दिग्दर्शक – मकरंद माने, कलाकार – शशांक शेंडे, विठ्ठल काळे, नीता शेंडे आणि मयुरी.छायांकन – योगेश कोळी, गीतकार – गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख, संगीत – विजय गावंडे
प्रस्तावना
अगदी सुरुवातीपासून ‘मराठी चित्रपटसृष्टी’ ही प्रामुख्याने खेड्या-पाड्यातील कथानकांवर बेतलेली दिसते. जमीनदाराच्या टाचेखाली भरडलेली गावकरी/शेतकरी मंडळी आणि जमिनदारीला कडाडून विरोध दर्शवत या भीषण परिस्थितीला उलथवून टाकणारा शहरातून सुशिक्षित झालेला गावातील मास्तरांचा मुलगा अशा कथानकांची मालिका बरीच वर्षे चालली. शहरी वातावरणात माणूस आणि माणुसकी दोन्हीचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. शहरातील माणसा-माणसा मधला मूळ माणूस, त्याचा स्वभाव, ऐपत आणि एकुणात व्यक्तित्व प्रतीत होत नाही. कारण दिखाऊपणा, बडेजाव आणि काल्पनिक जगात स्वत:ला सिद्ध करण्याच्या स्पर्धेमध्ये माणूस हरवला आहे. गाव-खेड्यांमध्ये माणूसपणा जिवंत असल्यामुळे तेथील कथानकात सत्यता प्रकर्षाने जाणवते, हेच कदाचित त्याच्या पाठीमागचे कारण असावे! नेहमीच गूढ, गंभीर आणि प्रबोधनात्मक असा नाटकाचा विषय असावा, हे काही गरजेचे नाही. मानवी जीवनातील नाती-गोती या विषयांवर अनेक नाटक आणि चित्रपट येऊन गेले आहेत. त्यातील काही नाती पारंपारिक पठडीतली असतात. त्या नात्यांमध्ये खेळकरपणा असतोच असं नाही. आई आणि वडील यापैकी मुलांचं आईशी असलेलं नातं हे जास्त प्रेमाचं, मोकळं आणि खेळकर असतं. परंतु वडिलांशी तसंच नात असावं किंवा नसावं याबद्दल काही नियमही नाहीत. वडिलांच्या खांद्यावर मोकळेपणाने हात टाकून गप्पा मारणं हे सहसा आढळून येत नाही, हे तितकंच खरं. एखाद्या वेळेला वडील आणि मुलगी यांच्यातील संबंधात मोकळेपणा आजकाल बघायला मिळतो. परंतु मुलाशी वागतांना वडिलांना मुलाकडून असलेल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली ती सहजता बाळगता येत नाही. थोडक्यात काय तर समाजानेच या नात्याला नकळतपणे अवघड करून ठेवलं आहे. वडिलांबरोबर एकत्र प्रवास करतांना मुलाला अचानक आणि अनपेक्षित गवसलेला बाप, या संकल्पनेवर या सिनेमाचं कथानक सहज, साधं आणि रंजक पद्धतीने बांधलेलं आहे.
दिग्दर्शन
‘रिंगण, यंग्राड, कागर, लग्न पहावे करून, बावरे प्रेम हे, मंगलाष्टक वन्स मोअर, ७२ मील, वंशवेल, या चित्रपटांच्या माध्यमातून मकरंद माने या दिग्दर्शकाची ओळख सर्वांना आहे. या दिग्दर्शकाच्या एकुणात हाताळणी बघता प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी सांगायचा प्रयत्न याने केलेला दिसतो आणि तो नेहमीच यशस्वी झालेला आहे. ‘बापल्योक’ या चित्रपटाच्या कथानकाला मांडतांना मकरंद माने यांनी कुठेही गंभीरता आणि अभिनिवेश याचा लवलेश न ठेवता बाप-लेकाच्या नात्यांमधील गंमत उलगडून दाखवल्याने हा चित्रपट मनोरंजनात्मक पद्धतीने बरंच काही सांगून जातो. सुरुवातीला दिग्दर्शकाने बाप आणि लेक यांच्यातील समज-गैरसमज, अपेक्षा, अपेक्षाभंग, बेबनाव, प्रेम – दुरावा, वडिलांचं वर्चस्व आणि घरातील ताण-तणाव नेमके दाखवल्यानंतर या दोघांना एका गमतीदार प्रसंगाच्या निमित्ताने एकत्र आणलं आहे. आपण स्वत: बाप झाल्याशिवाय आपला बाप कळणार नाही आणि आपल्या आयुष्याचं वर्तुळही पूर्ण होणार नाही, हे वास्तव दिग्दर्शकाने अतिशय नाजूकपणे सागरला आणि समाजालाही सांगितलं आहे. खरंतर या चित्रपटाच्या कथानकातील आशय महत्वाचा आहे. जरी या कथानकाचा परीघ बरचसा लहान असला तरीही दिग्दर्शकाने या विषयाची हाताळणी चित्रभाषेच्या माध्यमातून केल्याने एकुणात प्रदर्शन प्रभावी आणि परिणामकारक झालं आहे. गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख या दोन गीतकारांनी भूमिकांना अनुसरून रचलेले शब्द, विजय गवंडे यांचं संगीत आणि कलाकारांचा सहज अभिनय प्रेक्षकांना या कथेचा आपणही एक भाग असल्याची अनुभूती देतो.
कथानक
तात्या – (शशांक शेंडे) यांचा मुलगा – सागर – (विठ्ठल काळे) पुण्यातील नोकरी सोडून तो आपल्या गावाकडे परतलेला असतो. त्याचं नुकतंच लग्न ठरलेलं असतं. त्यामुळे अर्थातच सागर लग्नाच्या विचारांमध्ये गुंतलेला आणि स्वप्नात रमलेला आहे. बाप आणि लेक यांच्यात काहीतरी बिनसलेलं आहे. एकीकडे सागर – सदैव होणाऱ्या बायकोच्या विचारात, तिच्याशी बोलण्यासाठी आणि भेटण्यासाठी उतावीळ झालेला. तर दुसरीकडे तात्या – नोकरी सोडून शेतात राबण्यासाठी परतलेल्या सागरच्या विचारात. सागरच्या एकूण वागणुकीमुळे तात्यांचं डोकं भिरभिरलेलं असतं. सागरने एकतर चांगली नोकरी सोडून दिलेली आणि सतत बायकोला भेटण्यासाठी उतावीळ असलेला बघून त्यात्यांच्या मनात त्याच्याबद्दल प्रचंड राग असतो. अर्थात सागरलाही तात्यांच्या या परिस्थितीची पूर्ण कल्पना असते. एकीकडे सागरला – आपण नोकरी सोडून गावाकडे का परतलो? हे त्याला तात्यांना सांगता येत नव्हतं, त्याची कुचंबणा झालेली असते, तर दुसरीकडे तात्यांच्या सततच्या चिडचिडीला तो जाम कंटाळला असतो. सागरची आई – (नीता शेंडे) या दोघांमधला एकमेव दुवा असते. सागरच्या लग्नाच्या पत्रिका घेऊन गावाबाहेरच्या नातेवाईकांना निमंत्रण देण्यासाठी हे दोघं प्रवासाला निघतात आणि या दोन दिवसांच्या प्रवासादरम्यान यांच्यातील आपापसाच्या स्वभावाचं निरीक्षण करण्याची संधी या दोघांना मिळते. तात्या आणि सागर दोघंही एकदम हट्टी स्वभावाचे असल्याने मतं-मतांतरे, त्यातून उद्भवणारे प्रसंग त्यांना एकमेकांच्याकडे निरखून बघण्यास उद्युक्त करतात. आपल्यावर सतत चिडचिड करणारे आपले वडील, त्यांच्यातील मूळ माणूस, त्यांच्यावर गुदरलेल्या प्रसंगामुळे घडत गेलेली व्यक्ती, स्वभाव याचा उलगडा त्याला हळूहळू होवू लागतो.
सारांश
जन्मत:च आईशी नाळ जोडलेली असल्याने आई आणि मुलाचं नातं अतिशय नाजूक, अलवार, समजूतीचं आणि प्रेमाचं असतं. त्यात व्यवहार नसल्याने विचारांच्या आदान-प्रदान यामध्ये मोकळेपणा असतो. परंतु बाप-लेक हे नातं बनवावं लागतं. एकमेकांना समजून उमजून, आवडी निवडी, साद -प्रतिसाद, समज गैरसमज यावर अवलंबून असतं. दिग्दर्शकाने प्रेक्षकांना या कथानकात आणि विशेषतः सागर आणि तात्या यांच्यातील नात्यात सहजपणे ओढून घेतलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आपल्या स्वत:च्या आयुष्याशी पडताळणी करण्याची संधी प्राप्त होते. या नात्यातील गमती-जमती आणि समज-गैरसमज याचं आकलन होतं. आपला बाप असा का? या प्रश्नाचा उलगडा रोजच्या आयुष्यात होणं शक्यच नसतं. पण या चित्रपटाच्या माध्यमाने निश्चितपणे होतो. आणि हे नातं उलगडून दाखवण्याचं श्रेय्य निश्चितपणे दिग्दर्शकाचं! एका बापाची ओळख म्हणजे, आपल्या आईचा पती, आपला जन्मदाता आपल्या घराची आर्थिक जबाबदारी पेलणारी व्यक्ती आणि कुटुंब प्रमुख, एवढीच असते, शिवाय कायम चिडचिड, रागावणे वगैरे वगैरे …… पण घराच्या भिंती ओलांडल्यानंतर बाहेरच्या जगातील आव्हानांपासून आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवणारा हा आपला बाप …. आपल्याला कल्पनाही नाही……
बापाची ही ओळख करून देण्याचं महनीय काम दिग्दर्शक मकरंद माने अगदी सध्या पद्धतीने करून दिलं आहे. मुख्य म्हणजे स्वानुभवातुनच मतपरीवर्तन होतं, याची पूर्ण जाणीव दिग्दर्शकाला असल्याने सागर आणि तात्याला घराबाहेर, एकमेकांच्या सानिध्यात राहून, एकमेकांची ओळख अगदी हसत – खेळत करून दिली आहे. त्याच बरोबर एका मुलाला आपल्या बापाची ओळख करून देतांनाच बाप होण्याची प्रक्रिया, प्रवास, मनाचा खंबीरपणा, त्यागाची जाणीव आणि या सर्व भावभावना घराबाहेरच ठेऊन घरातील वातावरण हलकं फुलकं आणि सुरक्षित ठेवण्यासाठी काहीही करण्याची तयारी …….. याचं प्रशिक्षण ……
हा या चित्रपटाचा आशय दिग्दर्शक बरहुकूम कलाकार शशांक शेंडे आणि विठ्ठल काळे यांनी बाप-लेकाच्या पात्रातून उत्तमपणे दाखवला आहे. या दोघांच्याच खांद्यावर या चित्रपटाचा भार आहे आणि त्यांनी ती जबाबदारी पेलली आहे. तरीही दिग्दर्शकाने सर्वच कलाकारांची निवड अचूक केली आहे. कथानकाचा जीव अगदीच लहान असल्याने प्रत्येक पात्र अत्यंत महत्वाची भूमिका निभावतं. त्यासाठी उत्तम कलाकारांची निवड, हेच दिग्दर्शकाने जाणलं आहे. कलाकारांची निवड, एकुणात मांडणी, अभिनय आणि प्रभावी दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट मनोरंजनाच्या थाळीमध्ये प्रबोधन, हा नाविन्यपूर्ण प्रयोग यशस्वीपणे करतो, यात शंका नाही.
एनसी देशपांडे
मोबाईल-9403499654
