प्रस्तावना
मुंबईला व्यावसायिक नाटकाची ‘पंढरी’ मानले जाते. खेड्या-पाड्यातून, चाळी-चाळीतून परिसरातील नाट्यप्रेमींनी त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याच्या दूरदृष्टीतून कलाकारांचे मेळे आयोजित केले. याच मेळा-संस्कृतीतून अनेक दिग्गज कलाकारांनी पुढे महाराष्ट्राचे नाव जगात उज्ज्वल केले. नाट्यकलेच्या संवर्धनात ‘मालवणी संस्कृती’ चा मोलाचा वाटा राहिला आहे. आजही हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीवर, सिनेमा, वेब-सिरीज आणि दूरदर्शन मालिका यामध्ये ‘कोकणातील कलाकार’ आपली कला आणि संस्कृती जपण्यात व्यस्त आहेत. मालवणी कलाकारांना व्यावसायिक रंगभूमीवर संधी देण्याचं महनीय कार्य ‘दिवंगत मच्छिंद्र कांबळी’ यांनी केलं असून त्यांचा पुत्र ‘प्रसाद कांबळी’ आजही वडिलांचा वारसा निगुतीने जपतो आहे. एकुणात व्यावसायिक रंगभूमीच्या संवर्धनात कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद या विकसित शहरांमधील कलाकारांच्या योगदानाच्या खूप आधीपासून ‘कोकणातील कलाकार’ आपली अखंडित सेवा देत आहेत. ‘वस्त्रहरण’ या एकाच नाटकाने व्यावसायिक रंगभूमीवर उडवलेली धमाल रसिक प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे, हीच या कलाकारांना मानवंदना. राजेश देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘करून गेलो गाव’ हे प्रहसन काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर सादर झालं होतं. त्यावेळी या नाटकावर ‘वस्त्रहरण’ या नाटकाची छाया असल्याची टीका यावर झाली होती. अर्थात ‘वस्त्रहरण’ या नाटकातील पात्रांचा प्रेक्षकांवर एवढा पगडा बसला आहे कि, या पठडीतील कोणत्याही नाटकातील कोणत्याही पात्राची तुलना आपोआप ‘वस्त्रहरण’ मधील एखाद्या पात्राशी होणे, अपरिहार्यच आहे. ‘करून गेलो गाव’ या नाटकाची ताकद लक्षात घेऊन ‘वस्त्रहरणची कॉपी’ हा कौतुकाचा रिमार्क टाळून एका वेगळ्या ढंगात सादर करण्याचा निर्णय राजेश देशपांडे याने घेतला आणि त्याला अपेक्षित यशही प्राप्त झाले, ही एक समाधानाची बाब!
कथासंहिता
या नाटकाचं लेखक करतांना एका गावाची पार्श्वभूमी घेतली होती, ती तशीच कायम ठेऊन संपूर्ण संहिता एका वेगळ्या रंगात आणि ढंगात बांधली गेली. यडगाव – बुद्रुक या विकसनशील गावाला ‘तंटामुक्त गाव’ असं पारितोषिक जाहीर होतं. या पारितोषिकाच्या निमित्ताने विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या गावाचा गौरव समारंभ आयोजित केला असतो. या समारंभात ‘बिजली नामक लावणी नृत्यांगना’ हिचा कार्यक्रम करण्याची येथील स्थानिक आमदाराची इच्छा असते. परंतु या गावातील गावकरी मात्र स्थानिक कलाकारांना घेऊन एक नाटक सादर करण्याची इच्छा बाळगून असतात. साहजिकच आमदार साहेबांचा तिळपापड होतो आणि …. हे नाटक कसं होतं ते बघतोच मी ….. असा धमकी वजा इशारा ते गावकरी मंडळींना देतात. त्यावर गावातील सरपंचासहित सर्व गावकरी या आव्हानाचा स्वीकार करतात आणि …
मग काय धुमशान सुरु होतं, जुगलबंदी, प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी डावपेच असा बहुरंगी सामना सुरु होतो. या सामन्याची सुरुवातच मुळी ‘गावकरीच नाटक करणार’ या संकल्पनेने सुरु होते. प्रथमत: नाटकाच्या लिखाणाची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी भाषेशी बराचसा संबंध असलेल्या ‘मास्तरांवर’ येऊन पडते. यातील कलाकार मंडळी म्हणजे गावकरीच ….. इरसाल, एकापेक्षाएक, नग अशा कलाकारांना घेऊन नाटक बसवायचे म्हणजे मास्तरांसाठी तारेवरची कसरतच असते. इकडे मास्तरांची नाट्य-संधी-कलाकारांशी जुळवून घेतांना फेफरं आलेलं असतांनाच दुसरीकडे बेरकी-कारस्थानी आमदार हे नाटक बसण्याआधीच बंद पाडण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करण्याची सुरुवात करतात. प्रथमत: जिच्या लावणीचा कार्यक्रम संकटात आलेला असतो त्या ‘बिजली’ च्या मदतीने नाटकाच्या निर्मितीतअडचणी निर्माण करतात. या नाटकातील स्त्री-पार्ट करणारऱ्या कलाकाराला बिजली आमदाराच्या सांगण्यावरून नादाला लावते. परंतु या प्रकरणाची कुणकुण वेळीच या चमूला लागल्याने त्यांच्याकडून योग्य ती खबरदारी घेऊन येणाऱ्या संकटावर मात केली जाते. दरम्यान बिजलीला सुद्धा एकुणात गावकरी मंडळी आणि त्यांच्या संकल्पनेची आणि त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची प्रचीती येते आणि ती गावकऱ्यांनाच मदत करण्याचा निश्चय करते. अर्थात आमदार सुद्धा काही कमी नसतो, त्याला बिजलीच्या दलबदलाची खबर मिळाल्यानंतर तो तिला कोंडून ठेवतो. मग गावकरी मास्तरांच्या मदतीने तिची सुटकाही करवून आणतात. सरतेशेवटी ‘तंटामुक्त पुरस्कार सोहळा’ कार्यक्रमात गावकरी नाटक सादर करतात. खरंतर ह कथानक अगदी साधंसुधंच आहे आणि अशाच प्रकारचं कथानक याआधीही येऊन गेलं असेल, असं वाटतं. परंतु लेखक आणि दिग्दर्शक राजेश देशपांडे याने या कथानकामध्ये सुयोग्य बदल करून या नाटकाला एक नवीन रूप दिलं आहे. मग प्रसंगानुरूप या इरसाल पात्रांनी हास्याचे फवारे उडवून धमाल आणली आहे.
अभिनयानुभव
यातील पात्रामध्ये ‘इरसाल आणि बेरकी सरपंच – भाऊ कदम’, याने नुसता धुमाकूळ घातला आहे. ‘क्रिकेट मधल्या वेल टाईम्ड शॉट’ प्रमाणेच विनोदाचं अचूक टायमिंग, संवाद फेक आणि मिश्कील बॉडी लँग्वेज’ यांच्या जोरावर सेंच्युरी मारली आहे. किंबहुना एकुणात इरसाल व्यक्तिमत्वाचा एक नमुनाच पेश केला आहे. त्याचीच बायको, मग काय विचारता, हि काकू सुद्धा एक अलगच रसायन आहे. या खाष्ट काकुची भूमिका ‘उषा साटम’ हिने आवश्यक ते रंग भरले आहेत. ‘मास्तर’ या पात्रासाठी -ओंकार भोजने’ याची केलेली निवड आणि त्याने दिलेला ‘मालवण तडका’ केवळ लाजवाब! दुसऱ्या अंकात ओंकारने साकारलेलं ‘स्त्री – पात्र’ आणि त्याचा नाच, म्हणजे ओंकारच्या अभिनयाची कमाल, त्याची संवादावरची पकड आणि हुकुमत आणि त्याची व्हर्सीटॅलिटी ओळखून त्याची निवड केल्याबद्दल दिग्दर्शकाला सलाम! ‘बिजली – अनुष्का बोराडे’ या पात्रासाठी आवश्यक असलेली एकुणात ‘लय, मादकता आणि नृत्यकलेची करामत’ प्रेक्षकांची दाद मिळवून देतो. आमदार – नाना मेतकर – प्रणव जोशी, एक पोहोचलेला राजकारणी, बेरकी आणि प्रौढी मिरवणारा हा पाताळयंत्री माणूस हुबेहूब उभा राहतो. यांच्या सोबतच इतरही पात्रांनी आपापली जबाबदारी दिग्दर्शक बरहुकूम भूमिका निभावत पार पडली आहे. त्यामध्ये सचिन शिंदे(धृतराष्ट्र), नुपूर दुदवडकर(आगरी अमर), सौरभ गुजले(बोंडक्या), सुमित सावंत(सलमान), दीपक लांजेकर(शान्त्या), कैलास कणकेकर(आमदाराचा अंगरक्षक) यांचा समावेश आहे.
सारांश
बरंचस ओळखीचं कथानक, या आधीही सादर झालेला या नाटकाचा प्रयोग तरीही प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात मालवणी नाटक नेहमीच यशस्वी होतं. प्रेक्षकांना अपेक्षित ‘भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांची केमेस्ट्री आणि मालवणी तडका’ या नाटकाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पुरेपूर मिळतो. या साठी लेखक आणि दिग्दर्शक – राजेश देशपांडे याला पैकीच्यापैकी मार्कस. ‘ओल्ड वाईन इन न्यू फ्लेवर’ हा राजेशचा प्रयोग पूर्णपणे यशस्वी. खास मालवणी भाषेचा लहजा, कोकणातील व्यक्तीचित्रे, त्यांच्यातील ‘प्रेम, आपुलकी आणि स्पर्धा’ त्यातून निर्माण होणारे सहजी विनोद, हास्याचे फवारे आणि निखळ आनंद मिळवण्यासाठी हे नाटक पाहायलाच हवे.
एनसी देशपांडे
मोबाईल – 9403499654