नाशिक,दि,१३ नोहेंबर २०२३ – नाशिकच्या गजबजलेले ठिकाण असलेल्या महात्मा गांधी रोडवरील मुंदडा मार्केट लगत असलेल्या वर्धमान कलेक्शन या तीन मजली दुकानाला आग लागल्याने खळबळ उडाली.परिसरात लागलेल्या भीषण आगीनं पाच ते सहा दुकानं जळून खाक झाली. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. या दुर्घटनेत लाखो रुपयांची हानी झाली असून १२ तासानंतरही आग धुमसत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दल कार्यरत आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
शहरातील महात्मा गांधी रोडवरील मुंदडा मार्केट लगत वर्धमान शोरूमला रात्री ११ वाजेच्या सुमारास आग लागली.काही वेळेतच आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे या दुकानाच्या लगतच्या बुक डेपो, संगीत विद्यालय यासह आजूबाजूच्या अन्य ५ ते ६ दुकानांना आगीची मोठ्या प्रमाणावर झळ बसली. या सर्व दुकानांत दिवाळीचे साहित्य उपलब्ध असल्याने आगीच्या घटनेत अनेक दुकानातील कोट्यावधी रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाचे जवळपास १५ बंब घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. फटाक्यांमुळे ही आग लागल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, मात्र नेमकं कारणं कळू शकलेले नाही.
आगीचे स्वरूप लक्षात घेऊन अग्निशामक दलाच्या मुख्यालयासह सातपूर, सिडको, पंचवटी या केंद्रावरून बंब मागवण्यात आले. नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त श्रीकांत पवार, उपायुक्त प्रशांत पाटील, उपायुक्त नितिन नेर, स्वीय सचिव दिलीप काठे आदी अधिकारी तसेच चीफ फायर ऑफिसर संजय बैरागी, के.टी.पाटील, आर सी मोरे,पी.बी.परदेशी यांच्यासह लासूरे, सोमनाथ थोरात, व्ही.पी. शिंदे, खोडे, पवार, राजू नाकील, सांत्रस, देटके, अभिजीत देशमुख, ठाकरे, रूपवते आदींनी आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. (व्हिडीओ पहा )