दशक १७ समास दहा टोणप सिद्ध लक्षण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. पाण्यामध्ये हटकेश्वर आहे त्या त्याचा महिमा अत्यंत थोर आहे. त्या पाताळलिंगाला नमस्कार, परंतु तिथे जाता येत नाही. शरीराने जाऊन दर्शन घडत नाही. तर विचारपूर्वक कल्पना करून त्याचं दर्शन घ्यावं. सात समुद्रांचे वेढे त्याच्या पलीकडे उदंड भूमी आहे. शेवटी भूमंडळाचे कडे तुटले. सात समुद्र ओलांडून तिथे कसं जाणार? म्हणून सर्वजणांनी विवेकी साधू असावे. जे आपल्याला ठाऊक नाही ते जाणकार व्यक्तीला विचारावे.
शरीराला मनाच्या गतीने फिरवणे अशक्य आहे. जे चर्मदृष्टीला माहिती नाही ते ज्ञानदृष्टीने पाहावे. समाधानाने ब्रम्हांडाचा विचार करावा. मध्ये भूमीचा तुकडा म्हणून आकाश आणि पाताळ आहे. हा गोळा नसता तर चहुकडे अंतराळ असते, त्याला परब्रम्ह म्हणावं. ते उपाधिपासून वेगळ आहे. तिथे दृश्य मायेच्या नावाने शून्य आकार आहे. दृष्टीला देखणं दिसते ते दृश्य, मनाला जे दिसतं तो भास, मनाच्या पलीकडे निराभास आहे, ते विवेकाने जाणावं.
सर्व दृश्यभास नष्ट होतात, तिथे विचार जन्म घेतो. अशी सूक्ष्मदृष्टी असलेले ज्ञानी भूमंडळावर थोडेच असतात. वाच्यांश वाचेने बोलावा, लक्ष्यांश न बोलता जाणावा. अमुक गुण असतो हे कळल्यानेच तो गुण जेथे नाही अशा गुणातीताचे आकलन होणे हे शक्य होतं. नाना गुणांना नाश आहे. निर्गुण मात्र अविनाशी आहे. स्थूलदृष्टीने पाहण्यापेक्षा विवेकाने सूक्ष्म पाहणे, जाणणे हे श्रेष्ठ आहे. पाहून जाणता येत नाही ते ऐकून जाणावे. श्रवणमनन केल्यावर सगळं काही ठाऊक होत. अष्टधा प्रकृतीचे विविध प्रकार उदंड आहेत. ते पाहिल्यास कळत नाहीत. ऐरणीवर सगळे धातू सारखेच समजून पिटले जातात तसे ते सगळे पदार्थ सारखे मानता येत नाहीत.
जर सगळं सारखंच झालं असतं तर ते परीक्षेचं कारणच उरलं नसतं. चव नसलेल्याने नाना अन्न कालवावी तसं हे झालं असतं. टोणपा म्हणजे मूर्ख. तो म्हणजे गुणग्राहक नाही. मुर्खाला विवेक समजत नाही. विवेक आणि उच्च-नीच त्याला कळत नाही. तिथे अभ्यासच नसतो. नाना अभ्यासापासून प्राण्याला सुटका नाही. वेड लागून ओंगळ झाले त्याला सगळं सारखंच वाटतं. त्याला बाष्कळ जाणावं. विवेकी नाही. ज्याचा अखंड नाश होतो त्यालाच अविनाश म्हणतात!
बहकलेल्या लोकांना काय म्हणायचं? ईश्वराने नानाभेद केले. भेदामुळे सगळी सृष्टी चालते. परीक्षा करणारेच आंधळे मिळाले तर तिथे परीक्षा कशी होईल? जिथे परीक्षा नाही तो टोणपा मूर्ख समुदाय गुणच नाही तर गौरव कसा येईल? खरं आणि खोटं एकच झालं तर विवेकाने काय केलं? म्हणून तर साधू जनांनी असार सांडून सार घेतले. उत्तम वस्तूची परीक्षा नतदृष्ट माणसाला कशी होईल? दीक्षाहिनाच्या पाशी दीक्षा कशी येईल? आपल्या घाणेरडेपणामुळे पावित्र्य माहिती नाही, त्याला वेदशास्त्र पुराण काय करतीळ? आधी आपलं वर्तन सुधाराव मग विचार पहावा. आचार आणि विचारामुळे पैलपार जाता येईल. जे नेमक्या व्यक्तीला कळत ते बाष्कळ व्यक्तीला केव्हा कळणार? डोळस लोक सुद्धा फसतात तर आंधळे काय कामाचे? पाप पुण्य, स्वर्ग नरक एकच मानलं, त्याने विवेक आणि अविवेक कशाला मानायचे?
अमृत आणि विष एक म्हणतात पण विष घेतल्यावर प्राण जातात. कुकर्मामुळे फजिती होते. सत्कर्मामुळे कीर्ती वाढते. इहलोक आणि परलोक दोन्हीकडे जेथे सांगोपांग विवेक नाही तिथे सगळं निरर्थक आहे. म्हणून संत संगाला जावे, सत्श्सास्त्र श्रवण करावे, नाना प्रयत्न करून उत्तम गुण अभ्यासावे, असं समर्थ सांगत आहेत. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे टोणप-सिद्धलक्षण नाम समास दशम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

मोबाइल- ९४२०६९५१२७