नाशिक,दि.५ डिसेंबर २०२३-मालेगावचे माजी आमदार रशीद शेख यांचे काल सोमवारी (४ डिसेंबर )रात्री अकराच्या सुमारास निधन झाले ते ६५ वर्षाचे होते. काही दिवसापूर्वीच त्यांच्यावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ते मालेगावच्या रुग्णालयात दाखल होते.परंतु त्रास वाढल्यानंतर नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आयेशा नगर कब्रस्तान येथे आज सकाळी ११ वा दफन विधी होणार आहे. समंजस आणि समन्वयी नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. राशिद शेख यांच्या निधनानंतर राजकीय व सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
मालेगाव मतदार संघाचे दोन वेळा ते आमदार राहिले होते.१९९९ मध्ये रशीद यांनी मालेगावमधून २५ वर्षांहून अधिक काळ आमदार राहिलेल्या निहाल अहमद यांचा पराभव करून धक्का दिला होता. मालेगाव महानगर पालिकेचे महापौर पदाची धुरा त्यांनी सांभाळली,अलीकडेच राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला होता.ते आधी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष होते.काँग्रेस पक्षाचे नेते, मंत्री, पक्षसंघटना व कार्यकर्त्यांच्या अडीअडचणींकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत होत्या. याच पार्श्वभूमीवर रशीद शेख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.
श्रध्दांजली!
मालेगावचे माजी आमदार, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि माझे स्नेही रशीद शेख यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
लोकसंग्रहाची आवड आणि मनमिळाऊ स्वभावाच्या बळावर त्यांनी समाजकारणाबरोबरच राजकारणातही आपल्या कामाचा अमीट ठसा उमटविला. त्यांच्या निधनाने एक प्रेमळ व्यक्तिमत्त्व आपल्यातून हरपले आहे.
त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो व मृतात्म्यास सद्गती लाभो, हीच प्रार्थना!
भावपूर्ण श्रद्धांजली !
छगन भुजबळ,
मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य