नवीदिल्ली,दि,६ मार्च २०२४ –अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम येत्या १४ किंवा १५ मार्च रोजी जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.२०१९ प्रमाणेच यंदाही ७ टप्प्यांत मतदान होणार असून एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडण्याची शक्यता आहे.
सध्या निवडणूक आयोग देशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीच्या अंतिम टप्प्यात आहे.निवडणूक आयोगाकडून सर्व राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जात असून निवडणूक आयोगाचे अधिकारी प्रत्येक राज्याच्या दौऱयावर आहेत. सर्व राज्यांतील तयारीचा आढावा घेतल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.आगामी लोकसभा निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले असून निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम कधी घोषित होतो याबद्दल राजकीय पक्षांना उत्पंठा लागून राहिली आहे.
कोणत्या टप्प्यात कोणत्या राज्यात होणार मतदान
पहिला टप्पा : जम्मू आणि कश्मीर,आंध्र प्रदेश,अरुणाचल प्रदेश,महाराष्ट्र,मणिपूर,मेघालय,मिझोरम, नागालँड, ओडिशा, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान, लक्षद्वीप.
दुसरा टप्पा : आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, जम्मू आणि कश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओडिशा, तामीळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी
तिसरा टप्पा : आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, गोवा, जम्मू आणि कश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दादरा आणि नगर हवेली, दीव आणि दमण.
चौथा टप्पा : बिहार, उत्तर प्रदेश, जम्मू आणि कश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान आणि पश्चिम बंगाल.
पाचवा टप्पा : राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, जम्मू आणि कश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश.
सहावा टप्पा : बिहार, हरयाणा, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली-एनसीआर.
सातवा टप्पा : उत्तराखंड, झारखंड, मध्य प्रदेश, पंजाब, बिहार, पश्चिम बंगाल, चंदिगड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश.
याच पार्श्वभूमीवर काल मंगळवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. निवडणूक अधिकाऱयांनीही निवडणुकीचे काटेकोर नियोजन करावे.लोकशाहीच्या या उत्सवात कुठेही हिंसाचाराला थारा नसेल. निवडणुका हिंसाचार मुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात हेच निवडणूक आयोगाचे मुख्य लक्ष्य असल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.