नाशिक,दि. २२ नोव्हेंबर २०२३ –नाशिकरांना अभिनाची गोष्ट असलेला विद्याहरी देशपांडे यांचा मीरा हा संगीत व नृत्याने सजलेला एकपात्री नाट्य प्रयोग दि. २४ नोव्हेंबरला मथुरेतील ब्रज रज मीरा महोत्सव २०२३ मधे सादर होणार आहे. विद्याहरी देशपांडे लिखित या एकपात्री प्रयोगाचे दिग्दर्शन व संगीत सुनील देशपांडे यांनी केले आहे. नेपथ्य आनंद ढाकीफळे यांचे असून, प्रकाश योजना आदित्य रहाणे यांची आहे. संगीत संयोजन तेजस बिल्डिकर यांचे आहे.
संत मीराबाई ही केवळ नृत्य गायन करणारी कवयित्री कृष्णप्रिया म्हणून नाही तर एक धुरंधर राजकारणी, महान समाजसुधारक म्हणून रसिकांसमोर येते हे या प्रयोगाचे वैशिष्ट्य आहे. यात मीरेच्या आयुष्यातील सुमारे २५ च्या वर व्यक्तिरेखा एकट्या विद्याहरी देशपांडे आपल्या सशक्त अभिनयातून सादर करतात. अर्थातच याला काव्य नृत्य संगीताची अविभाज्य सुसंगत जोड देऊन हा प्रयोग रसिकांना मंत्रमुग्ध करतो असा अनुभव आहे. आजवर याचे १५ हून अधिक प्रयोग दिल्ली, रायपूर, बिलासपूर, पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक अशा विविध ठिकाणी झाले आहेत.
ब्रज रज मीरा उत्सवात सुप्रसिध्द चित्रपट अभिनेत्री व नृत्यांगना हेमामालिनी ह्या मीरेवरील आपली संरचना सादर करतील. याशिवाय इतर ही अनेक कलाकार १४ ते २७ नोव्हेंबर या काळात आपली कला सादर करीत आहेत. यापैकी २३ ते २५ नोव्हेंबर या ३ दिवसात मीरेवरील प्रस्तुती सादर होत आहे. या महोत्सवास पंतप्रधान मा.श्रीमान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस उपस्थित राहाणार आहेत. अशा महोत्सवात नाशिक मधील विद्याहरी देशपांडे यांचा मीरा हा एकपात्री नाट्य प्रयोग सादर होत आहे ही नाशिकरांना अभिनाची गोष्ट म्हणावी लागेल.