ज्येष्ठ कादंबरीकार,नाटककार मनोहर शहाणे यांचे निधन

2

पुणे,दि,५ फेब्रुवारी २०२४ – ज्येष्ठ  कादंबरीकार, कथाकार आणि नाटककार.मनोहर शहाणे यांचे आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले आहे . त्यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा , नातवंडे असा परिवार आहे.

मनोहर शहाणे याचा जन्म १ मे, १९३० रोजी झाला . साठनंतरच्या काळातील मराठीतील महत्त्वाचे कादंबरीकार, कथाकार आणि नाटककार. नाशिक येथे सराफी व्यवसाय करणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. बालपणी वडिलांच्या निधनानंतर आई-आजीने धुणीभांडी करून प्रपंच चालविला. आर्थिक परिस्थितीमुळे मॅट्रिकनंतर शिक्षण घेता आले नाही. शालेय जीवनात वार्षिक स्नेहसंमेलनासाठी क्रांती ही नाटिका लिहिली. नाटकांमध्ये भूमिका, नकला, जादूचे प्रयोग केले. हस्तलिखिते- मासिके चालविली. रेशनिंग खात्यात तात्पुरते काम सुरू असतानाच पालवी मासिक काढले. ही धडपड पाहून गांवकरीत मुद्रितशोधक म्हणून १९४९ मध्ये त्यांना संधी मिळाली. पुढे साप्ताहिक गांवकरी व दिवाळी अंकाचे संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली. १९५५- ५६ मध्ये अ.वा.वर्टीं यांच्यासमवेत अमृत नियतकालिकाचे काम सुरू केले. मनोहर शहाणे यांनी अमृतचे संपादक म्हणून भरीव योगदान दिले.

सदस्यांचे मृत्यू जवळून पाहिल्याने शहाणे यांच्या व्यक्तिमत्त्वात संवेदनशीलता, हळवेपणा, तटस्थपणा आणि जीवन- मृत्यूविषयक असंख्य प्रश्न निर्माण झाले. यातून ते गंभीर लेखनाकडे वळले. माणूस, नियती, सुख-दुःखे व त्यांचा मानवी मनावर होणारा परिणाम यावर चिंतन सुरू झाले. मनुष्य म्हणजे नियतीच्या हातातील बाहुले असून त्याचे अस्तित्व क्षुद्र आहे, हा विचार त्यांच्या लेखनातून प्रकटला. त्यांच्या साहित्यातील व्यक्तिरेखा सर्वसामान्य असून तटस्थता, जिवंतता, प्रत्ययकारी आणि भेदकतेमुळे साठोत्तरी काळात मराठी कादंबरी जीवनाभिमुख बनविण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे.

मनोहर शहाणे यांचे वाङ्मय विविध स्वरूपी आहे. कथा, कादंबरी, एकांकिका याप्रकारांतून त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती केली. त्यांच्या अकरा कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. साठच्या सुमारास नाशकात सुरू झालेल्या अनामिक वाड़्मय मंडळात मंडळासाठी शहाणे यांनी लिहिलेल्या कथेचा विस्तार होऊन त्यांची पहिली कादंबरी धाकटे आकाश (१९६३) आकाराला आली. जन्म-मृत्यू, वेड- हळवी प्रीती, कामप्रवृत्ती, आर्थिक दैन्य, आजारपण अशा मानवी जीवनातील अटळ सत्याचे प्रकटीकरण या कादंबरीत आहे. कादंबरीतील नायकाचे मनोविश्लेषण चौकटीबाहेरचे व प्रभावी आहे. नवतेची अनेक लक्षणे या कादंबरीत असून ज्या लेखनामुळे मराठी कादंबरी समृद्ध व प्रौढ झाली, त्यात धाकटे आकाशचाही उल्लेख करण्यात येतो. झाकोळ (१९६५) या दुसऱ्या कादंबरीत पौगंडावस्थेतील मुलाच्या मनोवस्थेचा पट साक्षात झालाआहे. आर्थिक ओढाताण, वैचारिक संघर्ष, वैचारिक स्थित्यंतरे, मनोविश्लेषणाबरोबर दुसरे महायुद्ध, रेशन वस्तूंची टंचाई, काळाबाजार व राष्ट्रीय चळवळी या समकालीन घटनांचा पट कादंबरीतून साकारला आहे. नायकाची स्व-जाणीव आणि परात्मता शहाणे यांनी एकाचवेळी लक्षणीयरित्या रेखाटलेली आहे. देवाचा शब्द (१९६८) या कादंबरीत निपुत्रिक नायिका, तिचे जीवघेणे दुःख शहाणे तटस्थपणे रेखाटतात. विचार-अपेक्षा आणि नशीबाच्या पार्श्वभूमीवर मध्यमवर्गीय मूल्य स्वीकारातून निर्माण झालेली कोंडी आणि अस्वस्थचे प्रभावी चित्रण कादंबरीत आहे. नायिकेची असहाय्यता व दुःख परिणामकारक चित्रणातून कादंबरीतून नव-नैतिकतेचे प्रकटीकरण आहे.

पुत्र (१९७१) कादंबरीतून वडिलांचा धार्मिक देखावा आणि त्यामुळे कुटुंबीयांची झालेली वाताहत उपरोधिकपणे रेखाटलेली आहे. भावविवशता, सांकेतिकता आणि उपदेशप्रियता टाळत मध्यमवर्गीय जीवनातील कारूण्य उत्कटतेने मांडले आहे. उपरोधशैलीच्या दर्शनबिंदूतून या कादंबरीला नवी परिमाणे लाभतात. ससे (१९७७) कादंबरीतून विकलांग ज्येष्ठ नागरिक आणि त्याच्या मुलीच्या ससेहोलपटीचे चित्रण आहे. स्वतःचे जन्मदाते घरात नकोसे होणे ही आजच्या कुटुंबव्यवस्थेची शोकांतिका कादंबरीद्वारे प्रकटली आहे. वृद्धत्वातील दुःख आणि त्याला लाभलेली दारिद्र्य पार्श्वभूमीमुळे कारूण्य उत्कट- प्रत्ययकारी पद्धतीने व्यक्त होते. लोभ असावा आणि एखाद्याचा मृत्यू या दोन लघु कादंबऱ्या १९७८ मध्ये आल्या. लोभ असावामधून स्वप्न आणि वास्तवाचे अनेक मितीचे चित्रण आहे. बंगल्याचे स्वप्न बाळगणारा नायक व्यवहारात फसविला जाऊन स्वप्नभंगाचे अनुभव पत्रातून मांडतो. हे आशयसूत्र संवेदनशील, हळव्या आणि वास्तवाचे भान असलेल्या दृष्टिकोनातून येते. मार्मिक, सूचक, भेदक आणि अंत:र्मुख करणारी ही कादंबरी चटकदार वाक्ये व मौलिक तत्त्वज्ञानामुळे वेगळी ठरते. एखाद्याचा मृत्यूमधून सर्वसामान्य व्यक्ती मेल्यावर प्रकटणारा उपस्थितांचा शोक, आपुलकी निरर्थक व दांभिक असल्याचा अनुभव व्यक्त होतो. उत्तरक्रिया लवकरात लवकर आटोपून मोकळं होण्यावरचा कटाक्ष भयाण अनुभूती देतो. नातेसंबंधातील ताणेबाणे- वाद यामुळे मृत्यू म्हणजे मानवी जीवनाचे अंतिम- अटळ सत्य असल्याचेच माणूस विसरून जातो, याची जाणीव कादंबरी देते.

इहयात्रामधून (१९८६) आपण का जगतो आहोत, असा प्रश्न पडल्यावर आत्मशोध घेत इतरांपासून तुटत जाणारा व स्वतःचे अस्तित्व गमावून बसणारा प्राध्यापक भेटतो. एकीकडे अस्तित्ववाद, दुसरीकडे टोकाचे आत्मकेंद्रीपण या दोन द्वंद्वांमध्ये तो समाजसंकेत व सामाजिक बंधने पाळण्यात कमी पडून मृत्यूच्या काठावर पोहोचतो. आधुनिक कादंबरी म्हणून या कादंबरीकडे पाहता येते. आरसे (१९९०) ही लघुकादंबरी वृद्ध आईसह नैराश्यात जगणाऱ्या अविवाहित नायकावर बेतलेली आहे. तो असंख्य प्रश्नांमध्ये अडकून सर्वांशी तुटक- विक्षिप्त व बेफिकीर वागतो. आत्मशोधाचे प्रतीक म्हणून वापरला जाणारा आरसा कादंबरीतून सुत्ररूपाने येतो. संचित (१९९७) ही कादंबरी ब्लॅक कॉमेडी स्वरूपाची आहे. श्रीमंताचे विसंगत वर्तन, त्यांचा मृत्यू, मृत्यूनंतर जमलेली गर्दी, गर्दीचे वाद-संवाद आणि मागे उरलेल्यांचे विविध प्रश्न यांतून मानवी जीवनाचे अस्तित्व व निरर्थकता नोंदविली आहे. आधुनिकतेचा पेच मांडताना शहाणे त्याला भारतीय सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक वस्तुनिष्ठतेची जोड देतात. मात्र हे मांडताना रूढ- पारंपरिक साधने, तपशील व शैलीत नवनवे प्रयोग करतात. लेखकाच्या अनुभवविश्वाची समृद्धता अभिव्यक्त करणारी ही कादंबरी आहे. एकाचवेळी परात्मता, आधुनिकता, अस्तित्ववाद आणि तात्त्विकता मांडणारी ‘नव- कादंबरी’ म्हणून संचित महत्त्वाची आहे. उलूक (२००५) मध्ये श्रीमंत व्यक्तीला मृत्यूची चाहूल लागल्यावर अमर होण्यासाठीची त्याची धडपड, देवाचे मंदिर बांधल्यावर आपला मृत्यू होणार नाही, ही त्याची भावना फोल ठरून शेवटी मृत्यू. यातून गूढवाद- अस्तित्ववाद आणि मृत्यूविषयक गंभीर चिंतन प्रकटते. माणूस, त्याचा जन्म, त्याच्या जगण्याचे कार्यकारणभाव, धर्मकारण त्याच्या हातात नसतात. आपले बाहुलेपण टाकुन तो स्वत:चे आकाश, क्षितिज निर्माण करू पाहण्याची शक्यता आणि त्यातून निर्माण होणारा अपरिहार्य संभ्रम यावर शहाणे समर्पक-मार्मिक भाष्य करतात.

मनोहर शहाणे यांनी कथालेखनही केले. मनुष्यजीवन, त्यातील सुख-दुःख, प्रेम- प्रेमभंग, अस्वस्थता, दारिद्र्य, वेश्या/ भिकार जीवन, ज्येष्ठ नागरिक, मृत्यू असे गंभीर, भेदक व मार्मिक विषय हाताळले. शहाणेंच्या बहुतेक कथा मानवी जीवन- जगण्यातील, वर्तनातील अस्वस्थपण रेखाटतात. लेखनाची मर्यादा राखत बीभत्सरसाचे दर्शनही घडवितात. शहाण्यांच्या गोष्टी (१९६१), अनित्य (१९८७), ब्रह्मडोह (१९९९) आणि उद्या (२००८) या कथासंग्रहात मिळून त्यांच्या पंचेचाळीस कथा आहेत. आरोपी दादासाहेब देशमुख ? (१९९९) हे नाटक आणि तो जो कुणी एक (२००३) यातील चार एकांकिकांतूनही विविध विषय त्यांनी हाताळले आहेत. वैविध्यपूर्ण आविष्कारशक्तीचा प्रत्यय त्यांच्या एकांकिका देतात.

२००५ साली त्यांना महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सर्वोत्कृष्ट साहित्य पुरस्कार त्यांना मिळाले. शहाणे यांच्या एकांकिकांचे फ्रेंच आणि इंग्रजीभाषेत अनुवाद झाले. त्यांच्या पुत्र नाटकास १९७८ मध्ये राज्य नाट्यस्पर्धेची सर्व पारितोषिके मिळाली. लिटिल मॅगझीन ऑफ इंडिया या संस्थेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. तब्बल पाच दशके अमृत या लोकप्रिय मासिकाचे संपादन त्यांनी केले.

मराठीतील प्रयोगशील गद्यलेखक म्हणून गेल्या सहा दशकात विपुल साहित्यचिंतन आणि कसदार लेखन करणाऱ्या शहाणे यांने लिहिलेल्या कथा- कादंबऱ्या- एकांकिका गंभीर, तात्त्विक व जीवनासंबंधीचे चिंतन करायला लावतात. वाचकांना स्तिमित करताना माणसाच्या एकूणच जगण्याचा व त्याच्या वर्तनाचा सखोल विचार करतात. मानवी जीवनाचा विविध अंगाने शोध प्रामाणिकपणे घेत राहतात.

भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ कादंबरीकार, कथाकार आणि नाटककार मनोहर शहाणे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

आपल्या नाशिकमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले मनोहर शहाणे यांनी साहित्याकडे वळण्यापूर्वी कला क्षेत्रासह विविध प्रकारची कामे केली. साप्ताहिक गावकरी, अमृत अशा नियतकालिकांमधून त्यांनी संपादक, मुद्रितशोधक अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. आपल्या लेखनातून त्यांनी मानवाच्या भावभावना, सुख दुःखे, प्रश्न आणि समकालीन घटनांचे चित्रण प्रभावीपणे केले. त्यांच्या निधनाने मानवी जीवनाचा विविध अंगांनी शोध घेणारा प्रयोगशील लेखक काळाच्या पडद्याआड गेला आहे.

त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो आणि मृतात्म्यास सद्गती लाभो, हीच प्रार्थना!

भावपूर्ण श्रद्धांजली

छगन भुजबळ
मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य

भावपूर्ण श्रद्धांजली
मराठी साहित्य विश्वात महत्त्वाचे नाव असलेले कथाकार, काबंदरीकार, नाटककार म्हणून स्वतंत्र लेखनशैली निर्माण केलेले मनोहर शहाणे प्रतिभाशाली लेखक होते. चाकोरी बाहेरचे विषय, आशय यांची अनोखी मांडणी करून दर्जेदार पुस्तकांचे त्यांनी लेखन केले.

मानवी मनाचे कंगोरे, मध्यमवर्गीय जगणे यांचा अचूक वेध शहाणे यांनी घेतला. मुंबई-पुण्याच्या नामवंत प्रकाशन संस्थांनी त्यांनी पुस्तके प्रकाशित केली. धाकटे आकाश, इहयात्रा, लोभ असावा आणि एखाद्याच्या मृत्यु, उलूक, ब्रम्हडोह, झाकोळ, पुत्र अशा कादंबर्‍यांतून, कथासंग्रहातून, नाटकांतून, जीवनातील अटळ सत्याचा शोध, मध्यमवर्गीय जाणीवा यांचे संवेदनशील चित्र त्यांनी प्रभावीपणे मांडले. मार्मिक व साधी सोपी शब्दकळा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. मराठी साहित्य विश्वाच्या साठोत्तरी साहित्य चळवळीतील ते महत्त्वाचे लेखक होते.

गांवकरी प्रकाशनाच्या ‘अमृत’ मासिकाला त्यांनी वाचकांच्या माध्यमातून जगभर मान्यता मिळवून दिली. एक उत्तम संपादक व नव्यांना लिहिते करणारा लेखक अशी त्यांची ख्याती होती.

नाशिकमधील अनेक साहित्य संस्थांशी त्यांचा संपर्क होता. त्या माध्यमातून अनेक युवा लेखकांना त्यांनी लेखनासाठी प्रोत्साहन दिले. नाशिकच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक स्थित्यंतराचे चित्र त्यांच्या कादंबर्‍यांतून आले आहे. त्यांनी लेखनात नवनवीन प्रयोग केले. मानवी जगण्याचा तळ व व्यक्तीमत्वाचा वेध घेणारा थोर लेखक आपल्यातून गेलेत. यामुळे साहित्य विश्वाची मोठी हानी झाली आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली !

(विश्वास जयदेव ठाकूर)
कार्याध्यक्ष-महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेे
शाखा जलालपूर (नाशिक)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

2 Comments
  1. Radhika Vaidya says

    Please make correction in news . He survived with two daughters and not just one. Thank you for beautifully covering my grandpa’s life. 🙏

  2. विद्या बच्छाव भुजबळ says

    प्पा, म्हणजे मनोहर शहाणे, माझ्या बाल मैत्रिणीचे ज्योति शहाणेचे वडील. मैत्रिणी निमित्ताने मी नेहमीच त्यांच्या घरी जात असे, त्यांच्या सांनिध्यात खूप वेळ घालवला आणि भरपूर गप्पा पण केल्यात. त्यांच्याच प्रेरणेने मी कविता, लघुकथा, छोटे-मोठे आर्टिकल लिहिलेत, शिकले खूपच सपोर्टीग होते. त्यांच्या पवित्र आत्म्याला चिरंतन शांती मिळो हीच प्रभू चरणी प्रार्थना 🙏भावपूर्ण श्रद्धांजली!!! ! 💐

कॉपी करू नका.