
दशक १५ समास दहा सिद्धांत निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. जो शेवटपर्यंत पोहोचला त्याला माया काहीही करू शकत नाही. आंतरनिष्टांवर मायेची शक्ती चालत नाही. ती खोटी असं कळल्यानंतर विचार सुदृढ झाले. त्यामुळे संपूर्ण भय निघून गेलं. श्रीराम उपासनेमुळे उत्तीर्ण व्हावं. जगामध्ये रामभक्ती प्रसृत करावी. हे कार्य करीत असतानाही अंतरी विवेकयुक्त राहून यशापायशाने आपली भूमिका ढळू देऊ नये. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सिद्धांत निरूपणनाम दशम समास समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
सप्तातीन्वय नाम दशक १६ वे समास एक वाल्मीक स्तवन निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. वाल्मीक ऋषी धन्य आहेत. सर्व ऋषींमध्ये ते पुण्यश्लोक आहेत. त्यांच्यामुळे त्रैलोक्य पावन झालेले आहे. भविष्य आणि शतकोटी हे डोळ्यांनी पाहिलं नाही, सगळी सृष्टी शोधली तरी हे कुठे ऐकलं नाही. भविष्य काळाबाबत एखादे वचन खरं ठरले तरी लोकं आश्चर्य मानतात. वाल्मिक ऋषींनी रामकथेचा विस्तार केला नसता तर रघुनाथ अवतार लोकांना माहिती झाला नसता. मग लोकांनी शास्त्राधार देखील पाहिला नसता. ज्यांचा असा वागविलास आहे की तो ऐकून प्रत्यक्ष शंकर देखील संतोषला. त्यांनी त्रैलोक्याचे विभाजन करून शतकोटी रामायण रचलं. ज्याचं कवित्व शंकराने पाहिलं, इतरांना त्याचा अंदाज देखील करता येणार नाही. या कार्यामुळे रामाच्या उपासकांना परम समाधान झालं. अनेक थोर थोर ऋषी होऊन गेले, त्यांनी पुष्कळ कवित्व केलं परंतु वाल्मिकीसारखा कवीश्वर न भूतो न भविष्यती. पूर्वी दुष्ट कर्म केली होती परंतु रामनामामुळे पावन झाला. नाम जपल्यावर दृढ नियम पाळून पुण्याची सीमा ओलांडली.
रामाचे उफराटे नाव घेतलं त्यामुळे पापाचे पर्वत फुटून गेले. ब्रह्मांडावर पुण्याचे ध्वज उभारले. वाल्मिकीनी जिथे तप केलं ते वन पुण्यपावन झालं. शुष्क काष्टाला देखील अंकुर फुटले. त्याच्या तपामुळे पूर्वी वाल्याकोळी होता तो जीवघातकी असा होता. त्यालाच आता विद्वान आणि ऋषी वंदन करतात. उपरती आणि पश्चात्ताप केल्यानंतर पाप नाहीसे होतं. देहात असणारा जो देही अंतरात्मा मी-पण त्याचा नाश होईपर्यंत केलेल्या तपाने पाप नष्ट झाले. पश्चा:तापामुळे आसन घातले, देहाचे वारूळ झाले तेच त्याला नाव पडलं. वारूळाला वाल्मीक म्हणतात म्हणून वाल्मीक हे नाव शोभतं. ज्याच्या तीव्रतामुळे तापसी माणसांचं हृदय झिजते.
त्या तापसीमध्ये श्रेष्ठ, कवीश्वरांमध्ये वरिष्ठ, स्पष्ट निश्चयाचा बोलणारा कवी म्हणजे वाल्मीक. निष्ठावंतांचे भूषण, राम रघुनाथ भक्तांचा भूषण, असाधारण धारणा आहे असा, तो साधकाला सुदृढ करतो असा वाल्मीक ऋषी ईश्वर समर्थांचा कवीश्वर असून त्याला माझा साष्टांग नमस्कार. वाल्मिक ऋषींनी सांगितली नसती तर आम्हाला रामकथा कशी समजली असती? म्हणून त्याच्या सामर्थ्याचे काय वर्णन करावं? रघुनाथाची कीर्ती प्रकट केली त्यामुळे त्याचा महिमा वाढला. भक्त मंडळी त्याचे श्रवण करून सुखी झाले. आपला काळ सार्थक केला. रघुनाथ कीर्तीमध्ये बुडाला, त्याच्यामुळे भू मंडळावरील सगळे लोकं उद्धारले. थोर थोर रघुनाथ भक्त आहेत. त्यांचा महिमा अपार आहे. त्या सगळ्यांचा किंकर आहे असे रामदासस्वामी म्हणतात. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे वाल्मीकस्तवन निरूपण नाम समास प्रथम समाप्त.
दशक १६ समास दोन सूर्य स्तवन निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. हा सूर्यवंश धन्य आहे. सगळ्या वंशामध्ये विशेष आहे. मार्तंड मंडळाचा प्रकाश सगळ्या भूमंडळावर पसरलेला आहे. चंद्राला डाग आहे, पंधरा दिवसांमध्ये तो कमी कमी होत जातो. रविकिरण पसरतात तेव्हा चंद्र दिसेनासा होतो. त्यामुळे सूर्याच्या बरोबरीचा दुसरा कोणीही नाही. त्याच्या उजेडामुळे प्राणिमात्रांना जीवन मिळते. नाना धर्म, नाना कर्म, उत्तम-मध्यम-अधम सुगम-दुर्गम नित्यनेम सृष्टीमध्ये चालतात. वेदशास्त्र आणि पुराण, मंत्र, यंत्र, नाना साधन, स्नान संध्या पूजा विधान ही सूर्याशिवाय बापडी आहेत. नाना योग नाना मत हे असंख्य असली तरी सूर्योदय झाल्यानंतरच मार्गक्रमण करतात. प्रापंचिक असो किंवा पारमार्थिक कुठल्याही काम करायचं असलं तरी दिवसाशिवाय त्याचं सार्थक होत नाही.
सूर्याचे अधिष्ठान म्हणजे डोळे. डोळे नसले तर सगळे आंधळे होतील त्यामुळे सूर्याशिवाय काही कोणाचं चालणार नाही. अंध लोक कसे कवित्व करतात असे काही जण विचारतात, पण तीही सूर्याचीच गती आहे. थंड झाले तर मतीप्रकाश कसा पसरेल? सूर्याच्या प्रकाश हा उष्ण, चंद्राचा प्रकाश हा थंड असतो. उष्णता नसेल तर देहाचा घात होतो. त्यामुळे सूर्याशिवाय काहीही चालत नाही श्रोत्यांनो तुम्ही हुशार आहात हे तुम्ही शोधून पहा, असं समर्थ सांगत आहेत. पुढील कथा ऐकू या पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

मोबाइल- ९४२०६९५१२७



