नाशिकमध्ये पंचवटीत मंत्री व पुढार्‍यांना प्रवेशबंदी :सकल मराठा समाज आक्रमक

मराठवाडय़ातील तीन हजार गावांमध्ये आंदोलन

0

नाशिक,दि. २९ ऑक्टोबर २०२३-जीवाची पर्वा न करता मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यास सकल मराठा समाजातर्फे पंचवटीत जोरदार पवित्रा घेण्यात आला असून आरक्षण मिळेपर्यंत आमदार,खासदार आणि मंत्र्यांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.मराठा समाजाबद्दल सातत्याने गरळ ओकणारे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच ॲड.गुणरत्न सदावर्ते यांचा बैठकीत जोरदार निषेधही करण्यात आला.

मराठा समाजाचा आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या जीवाची बाजी लावून शासनाला अक्षरशः हादरून सोडले आहे.चाळीस दिवसांची मुदत देऊनही शासनाने आश्वासनपूर्ती न केल्याने संयमाचा बांध फुटल्याने मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषण सुरू केले आणि त्यांची प्रकृती ढासळली आहे.त्यामुळे मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला असून आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे,जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत सकल मराठा समाजातर्फे पंचवटीत जोरदार आंदोलन करण्यात आले.मनोज जरांगे पाटील यांना दीर्घायुष्य लाभावे आणि त्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा व्हावी अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काही लोकांनी आत्महत्या करून स्वतःचे जीवनही संपवले असून या शहीद समाज बांधवांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.मराठा समाजास आरक्षण मिळेपर्यंत मंत्री,खासदार,आमदार आणि राजकीय पुढार्‍यांना पंचवटी विभागात फिरकू देणार नाही.त्यांच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही सकल मराठा समाजाने घेतला आहे.

अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाज तसेच जरांगे पाटलांवर सातत्याने टीका केली आहे.त्यामुळे भुजबळांचे जे समर्थ समर्थन करतील त्या जिल्ह्यातील सर्व नेत्यांना आगामी सर्व निवडणुकांत मतदान न करण्याचा तसेच त्यांच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.मराठा समाजाबद्दल भुजबळ हे सातत्याने विषारी प्रचार करतात.असे असतानाही त्यांच्या भोवती सातत्याने घिरट्या घालणाऱ्यांपैकी मराठा समाजाच्या एकाही नेत्याला त्यांना रोखण्याचे धाडस होत नाही हे आश्चर्यच म्हणावे लागेल. असे नेते मराठा समाजासाठी कलंक असून भुजबळांचा डाव वेळीच ओळखून त्यांनी सावध व्हावे आणि समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी त्यांनी भुजबळांची साथ सोडावी अशी आमची त्यांना हात जोडून विनंती आहे.भुजबळ यांनीही मराठा समाजाबद्दल सातत्याने विषारी फुत्कार सोडण्याचे  षडयंत्र न थांबविल्यास त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल,असा इशाराही बैठकीत देण्यात आला. प्रवेश बंदी झुगारून जे नेते पंचवटीत प्रवेश करतील त्यांचा श्रद्धांजली बॅनर लावून सोशल मीडियाद्वारे त्यांच्या खरपूस समाचार घेतला जाईल असेही बैठकीत ठणकावून सांगण्यात आले.

यावेळी तुषार जगताप, नरेश पाटील, राहुल पवार, सचिन ढिकले, श्याम पिंपरकर, संतोष पेलमहाले, विलास जाधव,संजय  फडोळ, प्रफुल्ल पाटील, राहुल बोडके, किरण पाणकर, किरण काळे, सुनील निरगुडे, दीपक दहिकर, अमित नडगे, सचिन शिंदे,सुरेश सोळंके, कुणाल भवर, निलेश मोरे, प्रशांत वाळुंजे, दत्ता भगत, गौरव शितोळे, मोहन गरुड मंगेश कापसे, संकेत नडगे, गणेश नडगे,, सनी आंडे, ज्ञानेश्वर कवडे, रोहिणी उखाडे, प्रकाश उखाडे, प्रविण आहेर,अनिल धूमणे, सुनील फरताळे, बंडू गटकल, दिलीप सातपुते, आदींसह समाज बांधव उपस्थित होते.

अन्य समाजाचाही पाठिंबा 
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी  मराठा समाज आक्रमक झालेला असतांनाच पंचवटी परिसरातील अन्य सर्व समाजाने मराठा समाजाच्या आरक्षण मागणीस पाठिंबा दर्शवला आहे. मराठा समाज आर्थिक,सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याने या समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे,अशी भूमिका सर्व समाजाने मांडली आहे.त्यांच्या या भूमिकेचे सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी स्वागत केले आहे.

मराठवाडय़ातील तीन हजार गावांमध्ये आंदोलन
मराठा आरक्षणाचा वणवा पेटला असून मराठवाडय़ातील तीन हजार गावांमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. यापैकी बहुतांश गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी घातली आहे. आंदोलकांनी बसवरील ‘गतिमान’ सरकारच्या जाहिरातीतील पंतप्रधानांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या छायाचित्रांना काळे फासले.जरांगे यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी मराठवाडय़ातील गावागावांत साखळी उपोषण करण्यात येत असून राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. भोकरदन येथे महिलांनी मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढला.

नांदेड येथे रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी आलेले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. आंदोलकांच्या भीतीपोटी प्रशासनाने रोजगार मेळाव्याचे ठिकाणच बदलले. डॉ. कराड कार्यक्रमासाठी गेल्याचे कळताच आंदोलकांनी रेल्वे प्रबंधक कार्यालय गाठून त्यांना रोखले. नांदेड येथे शनिवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावलेले पोस्टर आंदोलकांनी फाडले. मराठा आरक्षणाला विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते यांची आंदोलकांनी प्रतीकात्मक अंत्ययात्राही काढले.

हिंगोली जिह्यात मराठा आंदोलकांनी बसवर लावलेल्या ‘गतिमान’ सरकारच्या जाहिरातीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या छायाचित्रांना काळे फासले. परभणी जिह्यात अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.बीड जिह्यात शेकडो गावांत मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण करण्यात येत आहे. आंदोलकांनी राजकीय नेत्यांना गावात येण्यास मनाई केली आहे.

जिह्यातील गेवराई येथील एका आंदोलकाने २५ कि.मी. लोटांगण घालत आंतरवाली सराटी गाठले आणि मनोज जरांगे यांची भेट घेतली. धाराशीव जिह्यातही हीच परिस्थिती आहे. लातूर जिह्यात मराठा आंदोलकांनी मांजरा नदीपात्रात उडय़ा मारून अभिनव आंदोलन केले. लातूर दौऱयावर आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना मराठा आंदोलकांनी गावबंदी असताना आलाच कसे, असा जाब विचारला.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.