दर्शकाचा विश्वास आणि गंभीर भूमिका पेलण्याची ताकद याचा समन्वय बघायला मिळतो. नाशिकचा कलाकार कांचन पगारे याने प्रतिमेच्या विरुद्ध भूमिका साकारून चाहत्यांना अचंबित केलं आहे, ज्याचा नाशिककरांना सार्थ अभिमान आहे.
निर्मिती आणि तांत्रिक बाजू
प्रदीप रंगवाणी यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटाची पटकथा गणेश पंडित, श्रीनिवास अब्रोल आणि इश्रत आर खान यांनी लिहिली असून दिग्दर्शन इश्रत आर खान यांनी केलं आहे. अनिल अक्की यांनी परिणामकारक चित्रीकरण केलं आहे. धनय सेठ या बालकलाकाराने गुठलीची भूमिका उत्तमपणे पेलली असून प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. तद्वतच लड्डूची भूमिका हीत शर्मा याने सुद्धा आपली भूमिका चोखपणे पार पाडली आहे. दिग्दर्शकबरहुकूम या या दोघांनी त्यांच्यातील मैत्रीबंध आणि प्रसंग उत्तमपणे रंगवले आहेत. मुख्याध्यापकाच्या भूमिकेत संजय मिश्रा यांनी नेहमीप्रमाणे रंग भरले आहेत.
सारांश
नाशिकमधील अनेक कलाकार आणि नाशिकच्या परिसरातच चित्रीकरण असा दुर्मिळ योग या चित्रपटाच्या निमित्ताने लाभला दिला आहे. प्रशांत साठे, प्रिया तुळजापूरकर, लक्ष्मी पिंपळे, महेश खैरनार आणि नितीन साळुंके या नाशिकच्या कलाकारांनी त्यांच्या भूमिकांना सुयोग्य न्याय दिला आहे.उत्तम कथासंहिता,दिग्दर्शन आणि अभिनय यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांची वाहवा मिळवतो आहे. भविष्यात नाशिक शहरात चित्रपट निर्मिती वारंवार होईल अशी आशा आहे.
एनसी देशपांडे
मोबाईल ९४०३४ ९९६५४