मराठवाड्यातील बियर फॅक्टऱ्या बंद करा मगच नाशिकचे पाणी सोडण्याचा विचार करा 

रायुकाँ शहराध्यक्ष अंबादास खैरे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

0

नाशिक,दि २२ नोव्हेबर २०२३ – दुष्काळी परिस्थिती बघता पाण्याचा अपव्यय होणार नाही व पाण्याचे सूक्ष्म नियोजन व्हावे याकरिता मराठवाड्यातील बियर फॅक्टरी बंद झाल्यानंतरच नाशिकचे पाणी जायकवाडीमध्ये सोडण्याचा विचार करावा अशी मागणी युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे.

मागील तुलनेत यंदा नाशिकमध्ये कमी पावसाची नोंद झाली असून धरणातील पाणीसाठा मुबलक प्रमाणात नसल्याने नांदगाव, येवला व सिन्नर सारखे तालुके दुष्काळग्रस्त झाले आहे. नाशिक मधील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना पाण्याची मागणी सुद्धा वाढताना दिसत आहे. गंगापूर धरणातील पाणीसाठा नाशिककरांकरिता अपुरा पडत असल्याने कश्यपी, गौतमी या धरणांतील पाण्यावर गरज भागवावी लागत आहे. शहरातील नागरिकांना व शेतकऱ्यांना शेतीकरिता मुबलक पाणी नसल्याने एक-दोन महिन्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सद्यस्थितीत नाशिक मधील शेतकऱ्यांना शेतीकरिता पाणी उपलब्ध होत नाही. अशात गंगापूर धरणातील पाणी सोडल्यास उन्हाळ्यात नाशिककरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.

नाशिक जिल्हातील अनेक गावात सद्यस्थितीत टँकरने पाणी पुरवठा होत आहे. मराठवाड्यात जायकवाडी धरणातील पाण्याचे नियोजन नसल्याने नाशिक-अहमदनगर मधील ८.६ टीएमसी पाण्याचा पुरेपूर फायदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा व डीएमआयसी करमाड व बिडकीन या औद्योगिक वसाहतींतील बियर फॅक्टऱ्या व मोठ्या कंपन्याना होणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील बियर फॅक्टऱ्या बंद करून जायकवाडी धरणातील पाण्याचे सूक्ष्म नियोजन केल्यावरच नाशिकचे पाणी जायकवाडीमध्ये सोडण्याचा विचार करावा असे पत्रात नमूद केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!