
दशक १५ समास १० सिद्धांत निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. घडत असते ते आकाशातच असते. आकाशाविना काही होत नाही त्याचप्रमाणे निश्चळामध्ये चंचल आहे. अंधार झाल्यानंतर आकाश काळे झाल्यासारखे दिसते रवी किरणांमुळे ते पिवळे होते. भरपूर ही हिव पडते तेव्हा आकाश थंड झाल्यासारखे वाटते. उष्ण झळामुळे ते वाळले असे वाटते. असे जे काही वाटलं ते ते झालं आणि गेलं तरी आकाश कायम असतं. आकाशासारखे सर्व तगले असं दिसत नाही.
श्रेष्ठ जाणीव ही सावकाश समजून पाहायला हवी. आकाश हे भास नसलेले आहे आणि भास मिथ्या आहे. निराभास हे वेगळे असून ते समजून घेतले पाहिजे. पाणी पसरते, वायू पसरतो, आत्मा अत्यंत पसरतो, तत्त्वांमध्ये तत्व अंतरामध्ये सर्व पसरत जाते. चळतं आणि चळत नाही, अंतरामध्ये सगळंच कळतं. विचार केला असता प्राणीमात्रांचे विचार करणेच निवळते. विवरण करता करता शेवटी निवृत्तीपदाची अखंड भेट होते, मग त्याची चुकामुक होत नाही.
जिथे ज्ञानाचे विज्ञान होतं, मनाचे उन्मन होते, तत्त्वदर्शनामध्ये विवेकद्वारे अनन्य होतात. अंतरात्म्याला शोधून पाहिले तर चंचलाचं निश्चल झाले, त्यावेळेस देव-भक्तपण गेले. पाहायला गेले तर पदार्थ नाही, कोणताही पदार्थ मुळीच नाही, कळण्यासाठी काही बोल असतात पण त्यांना काही अर्थ नसतो त्याप्रमाणे हे असते. अज्ञानाची शक्ती निघून गेल्यावर ज्ञानशक्ती मावळल्यावर वृत्ती शून्य कशी झाली, ही स्थिती पहा. मुख्य शक्तिपात कसा असतो? सद्गुरुकृपा प्राप्तीचे जे अनेक मार्ग आहेत त्यात त्यांचा अनुभव शिष्यांच्या अंतरी प्रवेशित करणे या क्रियेला शक्तिपात म्हणतात. याचेही नाना प्रकार आहेत. श्री समर्थांनी मुख्य शक्तीपात त्याला मानले आहे की ज्याच्या योगाने शिष्यांतरीचा चंचलपणाचा सर्वही उभार नष्ट होतो. अज्ञान, ज्ञान आणि शून्यत्व यांनी युक्त असलेली ‘मी’पणाची जाणीव संपूर्ण नष्ट होऊन प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूपच होणे हाच मुख्य शक्तिपात शक्तींचा लय होय. असा शक्तिपात झाल्यावर निवांत निवांत निर्विकारी होता येते.
चंचलाची अग्रे चंचल आहेत म्हणूनच त्याच्या शाखाप्रशाला रूपाने विकार निर्माण होतात. तिथे चंचल आटून जातं. चंचल-निश्चल एकरूप होतं, हे घडत नाही. महावाक्याच्या विचाराचा अधिकार संन्याशाला आहे. दैविकृपा असलेल्या नरालाच ते पाहता येते. संन्याशी म्हणजे शडन्यासी म्हणजे काम क्रोधादी सहा विकारांचा त्यागी विचारवंत. म्हणजे ब्रम्हविचार करणारे सर्व संन्याशीच होत कारण या विचारात विकारांचा त्याग अवश्य असतो. त्यासाठी वेषच पाहिजे असं नव्हे. आपली कर्मे निश्चयपूर्वक करतात ते संन्याशी. शेवटी आपली करणी आपल्यापाशीच हे निश्चित! जगदीश प्रसन्न झाल्यावर त्याचा तिथे कोण अपमान करेल? आता हे विचारी लोकच हा विचार जाणतात. ज्या ज्या विचारी लोकांना हे समजलं, ते ते नि:संग होऊन गेले. देहाचा अभिमान असल्यामुळे जे उरले ते देहाभिमान रक्षण करतात!
मनात ब्रह्म ठसवले की अज्ञान म्हणजेच पूर्वपक्ष उडून जातो आणि अंतरात्मा म्हणजे जो हेतू रूप ‘मी’पणमय असतो तोही मावळतो. चंचलता सगळं नाहीसं होत. आकाश आणि पाताळ दोन्हीच्या मध्ये अंतराळ आहे. दृश्यतेच्या पडदा असतो तो काढून घेतल्यानंतर मग ते दोन्ही एक होतात. ते तर अखंडच आहे. ब्रह्म अखंडच आहे, मन त्याला उपाधी लावून पाहते. उपाधीचा निरास झाला तर शब्द कसा राहील? शब्दातीत, कल्पनेच्या पलीकडील मन बुद्धीला न समजणारे कसे आहे त्याचा अंतर्यामी विचाराने विचार करावा. पाहता पाहता कळून येते, कळले तितके व्यर्थ जाते म्हणजे कळले असल्याची जाणीवही राहता कामा नये, हे अवघड आहे. ते कोणत्या प्रकाराने सांगायचं? वाक्यार्थ, वाच्यार्थ शोधला, परब्रम्हामध्ये लक्ष्यांश बुडाला. पुढे समजून कोणीतरी बोला. शाश्वताला शोधायला गेला त्यामुळे ज्ञानी माणूस सत्यस्वरूप झाला त्याने विकार सोडून दिले आणि तो निर्विकाराला मिळाला.
उदंड दुस्वप्न पाहिलं, जागे झाल्यानंतर ते खोटे असल्याचे लक्षात आलं, पुन्हा ते आठवलं तरी ते खोटं ! प्रारब्ध योगाने देह आहे, असतो किंवा नसतो, ब्रम्हविचार मात्र अंतरी बसतो. तो चळत नाही. बीज भाजलं की त्याचं वाढणं खुंटते. त्याप्रमाणे ज्ञानी माणसाला वासनेचे वीज नसते. विचाराने बुद्धी निश्चल झाली, बुद्धीपाशी कार्याची सिद्धी आहे. पूर्वी झालेले संत साधू यांची बुद्धी निश्चळ परब्रह्मापर्यंत गेली. निश्चालाचे ध्यान करतो तो निश्चल. चंचलाचं ध्यान करतो तो चंचल. भूतांचे ध्यान करतो तो भूत होतो. असं समर्थ सांगत आहे हा भाग येथे संपला असून पुढील कथा ऐकू या पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

मोबाइल- ९४२०६९५१२७



