काँग्रेसला आणखी एक झटका? प्रिया दत्त शिंदे गटाच्या वाटेवर ?

0

मुंबई,दि,१८ मार्च २०२४- देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यानंतर निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यापासून काँग्रेस पक्षाला एकापाठोपाठ एक झटके बसताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईसह राज्यातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत नवी राजकीय वाटचाल सुरु केली आहे. या मध्ये  आता मुंबईतील काँग्रेसच्या आणखी एका नेत्याचा समावेश होण्याची शक्यता आहे.

बराच काळापासून त्या सक्रिय राजकारणापासून दूर असलेल्या ज्यांनी आपले वडील सुनील दत्त यांच्याकडून काँग्रेसी राजकारणाचा वारसा मिळालेल्या प्रिया दत्त  या लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या वर्तुळात सुनील दत्त यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. त्यांच्यानंतर प्रिया दत्त यांनी हा वारसा सक्षमपणे पुढे नेला होता.परंतु २०१४ मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर प्रिया दत्त यांची खासदारकी गेली होती. त्यानंतर पक्षसंघटनेत प्रिया दत्त या बाजूला सारल्या गेल्या होत्या. बराच काळापासून त्या सक्रिय राजकारणापासून दूर होत्या. मात्र, आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रिया दत्त एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत प्रवेश करुन राजकारणाच्या दुसऱ्या इनिंगला प्रारंभ करण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण, बाबा सिद्दीकी, मिलिंद देवरा या बड्या नेत्यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता.यापैकी मिलिंद देवरा हे शिंदे गटात,बाबा सिद्दीकी हे अजित पवार गटात तर अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करत थेट राज्यसभेची खासदारकी पदरात पाडून घेतली होती.त्यानंतर आता प्रिया दत्त या शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

प्रिया दत्त या २००९ साली उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या.मात्र,त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत त्यांना भाजपच्या पुनम महाजन यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते. एकेकाळी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावर प्रिया दत्त यांची घट्ट पकड होती. परंतु, २०१४ मधील भाजपचा शक्तिशाली उदय आणि काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागल्याने सक्षम उमेदवार असूनही प्रिया दत्त यांचा पुनम महाजन यांच्यासमोर टिकाव लागला नव्हता.

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रिया दत्त लवकरच शिंदे गटात प्रवेश करु शकतात. एवढेच नव्हे तर त्यांना शिंदे गटाकडून उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते.गेल्या पाच वर्षांपासून प्रिया दत्त या मतदारसंघात फारशा सक्रिय नाहीत. त्यांची काँग्रेस पक्षसंघटनेशी आणि कार्यकर्त्यांशी असणारी नाळही तुटली आहे. परंतु, आता शिंदे गटात प्रवेश करुन प्रिया दत्त राजकारणाच्या नव्या इनिंगला दमदारपणे सुरुवात करु शकतात. अजित पवार गटात गेलेले बाबा सिद्दीकी हे सध्या प्रिया दत्त यांच्यासाठी महायुतीत वातावरणनिर्मिती करणार असल्याची चर्चा आहे. परंतु, प्रिया दत्त यांच्याकडून अद्याप या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यांना याविषयी विचारले असता प्रिया दत्त यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.