१७ दिवसांपासून पासून बोगद्यात अडकलेले ४१ कामगार सुरक्षित बाहेर

0

नवी दिल्ली,दि.२८ नोव्हेंबर २०२३- गेल्या १७ दिवसापासुन उत्तरकाशी येथील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांपर्यंत पोहचण्यास आज अखेर मंगळवारी (दि.२८) बचावपथकाला यश आले. आज सायंकाळी सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. एएनआयने याबाबत एक्स पोस्ट करुन माहिती दिली. या बचावकार्यानंतर स्थानिकांनी मिठाई वाटत आनंद देखील साजरा केला जात आहे.

सिल्क्यारा ते बारकोट हा बांधकामाधीन बोगदा सुमारे ६० मीटरच्या भागात कोसळल्याने १२ नोव्हेंबरपासून ४१ कामगार आत अडकले होते. गेल्या काही दिवसांत या कामगारांना वाचवण्यासाठी उत्तराखंड प्रशासनाने प्रयत्नांची पराकाष्टा केली. बचावकार्य च्या अखेरच्या टप्प्यात व्हर्टिकल ड्रिलिंग थांबवून मॅन्युअल ड्रिलिंग यशस्वीरित्या करण्यात आले आणि बचाव पथक कामगारांपर्यंत पोहचले.

गेले १७ दिवसांचे हे बचावकार्य युद्धपातळीवर करण्यात सुरु होते. खोदकाम पूर्ण झाल्यानंतर आज (दि. २८) सायंकाळी ४१ कामगारांना पाईपमधून बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिका मधून तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. अखेरच्या क्षणी एनडीआरएफ पथकाने बोगद्यात प्रवेश केला आणि कामगारांना मदतीचा हात दिला. बोगद्याच्या ठिकाणी ३० खाटांची तात्पुरती वैद्यकीय सुविधाही उभारण्यात आली. तसेच सिल्क्यारा बोगद्यामधून कामगारांना बाहेर काढल्यानंतर त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी चिन्यलिसौर हवाईपट्टीवर चिनूक हेलिकॉप्टर तैनात ठेवण्यात आले होते.

उत्तराखंड आपत्ती प्रतिसाद दल, एनडीआरएफ, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, रेल्वे आणि इतर सरकारी यंत्रणांचा बचावकार्यात समावेश आहे. विशेष म्हणजे बचावकार्यात उत्तरखंड प्रशासनाने कोणतेही कसर ठेवली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बोगदा तज्ज्ञ ख्रिस कूपर, अर्नोल्ड डिक्स यांनीही या बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

कामगारांना बाहेर काढताच रुग्णवाहिकांमधून सर्व कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. बोगद्याजवळ डॉक्टर आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. रुग्णालयापर्यंतचा ३५ किमीचा रस्ता झिरो झोन करण्यात आला आहे. या मार्गावर इतर कोणत्याही प्रकारची वाहतूक थांबवण्यात आली होती.

कामगारांना बोगद्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले त्यावेळी बोगद्याच्या ठिकाणी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित होते. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बोगदा तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांनी आज मंगळवारी ४१ कामगार सुरक्षित बाहेर यावेत यासाठी सिल्क्यारा बोगद्याच्या ठिकाणी पुजाऱ्यांसोबत प्रार्थनाही केली. बोगद्याच्या ठिकाणी डॉक्टरांचे वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आल्या होत्या.

बचावकार्यादरम्यान केवळ सहा मीटर खोदकाम बाकी असताना ऑगर मशीनमध्ये बिघाड झाला होता. मशीनमध्ये बिघाड झाल्याने खोदकाम काहीवेळ बंद ठेवण्यात आले होते. ड्रिलिंग च्या कामातील तांत्रिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी दिल्लीतील तज्ज्ञांची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी मशीनची दुरुस्ती केली. त्यानंतर बचावकार्य पुन्हा सुरु केले होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!