दशक १७ समास २ शिवशक्ती निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. नवरीचे मन नवऱ्यावर नवऱ्याचं मन नवरीवर असा वासनेचा प्रकार आहे तो मुळापासून पाहावा. वासना ही मुळामध्ये अभेद असते देहाच्या संबंधामुळे तिच्यामध्ये भेद निर्माण होतो. देहाचा संबंध तुटला की भेद नाहीसा होतो. नरनारीच हे बीज आहे त्याचं कारण शिव आणि शक्तीमध्ये आहे. देह प्रमाण धरल्यावर हे लक्षात येतं. नाना प्रीतीच्या वासना एकाच्या एकाला कळत नाहीत. तीक्ष्ण दृष्टीने अनुमान केलं तर काही समजतं. बालकाला माता वाढवते हे पुरुषाच्याने घडत नाही ही उपाधी जिच्याने वाढते तिला वनिता असं म्हणतात.
तिला वीट नाही, कंटाळा नाही, आळस नाही, त्रास नाही. मातेसारखी माया कुठेच नाही. नाना उपाधी ती वाढवते. नाना मायेने गोवली जाते. नाना परीने प्रपंचावर प्रीती करते. पुरुषाला स्त्रीचा विश्वास वाटतो, स्त्रीला पुरुषाचा संतोष वाटतो. परस्परांनी वासनेला बांधून टाकलेलं आहे. ईश्वराने हे मोठं सूत्र केलं आणि मनुष्यमात्र त्याच्यामध्ये गुंतून राहिले. लोभाचे गुंडाळे केलं आणि काही समजणार नाही असं केलं. अशी स्त्री पुरुषांची परस्पर आवड मुळापासून निर्माण झालेली आहे ती विचारपूर्वक पहावी. मुळातून सूक्ष्म निर्माण झाले. पुढे स्पष्ट दिसून आले. असे उत्पत्तीचे कार्य उभायतांसाठी चालते. मुळात शिवशक्ती ही खरी, पुढे वधू वर झाली आणि ८४ लक्ष योनीत विस्तारली. असे शिवशक्ती स्वरूप आहे हे वर्णन केलं हे श्रोत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. याचा विचार केल्याशिवाय बोलले ते व्यर्थ होय. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शिवशक्ती निरूपणनाम समास द्वितीय समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक १७ समास ३ श्रवण निरुपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. थांबा.. थांबा.. थांबा.. आधीच ग्रंथ सोडू नका सांगितले ते सावधपणे ऐका. श्रवणामध्ये सार म्हणजे अध्यात्माचे निरूपण ते नीट ऐका. मन शुद्ध करून हे ग्रंथाचे मनन करावे. श्रवण-मननाचा विचार केल्यावर निजध्यासाने साक्षात्कार होतो आणि त्यामुळे रोकडा मोक्ष मिळतो. येथे उधार बोलूच नये. नाना रत्नांचे परीक्षण केलं किंवा वजन केलं, उत्तम सोने मुशीत घातलं या संदर्भात सावधान असावे. नाना नाणी मोजून घ्यावी, नाना परीक्षा करावी, विवेकी माणसाशी सावधपणाने बोलावं. जसं लाखेचे धान्य निवडून अर्पण केलं ते मान्य होत. न निवडता अर्पण केलं तर ते अमान्य होतं. देव रागावतो.
एकांतातील नाजूक कारभार तिथे अति तत्पर असावं, त्याच्या कोटीपटीने अध्यात्मग्रंथाचा विचार केला पाहिजे. कहाण्या, कथा, गोष्टी, पोवाडे, नाना जाड अवतार चरित्र, या सगळ्यांमध्ये अध्यात्मविद्या ही श्रेष्ठ आहे. जुन्या काळातील गोष्टींना ऐकले त्याच्यामुळे हाताला काय लागलं? पुण्य प्राप्त झालं असे म्हणतात पण ते दिसत तर नाही. तसं अध्यात्मसार नाही. हा अनुभवाचा विचार आहे. ते समजायला लागलं की तुमचे अंदाज नाहीसे होत जातात. मोठमोठे होऊन गेले ते आत्म्यामुळेच जगले. त्या आत्म्याचा महिमा सांगेल असा कोण आहे? युगानुयुगे एकटा तिन्ही लोक चालवतो त्या आत्म्याचा विवेक पाहिलाच पाहिजे. प्राणी आले, ते येऊन गेले. त्यांनी वर्तन केलं त्या वर्तणुकीच्या कथन इच्छेसारखं केलं. जिथे आत्मा जागृत नाही तिथे सगळे सपाट. आत्म्याशिवाय सगळी लाकडं.. दुसरं काय? असं आत्मज्ञान वरिष्ठ आहे. त्याच्यासारखं दुसरं काही नाही.
सृष्टीमध्ये विवेकी सज्जन आहेत, तेच हे जाणतात. पृथ्वी आणि पाणी, तेज याचा पृथ्वीमध्ये स्थूल रूप असल्याने त्याचा उलगडा पृथ्वीवरच होतो. अंतरात्मा तत्त्व बीज ते वेगळच राहिले. वायूच्या पलीकडे जो काही विचार आहे त्याच्याजवळच आत्मा पुरुषाला सापडतो. वायू, आकाश ही गुणमाया. प्रकृती पुरुष ही मुळमाया. सूक्ष्म रूप असल्याने त्याची प्रचीती येणे कठीण आहे. मायेच्या गोंधळामुळे सूक्ष्मात कोण मन घालणार? ज्याला समजली त्याची संदेह वृत्ति सुटून गेली. अशी माहिती समर्थ देत आहेत. पुढील माहिती ऐकू या पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ. (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

मोबाइल- ९४२०६९५१२७