भावार्थ दासबोध – भाग २२८

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक अठरा समास निस्पृह शिकवण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. शरीर हे दुर्लभ आहे. आयुष्यही दुर्लभ आहे. त्याचा नाश करू नये. दास म्हणतात, सावकाश विचारपूर्वक त्याच्याकडे पहाव. विचारपूर्वक पाहिलं नाही तर सगळं अविचार होतो. अविचारामुळे प्राणी रंकासारखा दिसतो. आपले काम आपण केलं पाहिजे. आळस, उदासपणाने लुटले गेलो, वाईट संगतीने पाहता पाहता बुडवले. मूर्खपणाचा अभ्यास झाला..

स्वच्छंदपणामुळे घाला घातला, तरुणपणी कामरूपी चांडाळाने नाश केला. मूर्ख, आळशी आणि तरुण सर्वांविषयी दीनवाणा असेल तर त्याचे कोणाशी पटत नाही. कोणाला काय म्हणावं ते समजत नाही. जे जे पाहिजे ते ते नाही. अन्न वस्त्र तेही नाही. उत्तम गुण काहीच नाहीत. बोलता येत नाही, बसता येत नाही, प्रसंग काहीच कळत नाही, शरीर मन अभ्यासाकडे वळत नाही. लिहिणं नाही, वाचणं नाही, विचारणार नाही, सांगणार नाही, शहाणपणाचा अभ्यास नाही. बाष्कळपणा वाढलेला. आपल्याला काही येत नाही आणि शिकवलेलं ऐकत नाही. आपण वेडा आणि सज्जन लोकांना वाईट म्हणतो. आतमध्ये एक आणि बाहेर एक असा ज्याचा विचार आहे त्याच्या परलोकाचे सार्थक कसं घडेल? आपला संसार नासला म्हणून पस्तावला तर मग विचारपूर्वक अभ्यास केला पाहिजे.

मन एकाग्र करून जाणीवपूर्वक साधन करावे. प्रयत्नामध्ये आळसाचे दर्शन होऊ नये. सगळे अवगुण सोडावे. उत्तम गुणाचा अभ्यास करावा. अर्थपूर्ण प्रबंध पाठ करीत राहावे. बांधलेली पदे, श्लोक, नाना रचना, मुद्रा, छंद यामुळे आनंद होतो. कोणत्या प्रसंगी काय म्हणावं ते समजून जाणावं. उगीच वावगेपणाने परिश्रम कशासाठी घ्यायचे? दुसऱ्याचं मन जाणावं. त्याच्याविषयी आदर दाखवावा. जे आठवेल ते गात बसणे ते मूर्खपण म्हणावे लागेल. ज्याची जशी उपासना तशी त्याला गती मिळेल, तेच न चुकता गावे. रागज्ञान, तालज्ञान अभ्यासावं. साहित्य संगीत प्रसंग वर्णन करून कथेची लयलूट करावी. श्रवण-मनन करून अर्थ शोधावा. उदंड पाठांतर करावं. त्याला नेहमी उजाळा देत राहावा. मी सांगितलेल्या गोष्टीचं मनामध्ये स्मरण ठेवावे. अखंड एकांतात राहावं वेगवेगळे ग्रंथ अभ्यासावे. त्याच्यातील अनुभव येईल तो अर्थ मनामध्ये घ्यावा. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे निस्पृह शिकवण निरूपण नाम समास तृतीय समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.

दशक अठरा समास ४ देह दुर्लभ निरूपण नाम समास
देह आहे म्हणून गणेश पूजन आहे. देह आहे म्हणून शारदा वंदन आहे. देह आहे म्हणून संतश्रोते गुरु आणि सज्जन आहेत. देह आहे म्हणून कवित्व चालते. देह आहे म्हणून अध्ययन होतं. देह आहे म्हणून नानाविध विद्यांचा अभ्यास केला जातो. देह आहे म्हणून ग्रंथ लेखन होतं. नाना लिपींची ओळख होते. नाना पदार्थांचा शोध देहासाठी घेतला जातो. देह आहे म्हणून महाज्ञानी, ऋषी मुनी आहेत. देह आहे म्हणून तीर्थाटन करीत प्राणी फिरतात. देह आहे म्हणून श्रवण घडतं. देह आहे म्हणून मननाचे पोवाडे गायिले जातात. याच देहात अंतरात्म्यामुळे परब्रह्म, परमात्म्याची प्राप्ती होते. देह आहे म्हणून कर्म मार्ग आहे. देह आहे म्हणून उपासना मार्ग आहे.

देह आहे म्हणून ज्ञानमार्ग आहे. योगी वितरागी तापसी हे देह असल्याने विविध सायास करतात. देह आहे म्हणून आत्मा प्रगटतो. इहलोक आणि परलोक सगळे देहाशिवाय निरर्थक आहे. देह असल्यावर सार्थक आहे. देह नसला तर सर्व निरर्थक आहे. पुरश्चरणे,अनुष्ठाने, गोरांजने, धूम्रपाने, शीतोष्ण पंचाग्नी साधणे देहामुळे आहे. देह आहे म्हणून पुण्यशील आहे. देह आहे म्हणून पापी आहे. देहासाठी चांगले वाईट आहे. असं समर्थ सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!