भावार्थ दासबोध -भाग १९८

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक १५ समास २ निसृह व्याप लक्षण 
जय जय रघुवीर समर्थ. अवघड स्थळी जेथे जाणे कठीण असते नेमके तेथे राहावे. सृष्टीमधील सर्व लोक त्यांना शोधत येतात. तिथे कोणाचे चालत नाही. एकोपा करून राजकारणासाठी लोकांना कामाला लावावे. लोकांमुळे लोक वाढतात त्याच्यामुळे अमर्यादपणे भूमंडळावर गुप्त रूपाने सत्ता चालते. ठाई ठाई उदंड अनुयायी तयार होतात. मनुष्य मात्र सगळे तिकडे जातात आणि परमार्थ बुद्धीचा विस्तार होतो. जागोजागी, सगळीकडे थोर थोर उपासनेचा गजर होतो.

प्रत्यय द्वारे प्राणीमात्र दुःखापासून सोडविले जातात. अशा तऱ्हेने युक्तीने उदंडपणे कार्य होते.  त्यामुळे लोक शहाणे होतात. तिथे इथे सर्वत्र प्राणीमात्रांना अनुभव येतो. अशा प्रकारचे कीर्ती करायची असेल तरच संसारात यावं. दास म्हणाले हे थोडक्यामध्ये सांगितले. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे निस्पृहव्यापलक्षण नाम समास दुसरा  समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.

दशक १५ समास तीन श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ. मूळ मायेपासून सगळा पंचमहाभौतिक पसारा निर्माण झाला. त्यातील जाणीवेचा तंतूही पंचभौतिक पण कूटस्थ होय. दूरवर फौज आलेल्या आहेत. सिंहासनावर राजा बसलेला आहे त्याप्रमाणे पंचभौतिक जागतिक पसाऱ्यात साक्षी हा राजासारखा होय. देह हा अस्थिमासाचा आहे, तसंच राजाचं जाणावे. मुळापासून सृष्टीचं तत्वरूप असं आहे. राजा आणि प्रजा हेही पंचभौतिकच आहेत. राजाच्या सत्तेने सगळे चालतात परंतु सगळी पंचभूत आहेत त्यांना जाणीवेचे अधिष्ठान आहे.

विवेकामुळे ते व्यापक झाले म्हणून त्याला अवतारी म्हणतात. त्याच न्यायाने मनू किंवा चक्रवर्ती किंवा इतर राजे झाले. जिथे उदंड जाणीव आहे तिथे सर्वत्र भाग्यवान लोक आहेत आणि जिथे जाणीव नाही तिथे दुर्दैवी लोक आहेत. व्याप करतात ते धक्के, टक्के टोणपे खातात ते प्राणी सुदैवी असतात. ते पुढे जातात. आता मूर्ख लोकांना हे कळत नाही. विवेकी माणसाला सगळं समजतं. थोर-लहान हे बुद्धीवर अवलंबून आहे. सर्वच लोकांना हे सगळं समजत नाही. लोक काय करतात, जे आधी जन्माला आले त्यांना थोर म्हणतात.  पण राजा वयाने धाकटा असला तरी पण वृद्ध त्याला नमस्कार करतात अशी विचित्र विवेकाची गती आहे ती तुम्हाला कळली पाहिजे.

सामान्य लोकांचे ज्ञान म्हणजे अंदाजपंचे. रुढीने चालत आलेला असतं तसं ते करतात. नाही कोणाला म्हणायचं सामान्यांना कुठे ठाऊक असतं! कोणा कोणाला काय म्हणायचं की ते म्हणू नये? काही समजत नाही. धाकटा भाग्याने वर गेला तरी त्याला तुच्छ लेखतात.  त्यामुळे जवळच्या लोकांना दूर ठेवावे. त्यांना काही वचन कळत नाही, राजकारण कळत नाही, ते उगाचच मोठेपण मात्र मूर्खपणाने मिरवतात. त्यांना काहीच कळत नाही त्यांना कोणी मानत नाही. फक्त आधी जन्माला आले म्हणून थोर! त्यांना कोण विचारतो?

वडिलांना वडीलपण नाही, धाकट्याला धाकटेपण नाही, असं बोलतात त्यांना शहाणपण नाही. गुणाशिवाय वडीलपण हे तर अमान्यच त्याची प्रचीती मोठे झाल्यावर येते. तरीही वडिलांना मानावे वडिलांनी वडिलपण जाणावे. ते जर जाणलं नाही तर मोठे झाल्यावर कष्ट होतात. त्याप्रमाणे अंतरात्मा हा वडील आहे, तो जिथे जागृत झालेला आहे तेथे महिमा आहे हे स्पष्टच आहे. हे आमचे शब्द नाहीत. त्यामुळे लोकांनी विवेकाद्वारे शहाणपण शिकावे विवेक नसेल तर त्याला महत्त्व नाही,

महत्त्व कमी होते. महत्त्व कमी झाले म्हणजे उपयोग नाही. जन्माला येऊन काय केलं? उगाचच स्वतःला कोपऱ्यात बसवून घेतलं. सगळ्या बायकाही शिव्या देतात. सांदीकोपऱ्यात पडला असं म्हणतात. कारण नसताना मूर्खपणाची प्राप्ती झाली असं होतं. त्याचं असं कोणीही करू नये. सर्व जीवन सार्थक करावं. कळले नाही ग्रंथ वाचून त्याचे मनन करावे. शहाण्याला सर्व लोक बोलावतात आणि मूर्खाला दूर पिटाळतात. जीवाला संपत्ती आवडते तरी शहाणं व्हावं असा संदेश समर्थ देत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!