भोपाळ गॅस दुर्घटनेच्या वास्तवतेचं यथार्थ चित्रण: रेल्वे मेन

0

पार्श्वभूमी
३ डिसेंबर १९८४ रोजी, मध्यप्रदेशातील भोपाळ मधील ‘युनियन कार्बाईड’ या कंपनीच्या कारखान्यात झालेल्या ‘विषारी गॅस गळती’ मुळे जवळपास १५००० पेक्षाही अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला, अनेकांना शारीरिक अपंगत्व पत्करावे लागले आणि काहींना अंधत्व आले. युनियन कार्बाईड कंपनी या कारखान्यात कीटकनाशक बनविण्यासाठी (MIC) मिथाइलआइसोसाइनेट नामक रसायनाचा वापर होत असे. त्यावेळी या दुर्घटनेचे अनेक अर्थ लावले गेले आणि विभिन्न स्त्रोतांनी आपापली अभ्यासपूर्ण मते जाहीर केल्याने मते-मतांतरे असा संभ्रम समाजात निर्माण झाला होता. तरीही किमान २२५९ जणांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. तर मध्यप्रदेश सरकारने ३७८७ लोकांचा मृत्यू झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले होते. पुढील दोन आठवड्यात ८००० लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद असून अधिक ८००० लोकांचा मृत्यू या ‘विषारी गॅस गळती’ च्या प्रभावाने झालेल्या आजारांनी झाल्याचे जाहीर केले गेले. सन २००६ साली सरकारच्या प्रसिद्धी पत्रानुसार सरळ-सरळ किमान ५,५८,१२५ जणांना आणि किमान ३८,४७८ जणांना अंशत: इतर प्रकारे या गळतीचा परिणाम भोगावा लागला होता आणि ३९०० जणांना अतिशय वाईट अथवा पूर्णत: अपंगत्व आले होते. तत्कालीन नोंदीनुसार हि दुर्घटना मानवी जीवनातील नरसंहार करणारी सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटना मानली जाते. या दुर्घटनेची पूर्वकल्पना असतांनाही कामगारांना उचित प्रशिक्षण आणि यंत्रसामुग्री बाबतची सुरक्षा व्यवस्था न पुरवल्याने ही दुर्घटना घडल्याची नोंद आहे.

एकुणात संभ्रमावस्था लक्षात घेऊन या दुर्घटनेचा सर्वकष तपास करण्याची गरज निर्माण झाली. १९९३ साली ‘भोपाळ आंतरराष्ट्रीय चिकित्सा आयोग’ स्थापन होऊन या दुर्घटनेमुळे ‘पर्यावरण आणि मानवी जीवन’ यावर दीर्घकालीन प्रभाव याचा शोध आणि चिकित्सा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. एकुणात या दुर्घटनेत जरी सर्वात मोठा नरसंहार झाला असला तरीही तपास यंत्रणा ‘भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध आणि देशातील राजकारण’ यांच्या प्रभावामुळे सत्य आजही पूर्णतः उलगडलेले नाही.

सकारात्मकता
एकदा एका जंगलात आग लागली होती. सगळे प्राणी आपापला जीव वाचवण्यासाठी पळत होते. काही प्राणी ती आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. त्यात एक चिमणी भराभरा जाऊन तलावातील पाणी चोचीत घेऊन आगीवर टाकत होती. तेव्हा एका प्राण्याने तिला विचारले कि तू असं करते आहेत. तुझ्या चोचीतल्या जराश्या पाण्याने ती आग थोडीच विझणार आहे? खरंतर तू तुझा जीव धोक्यातच घालते आहेस. तेव्हा चिमणी उत्तरली कि प्रश्न हा नाहीच आहे की माझ्या या प्रयत्नाने ही विझेल की नाही. गोष्ट ही आहे की जेव्हा या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव जंगलाला आग लावणाऱ्यामध्ये नाही तर आग विझावणारयांमध्ये नोंदवले जाईल.

वास्तव
संपूर्ण भोपाळ शहरात या दुर्घटनेमुळे हाहाकार उडालेला असतांना आणि परिस्थितीचा काहीही अंदाज नसतांनाही या कारखान्याच्या अत्यंत जवळ असलेल्या ‘भोपाळ जंक्शन रेल्वे स्टेशन’ वरील स्टेशन मास्तर आणि त्याच्या साथीदारांनी प्रतिकूल परिस्थितीत आपापल्या परीने दुर्घटनाबाधित लोकांचा जीव वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यात त्यांना यश-अपयश दोन्हीचा सामना करावा लागला. परंतु त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता प्रयत्नांची पराकाष्टा केली आणि अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. अर्थात याची उचित नोंद घेतली गेली की नाही. ही बाब आपल्यापैकी किती जणांना ज्ञात आहे किंवा स्मरणात आहे. शेवटी काय तर ‘पब्लिक मेमरी इस शॉर्ट’ या तत्वानुसार ही घटना जनतेच्या विस्मृतीत गेली आहे, हेच सत्य!
कलाकारांची अतीव मेहनत

एकुणात भूमिकेचा ‘आवाका, खोलवरपणा, देहबोली, संवादफेक आणि अभिनय’ यांच्या गरजेनुसार केली पात्रांची निवड ‘सुयोग्य, विषयाला समर्पक आणि परिणामकारक’ ठरली आहे.

. कलाकारांच्या नामावलीत प्रथमस्थानी ‘आर. माधवन’ याने रिती पांडेय – जनरल मॅनेजर – वेस्ट सेन्ट्रल रेल्वे झोन,  इंडियन रेल्वेज ही भूमिका साकारली आहे. त्याने ‘थ्री इडीयटस, रॉकेट्री आणि द नंबीयार इफेक्ट’ या चित्रपटातून आपली अभिनयक्षमता दाखवून स्वत:ची प्रतिमा प्रस्थापित केली आहे. त्यामुळे पडद्यावर त्याचे आगमन होताच या भूमिकेचा ‘आवाका, ताकद आणि दबदबा’ याची पूर्वकल्पना येते. देशातील आणि संस्थेतील राजकारणाचा बळी ठरलेला रती पाण्डेय आपल्या कर्तव्यापासून अजिबात विचलित होत नाही. आपलं ‘व्यक्तिमत्व, हुद्दा, प्रामाणिकपणा आणि विषय मांडण्याची, लोकांना समजून घेण्याची आणि समजावून सांगण्याची पद्धत’ याच्या जोरावर तो लोकांची मदत मिळवतो आणि आवश्यक कार्य पार पाडतो.

. आजवर ९० च्यावर भूमिकांच्या माध्यमाने के.के.मेनन याने स्वत:ची अभिनयक्षमता सिद्ध केली आहे. ओटीटीवरील वेब-सिरीजच्या यशामध्ये त्याचा सहभाग सुखावणारा आहे. के.के.मेनन याने इफ्तेकार सिद्दिकी- स्टेशन मास्तर – भोपाळ जंक्शन, ही भूमिका साकारली आहे. आपली ‘नोकरी, दर्जा, जबाबदारी आणि कर्तव्य’ याची संपूर्ण जाणीव ठेऊन इमाने-इतबारे आणि सेवाभावी वृत्तीने कार्यरत असतो. बेईमानी आणि भ्रष्टाचार याला आयुष्यात थारा न दिल्याने हा माणूस कौटुंबिक परिस्थितीत हाताळण्यात अयशस्वी ठरला आहे. विषारी गॅस गळतीमुळे स्वत: बेजार असूनही स्टेशनवरील प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी धडपडतो असतो. प्रतीक्षागृहातील लोकक्षोभ शांतचित्ताने हाताळताना त्याचा तोल अजिबात ढळत नाही. त्या प्रवाशांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठीची ‘आवश्यक मदत, सुविधा आणि सामुग्री’ यांचा अभाव तरीही प्रयत्नांची शिकस्त आणि धडपड वाखाणण्याजोगीच आहे. या त्याच्या प्रयत्नांना जरी यश आलं असलं तरी मृत्यू त्याला शिवून गेला आहे. विषारी गॅसमुळे त्याचाही श्वास कोंडतो आणि तो मृत जाहीर केला जातो. परंतु केवळ त्याच्या एकुणात योगदानाचा सन्मान ठेवण्यासाठी देवाने त्याला पुनर्जीवित केले असावे.

. मिर्झापूर, चष्मेबद्दूर आणि सुक्राणु या माध्यमाने दिव्येंदू शर्मा याने आपली ओळख निर्माण केली आहे. बलवंत यादव ही भूमिका साकारतांना प्रथमत: त्याची ओळख ‘एक्स्प्रेस बँडीट’ अशी होते. कारण तो स्टेशन मास्तरच्या तिजोरीतील जवळपास एक कोटी रुपये चोरायला आलेला असतो. परंतु अचानक विषारी गॅस गळतीच्या धावपळीत तो हवालदाराचा पोशाख घालतो आणि कॉन्सटेबल अशी ओळख निर्माण करत स्टेशन मास्तरला सर्वतोपरी मदत करतो. नंतर परिस्थिती थोडीफार नियंत्रणात आली असतांना आणि स्टेशन मास्तर मृत झाल्याचे बघून त्याच्या खिशातली तिजोरीची चावी पळवतो आणि तिजोरीतील पैसेही. परंतु प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या स्टेशन मास्तरला मृत्यूनंतर चोर आणि बेजबाबदार घोषित होण्याच्या विचाराने तो सर्व पैसे परत तिजोरीत ठेवतो. इफ्तेकार सिद्दिकीच्या शोधात त्याचा मुलगा आल्यावर तो जिवंत असल्याचे निदर्शनास येते आणि तो पुन्हा कामावर नेहमीप्रमाणे रुजू होतो. तो परतलेला बघून बलवंत यादव त्याच्या भेटीस येतो तेव्हा इफ्तेकार त्याच्या निदर्शनास आणून देतो की एक ‘एक्स्प्रेस बँडीट’ तिजोरी लुटण्यासाठी आला होता, त्याने मला मृत समजून माझ्या खिशातली तिजोरीची चावी नेली, परंतु पैसे काही नेले नाहीत. तेव्हा कॉन्सटेबल स्वत:ची ओळख केवळ ‘बलवंत यादव’ असल्याचे सांगुन निघून जातो.

४. बाबील खान याने इमाद रियाझ ही भूमिका समर्थपणे पेलली आहे. इमाद याने पूर्वी युनियन कार्बाईड मध्ये ड्राईव्हरची नोकरी केली असल्याने त्याला तिथल्या भयानक परिस्थितीची परिस्थितीची संपूर्ण कल्पना असते. त्यातच त्याच्या अत्यंत जवळच्या मित्राचा मृत्यू कारखान्याच्या दुर्लक्षित सुरक्षा व्यवस्थेमुळे झालेला असल्याने त्याने ती नोकरी सोडलेली असते आणि मित्राची कौटुंबिक जबाबदारीही स्वीकारलेली असते. त्याने स्टेशन मास्तरचा विश्वास, आपले कर्तव्य आणि आपली कौटुंबिक जबाबदारी यासाठी दिलेलं योगदान, प्रेक्षकांना हेलावून टाकतं.

. जगमोहन कुमावत – म्हणजेच राजकुमार केसवानी हे पात्र सनी हिंदुजा या कलाकाराने साकारलं आहे. याने यापूर्वी  ‘थाई मसाज, अस्पीरंटस आणि शेह्जादा’ या कलाकृतींच्या या वेब-सिरीजला स्वत:चे असे कथानक अजिबात नाही. केवळ एका घटनेच्या पार्श्वभूमीवरील रेल्वे कर्मचाऱ्यांनी माणुसकीच्या भावनेतून केलेल्या कर्तव्याची आखो-देखी मांडली आहे.  ‘भोपाळ विषारी गॅस दुर्घटना’ या हृदयद्रावक घटनेचे परिणामकारक चित्रीकरण करत या प्रकरणाचा आवाका, राजकारण, वस्तुस्थिती, मानसिकता आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचे नोंदनिय योगदान याचा लेखा-जोगा मांडला आहे. जो पुरेसा समर्थनीय आणि वस्तुस्थितीची जाणीव करून देणारा आहे.

सारांश
भारतातील लोकप्रिय फिल्म प्रोडक्शन हाऊस ‘यश राज फिल्म्स’ या संस्थेने ओटीटीवर आपली पहिली निर्मिती करतांना ‘भोपाळ गॅस दुर्घटना’ या सत्य घटनेवर प्रेरित होऊन ‘रेल्वे मेन’ ही चार एपिसोडची वेब-सिरीज नुकतीच प्रसारित केली आहे. नेटफिल्क्सवरील या वेब-सिरीजच्या माध्यमातून ‘भोपाळ जंक्शन रेल्वे स्टेशन’ वरील घटनाक्रम, रेल्वे स्टेशन मास्तर आणि त्यांचे सहकारी यांची लोकांचा जीव वाचवण्यासाठी केलेली धडपड चित्रित केली आहे. अतिशय तुटपुंजे संसाधन, मनुष्यबळ, संपर्कसाधने आणि पीडितांचा असहकार अशा परिस्थितीतही ‘आत्मविश्वास, निश्चय, निर्धार’ या बळांवर प्राणपणाला लाऊन केलेली कामगिरी याचं यथार्थ दर्शन घडवलं आहे. एकुणात काय तर या वेब-सिरीजला कथानकाची गरजच नाही. वास्तवतेचं यथार्थ चित्रण आणि निवडलेल्या कलाकारांचा अभिनय या भक्कम पाठबळावर एक वास्तव, भयानक विषयाला विषयाला सक्षमपणे मांडण्याचा हा निर्माता आणि दिग्दर्शकाचा प्रयत्न निश्चितपणे यशस्वी झाला आहे.
एनसी देशपांडे
मोबाईल – ९४०३४९९६५४

N C Deshpande
एनसी देशपांडे

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.