कविता गायधनी यांच्या पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन
कीर्तनचंद्र श्रेयशजी बडवे यांच्या हस्ते होणार प्रकाशन;विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
नाशिक,दि,१५ मार्च २०२४-येथील कवयित्री कविता शिंगणे गायधनी यांच्या अध्यात्मपर लेखांच्या पुस्तकाचे प्रकाशन उद्या शनिवार दिनांक १६ या दिवशी कीर्तनचंद्र श्रेयशजी बडवे यांच्या हस्ते होत आहे.
कविता, ललित गद्य आणि अध्यात्म पर विषयावर काम करणाऱ्या कविता गायधनी यांचे ‘वृत्तीचि निवृति’हे दुसरे पुस्तक असून ‘जिव्हाळ्याचे मेघ’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला असून त्याला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
‘वृत्तीची निवृति’ या पुस्तकात संत साहित्यातील निवडक गुणवैशिष्ट्यांचे विवेचन गायधनी यांनी केले आहे. मानवी जीवन एका अतुच्च पातळीवर जाण्याकरिता जो मार्ग संतांनी सांगितला आहे त्या मार्गाला अनुसरून असलेले हे पुस्तक ‘शब्दमल्हार प्रकाशन’ने प्रसिद्ध केले आहे.
या कार्यक्रमास विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहाच्या वरती असलेल्या ‘पलाश’ सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम संपन्न होईल तरी रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुकुंद गायधनी आणि ‘शब्दमल्हार प्रकाशन’तर्फे करण्यात आले आहे.