मुंबई,दि १३ फेब्रुवारी २०२४ -समकालीन दृश्य माध्यमात खासकरून चित्रांच्या प्रांगणात नवे प्रयोग होताना दिसताहेत. भारताला चित्रकारांनी जगभरात आपल्या कलेने एक वेगळी उंची प्राप्त करून दिली आहे. आधुनिक चित्रकलेची एक नवी वाट आणि फाईन आर्ट ह्या कलेतली प्रगल्भता सातत्याने लोकांसमोर येत आहे.विविध मिडीयम, विविध विचारधारा आणि समग्र जगण्याची नवी ओळख करून देणारे नवे चित्रकार समाजात सरसावताना दिसताहेत. ह्या समकालीन चित्रकारांच्या नव्या फळीत जिने आपल्या रेषांच्या नावीन्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे
नाशिकच्या स्नेहल एकबोटे ह्यांचे ‘रेषाकार’ हे प्रदर्शन आज १३ फेब्रुवारी २०२४ पासून मुंबईच्या काला घोडा येथील द आर्ट एंटरन्स या आर्ट गॅलरी मध्ये सुरु होत आहे. ह्यापूर्वी स्नेहलचे रेषाकार हे प्रदर्शन पुणे, दिल्ली, नाशिक, ठाणे, कोल्हापूरमध्ये जाणकारांच्या उपस्थितीत पार पडलं होतं. मर्मज्ञानी त्याला उत्तम प्रतिसादही दिला होता. स्नेहल चित्रमाध्यमात गेली १५ वर्षे सातत्याने नवे प्रयोग करत आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तिची नोंद घेतली आहे.
“एक साधी रेष आपल्याला बरंच काही सुचवून जाते. एक रांगही रेषच असते. पण त्यात एक सामाजिक विधान केलेले असते. तुम्ही जर निरखून पाहिलंत तर रेषा केवळ कागदावरच नाहीत तर आपल्या संपूर्ण भवताल वेढून आहेत. ह्या रेषांचे महत्व निसर्गाशी आणि मानवी जगण्याशी येतो. केवळ इतकेच नाही तर आपला आंतरिक आणि बाहेरचा प्रवासही ह्या रेषांसारखा असतो. ह्या विविध मनस्थितींचे चित्ररूप रेषाकारमधून साकार करायचा प्रयत्न मी केला आहे.” असे स्नेहल एकबोटे ह्यांनी सांगितले. रेषाकार हे चित्र प्रदर्शन १३ फेब्रुवारी पासून २६ फेब्रुवारी पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत खुले असणार आहे.